Krushi mela (कृषि मेला)

Krushi mela (कृषि मेला)

Share

उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन, अहमदन

अहमदनगर येथे उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन होणार आहे. कृषी प्रदर्शनात फक्त सामान्य शेतकऱ्यासाठीच नाही तर सधन शेतकऱ्यासाठी आणि मध्यम आणि उच्चवर्गीयांसाठी [वाईन ;-)] सुद्धा आहे.अशा अनेक आकर्षक गोष्टी आहेत.



पाहिला विसरुनाका मंडळीनो............

30/11/2017

स्वच्छ मटण निर्मितीचे निकष

मटणाची गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरले जाणारे घटक

मटणामध्ये स्नायूचे प्रमाण जास्त असावे, (त्याला लीन मीट म्हणतात.)
मटणामध्ये हाडांचे प्रमाण स्नायूंच्या तुलनेत कमी असावे.
मटणावर अनावश्‍यक चरबीचे प्रमाण कमी असावे.
कत्तलीच्या मटणाचा २४ तासांनंतरचा सामू (पीएच) हा ५.४ ते ५.७ असावा. ६ पेक्षा जास्त सामू असणारे मटण शीतकरण साठवणुकीसाठी चांगले नाही, असे मानले जाते.
मटणाची प्रतवारी त्याच्या रंगावरून ठरवली जाते. मटणाचा रंग हा जास्त वेळा मायोग्लोबीन व त्याच्यामधील रासायनिक बदलांमुळे गडद लाल असतो व करडांमध्ये तो फिक्कट लाल असतो.
मटणाचा रसाळपणा व मऊपणा (Tenderness) हा मटणाच्या चवीवरून ओळखतात. तो प्राण्याचे वय, आहार व स्नायूची शरीरातील जागा किंवा प्रकार यावर अवलंबून असतो. टेंडरनेस वाढवण्यासाठी शीतकरण, विद्युत उत्तेजना देणे या प्रक्रियांचा वापर करतात. कमी वयाच्या (१ वर्ष) जनावरांचे मटण चांगल्या प्रतीचे असते.
शेळीच्या मटणामध्ये ऊर्जा, असंपृक्त स्निग्धाम्ले, संपृक्त स्निग्धाम्ले, प्रथिने आणि कोलेस्टेरॉल यासोबतच जीवनसत्त्व अ, ब, क, ड, बी कॉम्प्लेक्‍स, बी-१२, फॉस्फरस व लोह हे मुख्य घटक आढळतात, जे मानवी शरीरासाठी कमीत कमी अपायकारक आहेत.
स्वच्छ मटण निर्मितीसाठी जनावरांचे कत्तली अगोदरचे व्यवस्थापन

जास्त काळ प्रवास करून आल्यामुळे जनावरांमधील ग्लायकोजन कमी होते, त्यामुळे मटणाची गुणवत्ता खालावते.
जनावरे जास्त वेळ चाऱ्याविना असली किंवा निकृष्ट चाऱ्यामुळे मटणाची गुणवत्ता खालावते.
कत्तलीसाठी जनावरे चढवणे व उतरवणे याचे योग्य व्यवस्थापन करावे.
प्रवासी वाहनात जनावरांची गर्दी करू नये.
जनावरांना प्रवासापूर्वी व प्रवासादरम्यान योग्य विश्रांती, गुळाचे पाणी, स्वच्छ हवा मिळेल याची काळजी घ्यावी व अनावश्‍यक विलंब, अचानक थांबणे किंवा निघणे, वेगात वळणे टाळावे.
पिलांमध्ये दर ९ तासांनंतर २ तास व प्रौढ शेळ्यांमध्ये दर १४ तासांनंतर २ तास विश्रांती देणे आवश्‍यक.
प्रवासादरम्यान चारा व पाणी देणे आवश्‍यक अाहे.
कत्तलीच्या आवारात कत्तल करण्यासाठी आणलेल्या जनावरांसमोर दुसऱ्या जनावरांची कत्तल करू नये.
कत्तलीपूर्वी जनावर आजारी नाही याची खात्री करावी.
कत्तलीपूर्वी शेळ्या १२ ते २४ तास पाण्याशिवाय ठेवाव्यात.
स्वच्छ मटणनिर्मितीसाठी शेळ्यांची कत्तलीवेळी घेण्याची काळजी

कत्तलीचा परिसर स्वच्छ असावा.
सुदृढ जनावरांची कत्तल करावी.
शवविच्छेदन जमिनीवर न करता शवाला उलटे टांगून जमिनीपासून कमीत कमी ३ फूट उंचीवर करावे.
कत्तलीमध्ये वापरली जाणारी उपकरणे उदा ः चाकू, लाकूड, कत्तल करणाऱ्या व्यक्तीचा गाऊन व प्लॅटफॉर्म स्वच्छ असावा.
कत्तल केलेले शव स्वच्छ पाण्याने धुवावे.
कत्तल करणारी व्यक्ती सुदृढ असावी.
कापल्यानंतर मांसाचे आवश्‍यक भाग करून त्याचे शीतकरण (चिलिंग) करावे, त्यामुळे जीवाणूंची वाढ होणार नाही.
कत्तलीअगोदर इंजेक्‍शन द्यायचे असेल तर इंजेक्‍शनचा प्रभाव किती दिवसांत नाहीसा होतो हे पाहूनच जनावरांना इंजेक्‍शन द्यावे.
इंजेक्‍शन शक्‍यतो मानेत द्यावे, मागच्या पायात देऊ नये, जेणेकरून त्या भागाच्या मटणाची प्रतवारी डागामध्ये कमी होणार नाही.

Photos from Krushi mela (कृषि मेला)'s post 30/11/2017

शेळ्यांच्या जंतनिर्मूलनाकडे लक्ष द्या

जंतांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्यांच्या शरीरातील रक्त कमी होणे, अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, असे परिणाम दिसून येतात. प्रत्येक जनावरामागे मिळणाऱ्या उत्पादनात घट होते. त्यामुळे शेळ्यांच्या जंतनिर्मूलनाकडे विशेष लक्ष द्यावे.

जंत शेळ्या-मेंढ्यांच्या पोटामध्ये दूषित चाऱ्यावाटे व दूषित पाण्यातून प्रवेश करतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे जंत शेळ्यांच्या पचनसंस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात.

जंतप्रादुर्भाव होण्याची कारणे

जंत नेहमी चरणाऱ्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात होतात.
जंतांचे गोल जंत, चपटे जंत, पानाच्या आकाराचे जंत हे महत्त्वाचे प्रकार आहेत.
गवतावर असलेले धोकादायक अवस्थेतील जंत पोटात गेल्याने शेळ्यांना जंतांचा प्रादुर्भाव होतो.
लेंड्यांबरोबर जंतांची अंडी बाहेर पडतात.
अनुकूल हवामानात अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात.
अळ्या हवेचे तापमान व दवाच्या मदतीने गवताच्या पात्यांवर जाऊन बसतात. शेळी जेव्हा गवतावर चरते, तेव्हा गवताबरोबर अळ्याही पोटात जातात.
पोटात अळीचे जंतांत रूपांतर होऊन जीवनचक्र पुन्हा सुरू होते.
काही प्रकारच्या जंतांच्या अळ्यांची वाढ इतर प्राण्यांच्या शरीरात होते.
जंत प्रादुर्भावात होणारे नुकसान

शेळ्यांमधील जंतप्रादुर्भावामुळे तीन प्रकारे नुकसान होते.
स्पष्ट नुकसान ः शेळ्या मरणे, खाद्य न खाणे, शेळ्या बारीक होणे
लपलेले/ सहज लक्षात न येणारे नुकसान ः वजनवाढ कमी होणे, खाद्याचे वजनात रूपांतर कमी प्रमाणात होणे, दूध कमी व कमी काळासाठी देणे, कातडी व केस राठ होणे
अनियंत्रित खर्च ः औषधोपचार, कामगार, जनावरे वेगळी ठेवण्यासाठी लागणारा आडोसा, प्रक्षेत्र जमिनीचा अकार्यक्षम वापर
यावर अनियंत्रित खर्च होतो.
जंतनाशकांचा वापर

जंतनाशकांचा वापर करताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वर्षभराच्या चार जंतनिर्मूलनावेळी वेगवेगळी औषधे देणे/ औषधे बदलणे टाळावे. ज्यामुळे सर्वच जंतनाशक औषधांच्या विरुद्ध जंतांची प्रतिकारशक्ती वाढू शकते व ते औषधोपचार निरुपयोगी ठरू शकतात.
त्यावर उत्तम उपाय म्हणजे जोपर्यंत एका विशिष्ट जंतनाशक औषधाला गुण येत नाही, तोपर्यंत त्या विशिष्ट औषधाचा वापर सुरू ठेवावा.
जंतनाशक औषधाचा पूर्ण डोस जनावराच्या वजनानुसार देणे आवश्‍यक आहे.
कळपामध्ये नवीन जनावर मिसळण्याअगोदर जंतांचे औषध देणे आवश्‍यक आहे.
जंत प्रादुर्भावाची लक्षणे
शेळ्या- मेंढ्यांच्या पोटात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे गोल कृमी आढळतात.
सर्वसाधारणपणे सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारी व त्यांच्या आरोग्यास अपायकारक जंतांची जात म्हणजे हिमाँकस कॉन्टॉर्टस (Haemonchus Contortus) ही होय.
ही जात रक्ताचे शोषण करणारी आहे. या जातीचा एक प्रौढ जंत एका दिवसात ०.०५ मिलि रक्त शोषण करतो.
जर शेळी- मेंढीला मोठ्या प्रमाणात जंत प्रादुर्भाव झालेला असेल, उदा. या जातीचे २००० जंत पोटात असतील, तर त्या शेळी-मेंढीच्या शरीरातील एकूण रक्ताच्या ५ ते ७ टक्के रक्त हे रोज या जंतांद्वारे शोषले जाईल.
त्यातून शेळीला पंडुरोग होतो, उत्पादनक्षमता कमी होते. प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झालेला असेल (विशेषतः शेळी- मेंढी आधीचीच आजारी असेल किंवा नुकतीच विलेली असेल), तर मृत्यू होणे असे घातक परिणाम संभवतात.
शेळीच्या पुढच्या पायांच्या व पोटाच्या खाली पाणी होते.
शेळ्या, करडे खंगत जातात, वाढ खुंटते, मलूल दिसतात व खाणे कमी करतात.
खाल्लेले अन्न पचत नाही, हगवण लागते.
अंगावरील चमक जाऊन केस उभे राहतात.
जबड्याखाली व पोटाखाली सूज येते. जनावरे पोटाळलेली दिसतात.
रक्त शोषणाऱ्या जंतांमुळे शरीरातील रक्त कमी होते.
इलाज न केल्यास शेवटी खाणे बंद होऊन जनावरे दगावतात.
लेंडी व रक्ताची तपासणी केल्यास जंतांची अंडी किंवा जंत दिसतात.
शेळ्या- मेंढ्या अशक्त होतात व त्यांचे वजन घटते, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बसतात व लोळतात.
शेळ्या- मेंढ्या अशक्त झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन फुफ्फुसाचा दाह होणे इ.सारख्या इतर आजारांनासुद्धा त्या बळी पडू शकतात.
मोठ्या प्रमाणात जंतांचा प्रादुर्भाव असलेल्या शेळ्या- मेंढ्यांचे डोळे अलगद उघडून पाहिले असता नेहमी लालसर असणारा पापण्यांचा आतील भाग पांढरट दिसतो.
डरंगळणे (हगवण लागणे, पातळ संडास होणे) हे जंत प्रादुर्भावाचे प्रमुख लक्षण नाही. जंत प्रादुर्भावाशिवाय इतर कारणांनीसुद्धा शेळ्या- मेंढ्या डरंगळतात व बऱ्याच वेळा शेळ्या- मेंढ्यांमध्ये डरंगळणे दिसल्यास लगेचच जंतनाशक औषध पाजले जाते, हे चुकीचे आहे.
काही वेळा शेळ्या- मेंढ्या जंत प्रादुर्भावामुळे डरंगळू शकतात. त्यांचे निदान करण्यासाठी आजारी शेळ्या- मेंढ्यांची लेंडी तपासून घेऊन त्यांच्यातील जंतांचे प्रमाण पाहणे गरजेचे आहे.
जंत प्रादुर्भाव आटोक्‍यात ठेवण्याचे उपाय

जंत वाढल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ते वाढू नयेत, म्हणून पुढीलप्रमाणे प्रतिबंधक उपाययोजना करणेच चांगले.
लेंडीच्या ढिगाभोवती शेळ्या चरायला सोडू नयेत.
सकाळी दहिवरात गवताच्या टोकावर जंतांच्या अळ्या आलेल्या असतात. दहिवर हटल्यावर त्या गवताच्या मुळाशी जातात, त्यामुळे दहिवर हटल्यावर शेळ्या चरायला सोडणे योग्य.
चरण्यास जाणाऱ्या शेळ्यांना जंतांची लागण होतच राहते, म्हणून पावसाळा सुरू होताना आणि पावसाळा संपताना असे दोनदा पशुवैद्याच्या देखरेखीखाली जंतांचे औषध पाजावे.
लेंड्यांची तपासणी करून आवश्‍यक असल्यास इतर वेळेसही औषध पाजावे.
शेळ्यांचा गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.
तळ्याच्या परिसरातील गोगलगाईंमध्ये काही जंतांच्या अळ्या वाढतात म्हणून गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी योग्य ते उपाय योजावेत.
तळ्यात बदके पाळल्यानेही गोगलगाईंचा नायनाट होतो.
हिरवा चारा थोडा वेळ उन्हात वाळवून मग द्यावा. शेळीचे व्यवस्थापन चांगले केल्यास मृत्यूचे प्रमाण फक्त २ टक्के राहते.

Photos from Krushi mela (कृषि मेला)'s post 23/11/2017

हरितगृहामधील ढोबळी मिरची

रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान १८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ अंश सेल्सिअस आवश्‍यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता ५० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत असली पाहिजे. हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन केलेल्या मिरचीचा दर्जा चांगला राहतो.

तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झाल्यास व धुके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत.
शेतामध्ये ढोबळी मिरचीची लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यांत करावी.
जमीन :
जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. पाण्याचा चांगला निचरा होणारी. सामू सहा ते सात. साधारणपणे जमिनीची खोली एक-दीड मीटर असावी. म्हणून मध्यम ते भारी काळ्या जमिनी या पिकास उत्तम मानवतात, तसेच पोयट्याच्या सुपीक जमिनीसुद्धा चालू शकतात.

ढोबळी मिरचीच्या जाती :
हरितगृहामध्ये लाल, पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरच्यांची लागवड केली जाते. आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगांच्या ढोबळी मिरचीला अधिक उठाव मिळू शकतो, कारण या मिरच्यांची चव काहीशी गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही.
पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या शहरांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरच्यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आले आहे, त्यासाठी अधिक दर उपलब्ध होतो. शहरामध्ये काढणीनंतर आपला माल पाठवणे सोईचे नसल्यास नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा. दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल्या परिसरानुसार आणि बाजारपेठेतील स्वतःच्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी.

रोप निवडीचे निकष :

रंगीत ढोबळी मिरचीचा पर्याय निवडल्यास लाल व पिवळा या रंगांचे प्रमाण साधारणपणे - ६५ टक्के लाल आणि ३५ टक्के पिवळा असे ठेवावे.
साधारणपणे लाल रंगाच्या मिरचीला अधिक मागणी असते.
स्वतः रोपे तयार करणार असल्यास लागवडीपूर्वी साधारणपणे एक महिना आधी योग्य त्या आकाराच्या शेडनेटमध्ये रंगानुसार बियांची रोपे ट्रेमध्ये तयार करावीत.
रोपे तयार करणे:

रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.
वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट (१० जी) हे कीटकनाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बी पेरणी करावी.
प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवडीसाठी सुमारे ४०० ते ५०० ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.
रोपे सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर ती पुनर्लागवडीस तयार होतात.
लागवडीच्या वेळी रोपे खालीलप्रमाणे असावीत.

रोपांचे वय चार ते पाच आठवड्यांचे असावे.
रोपांची उंची १६ ते २० सें.मी. असावी.
रोपांवरती चार ते सहा पाने असावीत.
लागवड :

रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर करावा.
गादीवाफा ९० x ४० x ५० सें.मी. आकाराचा असावा. या वाफ्यावर दोन ओळींत झिगझॅग पद्धतीने लागवड करावी.
लागवडीचे अंतर :

दोन रोपांतील अंतर - ४५ सें.मी.
दोन ओळींतील अंतर - ५० सें.मी.
रोपांची घनता - २.५ रोपे प्रति चौ.मी.
मशागतीच्या पद्धती :
रंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे आहे. या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेऊ.

झाडाला आधार देणे : मिरची पिकाची उंची दहा फुटांपर्यंत जाते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते.
एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन गॅल्व्हनाइज्ड आयर्नच्या तारा (१२ गेज जाडीच्या) वाफ्याला समांतरपणे बांधून घ्याव्यात. तारा बांधल्यानंतर लागवड करावी.
लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर एका झाडासाठी चार या संख्येत प्लॅस्टिक दोऱ्या तारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात.

रोपांचा शेंडा खुडणे : लागवडीनंतर २१ दिवसांनी रोपाचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्रीचा वापर करावा. रोपावरती चार- पाच पाने ठेवून शेंडा खुडला जातो, त्यामुळे मिरचीला तीन ते चार फुटवे फुटतात, त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घ्याव्यात.

काढणी : मिरचीची काढणी प्रामुख्याने जाती व रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी ९० ते १०० दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मिरचीला पाच टक्के रंग आल्यानंतर काढणी करावी, तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.

उत्पादन : मिरचीचे उत्पादन जातीपरत्वे वेगवेगळे दिसून येते. जुन्या किंवा पारंपरिक जातीमध्ये आठ कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. आणि आयात केलेल्या काही जातींपासून १४- १८ कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. उत्पादन मिळते.
प्रतवारी : मिरचीच्या काढणीनंतर फळांचा आकार व वजनानुसार प्रतवारी करावी.
साधारणतः अ दर्जा- २०० ते २५० ग्रॅम, ब दर्जा - १५० ते १९९ ग्रॅम, क दर्जा - १५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या मिरच्या अशा तीन प्रतींनुसार वर्गीकरण केले जाते.

23/11/2017

पनीर तयार करण्याची पद्धत कशी आहे?

तापवलेल्या दुधामध्ये सायट्रिक आम्ल टाकून मुद्दाम दूध फाटवले जाते. या फाटलेल्या दुधातील निवळी (व्हे) हे हिरवट पिवळसर पाणी वेगळे केल्यानंतर जो दह्यासारखा गोळा राहतो, त्याला छन्ना असे म्हणतात. या छन्न्यावर दाब ठेवून जो घट्ट असा पदार्थ मिळतो, त्याला पनीर असे म्हणतात. चांगल्या दर्जाचे पनीर मिळण्यासाठी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार पनीरची मानके ठरविली आहेत. त्यानुसार गाईच्या किंवा म्हशीच्या किंवा दोन्हीच्या मिश्रणापासून लॅक्‍टिक आम्ल किंवा सायट्रिक आम्ल टाकून बनवणे आवश्‍यक असून, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण 70 टक्केपेक्षा जास्त नसावे. तसेच, स्निग्धांशांचे प्रमाण 50 टक्केपेक्षा कमी नसावे.
-एका मोठ्या स्वच्छ स्टीलच्या पिंपात (पनीर वॅट) स्वच्छ, ताजे, निर्भेळ म्हशीचे दूध घ्यावे. दूध गाळून घेऊन त्याचे प्रमाणीकरण करून घ्यावे (त्यातील स्निग्धांश आणि स्निग्धांशांवर घनघटक यांचे प्रमाण 1ः1.65 असले पाहिजे).
-दूध 90 अंश से. तापमानापर्यंत तापवावे व तसेच तापवत असताना एकसारखे ढवळत राहावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. ढवळत असतानाच त्यामध्ये एक टक्का सायट्रिक आम्लाचे द्रावण बारीक धारेने मिसळावे. थोड्याच वेळात दूध फाटलेले दिसून येईल. फाटलेल्या दुधातून बाहेर येणारी हिरवट- पिवळसर दुधाची निवळी (व्हे) जेव्हा नितळ दिसेल, त्याक्षणी सायट्रिक आम्लाचे द्रावण टाकणे बंद करावे. साधारणतः पाच मिनिटे ते मिश्रण न ढवळता तसेच ठेवावे. पिंपातून व्हे (हिरवट- पिवळसर पाणी) चाळणीच्या साहाय्याने काढून घ्यावे.
-गोठलेला साका थोड्या- थोड्या (20-25 कि.ग्रॅ.) प्रमाणात मलमलच्या कापडात घेऊन विशिष्ट आकाराच्या साच्यामध्ये (हुप) ठेवावे. त्यावर दाब द्यावा. साधारणतः 20- 22 कि.ग्रॅ. पनीरला 45 कि.ग्रॅ. वजनाचा दाब लागतो. उत्तम प्रतीचे पनीर बनविण्यासाठी 15- 20 मि. दाब दिला पाहिजे. त्यानंतर पनीरचे ठोकळे तयार होतात. ते दोन - तीन तास थंड पाण्यात ठेवावेत. यामुळे पनीरच्या ठोकळ्याची बनावट (पोत) चांगली सुधारते.
-त्यानंतर पाहिजे त्या वजनाचे लहान लहान एकसारखे तुकडे करावेत (100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम).
-हे तुकडे एका चांगल्या पॉलिथिन पाऊचमध्ये बंद करावेत. हे पनीरचे पाऊच तापमान दहा अंश से.पेक्षा कमी असलेल्या शीतगृहामध्ये ठेवावेत. लेखातील छायाचित्रांत पनीर बनविण्याची पद्धत स्पष्ट केली आहे.
-पनीरचे उत्पादन हे दुधातील घन घटकावर (टोटल सॉलिड) अवलंबून असते, तसेच पनीरमध्ये शिल्लक राहिलेल्या घन घटकावर आणि पाण्यावरसुद्धा विसंबून असते. पनीर बनविण्यापूर्वी दूध 90 अंश सेल्सिअसपर्यंत तापवल्यामुळे पनीरच्या उत्पादनात वाढ होते. साधारणतः म्हशीच्या दुधापासून 20- 22 टक्के पनीर मिळते. गाईच्या दुधापासून 16- 18 टक्के पनीर मिळते.
-शीतगृहात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये हे पनीर सात दिवस चांगल्या प्रकारे राहू शकते. मात्र, त्याचा ताजेपणा चार दिवसांनंतर नाहीसा होतो.
उपपदार्थ - पनीर बनविताना दुधाची निवळी (व्हे) हे पाणी मिळते. साधारणतः एक कि.ग्रॅ. पनीर बनवताना चार - पाच लिटर दुधाची निवळी मिळते. त्याचा उपयोग विविध पेयांमध्ये केला जातो.

07/05/2017

आंब्यातील फांदीमर रोगाचे नियंत्रण

रोगकारक बुरशी : बॉट्रिओडिप्लोडिया थिओब्रोमी
लक्षणे :
१) फांदीमर सुरू होण्यापूर्वी एक महिना अगोदर झाडावर बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो. पावसाचे थेंब आणि वाऱ्यामार्फत बुरशीची बीजे पसरतात.
२) बुरशी फांद्यांच्या सालीमधून आत प्रवेश करते. वाढ फांदीमध्ये होते.
३) सुरवातीच्या अवस्थेत फांदीवरील साल उभट तडकल्यासारखी दिसते. त्यामध्ये पांढरट रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. तेथून पांढरट व नंतर तांबूस रंगाचा डिंक बाहेर येतो.

नुकसान ः
१) बुरशीची वाढ फांदीच्या आतील बाजूस होत असल्यामुळे झाडाच्या वरील भागास अन्नपुरवठा होत नाही. परिणामी प्रादुर्भित फांदी शेंड्याकडून वाळते.
२) नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव मुख्य खोडावर दिसतो, परिणामी कलम मरते.

नियंत्रण :
१) प्रादुर्भित भागावरील साल थोडी खरडवावी. त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
२) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास फांद्या आणि खोडावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) रोगग्रस्त फांद्या प्रादुर्भित भागाच्या २ ते ३ इंच खाली कापाव्यात. त्या जाळून टाकाव्यात.
४) कापलेल्या फांदीच्या भागास बोर्डोपेस्ट (३० टक्के) लावावी.

संपर्क ः डाॅ. विजयकुमार देसाई, (०२३५८) २८०२३८
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

02/07/2016

आच्छादन पिकामध्ये मुळ्याचा पर्याय ठरतो फायद्याचा...

आच्छादन पिकांमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते. या फायद्याबरोबरच या पिकातून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला असता मुळ्याचे पीक अत्यंत फायद्याचे ठरत असल्याचे इंग्लंड येथील न्यू हॅम्पशायर विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘अॅग्रोनॉमी जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

नगदी पिकाच्या पेरणीआधी किंवा काढणीनंतर आच्छादन पिकाचा पर्याय निवडला जातो. यामुळे मातीची धूप थांबण्यासोबतच जमिनीमध्ये पोषक घटकांचे प्रमाण वाढते. तणांचे प्रमाण कमी राहते. परागीकरण करणाऱ्या कीटकांसाठी पर्यायी पीक शेतात असल्याने त्याचाही फायदा होतो. या वरील सामान्य फायद्यासोबतच उत्पादनाचा विचार केल्यास त्यातून आर्थिक उत्पादनही मिळू शकते. चांगल्या आच्छादन पिकाचा शोध घेण्यासाठी न्यू हॅम्पशायर विद्यापीठामध्ये अभ्यास करण्यात आला. येथील कृषी पर्यावरणशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक रिचर्ड स्मिथ यांनी सांगितले, की प्रदेशानुसार, वातावरणानुसार वेगेवेगळी आच्छादन पिके उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात. इंग्लंडमधील स्थितीमध्ये प्रामुख्याने स्नॅप बिन्स, ब्रोकोली, स्वीट कॉर्न, पालक यांसारख्या भाज्या किंवा मका या आच्छादन पिकांची लागवड केली जाते.

प्रयोग आणि निष्कर्ष -
प्रयोगामध्ये उन्हाळ्यामध्ये उशिरा आणि हिवाळ्यातील पडीक राहणाऱ्या काळात विविध आठ आच्छादन पिकांची लागवड केली. त्यातही शेतीमध्ये एकाच किंवा एकाच वेळी दोन आच्छादन पिकांचीही लागवड करण्यात आली. या पिकामध्ये विंटर रे, अल्फाअल्फा, क्रिमसन क्लोव्हर, व्हाइट क्लोव्हर, हेअरी व्हेच. सोयबीन आणि मुळा यांचा समावेश होता. त्याच प्रमाणे एक नियंत्रित प्रक्षेत्र पडीक ठेवण्यात आले. सलग दोन वर्षांच्या अभ्यासामध्ये प्रत्येक आच्छादन पिकांच्या कार्यक्षमतेची नोंद घेण्यात आली. या सर्व पिकामध्ये बर्फ पडण्याच्या अवस्थेमध्ये बायोमास निर्मितीमध्ये मुळा या पिकातून सर्वाधिक बाजी मारली. त्याच प्रामणे तणांच्या वाढीवरही त्यांनी अंकुश ठेवला. एकूणच चाचणी पिकातील सर्वाधिक उत्पादनही दिल्याचे स्मिथ यांनी सांगितले.

- आच्छादन पीक घेण्यामागे जमिनीचे आरोग्य सुधारणे हा एक विचार असतो. न्यू इंग्लंडमध्ये सुमारे ५० टक्के शेतामध्ये हंगामामध्ये आच्छादन पिके म्हणून भाज्यांची लागवड केली जाते. अन्य आच्छादन पिकांचा फारसा विचार केला जात नाही. आजवर विचारातही न घेतलेली मुळा, क्रिमसन क्लोव्हर आणि सोयबीन ही आच्छादन पिके कमी कालावधीची, तणांच्या वाढीवर अंकुश ठेवणारी आणि तुलनेने अधिक थंडीमध्येही चांगल्या प्रकारे वाढणारी आहेत, हे या प्रयोगामध्ये दिसून आले.
- हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीमध्ये अन्य आच्छादन पिके तग धरण्यामध्ये कमी पडलेली असताना मुळा पिकाने मात्र आपले काम चोख बजावले होते.
- तणनाशकांच्या वापराचे पर्यावरणावर व शेतजमीनीवर विपरीत परिणाम होत असल्याने आर्थिकदृष्ट्या योग्य ठरेल असा पर्याय शोधण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. या जैविक पद्धतीमुळे तणांच्या नियंत्रणासाठी चांगले पर्याय उपलब्ध होतील.

02/07/2016

स्वयंसेवकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे अायोजन

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एनडीआरएफच्या वतीने ५ ते १४ जून या कालावधीत राज्यस्तरीय ‘‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या ओंकार थोपडे, शुभम शिंदे या दोन स्वयंसेवकांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे प्रतिनिधित्व केले.

या प्रशिक्षण शिबिरात पूर, अपघात, भूकंप, आग, संसर्गजन्य रोग इत्यादी आपत्तीमध्ये प्रथमोपचार व उपाययोजना करण्यासंबंधीची माहिती व प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात अाले. स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रा. शरद पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण जाधव, प्रा. डॉ. चंद्रकांत पालवे, प्रा. नानासाहेब काळे यांनी मार्गदर्शन केले.

02/07/2016

लॅटरलच्या आरोग्यासाठी द्रावण विकसित

पाण्यातील अशुद्धीमुळे सिंचन नळ्या (लॅटरल) व पाइपलान खराब होण्याचा धोका असतो. तो कमी करण्यासाठी नेदरलॅंड येथील व्हॅन इपेरेन यांनी एक द्रावण विकसित केले आहे. ते सिंचन सुरू होण्याआधी काही काळ सोडल्यास प्रतिबंधात्मक फायदा होतो.

शेतीसाठीही पाण्याची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. सिंचनासाठी पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्यास ड्रीपर बंद पडण्याची समस्या उदभवते. ते प्रत्येक पिकांच्या काढणीनंतर क्लोरिन प्रक्रियेद्वारे साफ करावे लागतात. २०१४ मध्ये मिरचीची रोपवाटिका करणारे जेन जॅनस्सेन यांनाही ही समस्या जाणवली. त्यांच्या रोपवाटिकेमध्येही सातत्याने काही ड्रीपर बंद पडत असल्याचे दिसून आले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अनेकांचा सल्ला घेतला. मात्र उपाय मिळाला नाही. व्हॅन इपेरेन यांनी तयार केलेले द्रावण पाण्यामध्ये मिसळल्यास त्याचा फायदा होत असल्याचे दिसून आले. पाण्याचे प्रदूषण कमी करून पाणी उदासीन करण्यामध्ये हे द्रावण मोलाचा वाटा उचलते.

पिकांच्या वाढीसाठी काही प्रमाणामध्ये क्षारांची गरज असते. पाण्याच्या लॅटरल आणि नळ्या साफ ठेवण्यासाठी आम्ही तांबेयुक्त खतांचा वापर करतो. त्यानंतर स्वच्छतेसाठी इन्ट्रा हायड्रोकेअर हे हायड्रोजन पेरॉक्साईड या स्थिरीकरण घटकांवर आधारित द्रावण वापरतो. त्यामुळे पाइपलाइन स्वच्छ राहण्यास मदत होते. पाण्यामध्ये किती प्रमाणामध्ये हायड्रोजन सोडायचे, हे ठरविण्यासाठी सातत्याने पाण्याची तपासणी केली जाते.

10/02/2016

लक्षात घ्या फळझाडासाठी पाण्याची गरज

पिकाची पाण्याची गरज ही हवामान व हंगाम, पीक व पिकाची वाढीची अवस्था यावर अवलंबून असते. तसेच ठिबक सिंचन प्रणालीद्वारे संपूर्ण क्षेत्रावर पाणी न देता फक्त मुळाचे कार्यक्षम क्षेत्र ज्या भागावर पसरले आहे तेवढ्याच भागावर पाणी दिले जाते. पिकाची पाण्याची गरज काढताना या सर्व बाबींचा विचार करून फळझाडांसाठी खालील सूत्र निश्‍चित करण्यात आले.
पिकास लागणारे पाणी = अ ब क ड ---------(1)
(लिटर/दिवस/ झाड/ किंवा = ई
(लिटर/ दिवस/ तोटी)
अ = संदर्भिय बाष्पपर्णोत्सर्जन (मिमि/ दिवस)
ब = पीक गुणांक
क = ओलीत गुणांक
ड = झाडांनी व्यापलेले क्षेत्र (वर्ग मीटर, मी x
ई = संचाची कार्यक्षमता

सूत्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती ः
संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन (अ) ः
1) पिकाची पाण्याची गरज ही हवामानावर म्हणजे हवामानाच्या विविध घटकांवर (उदा. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास इ.) अवलंबून असते. संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन हे एका विशिष्ट संदर्भीय पिकासाठी बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाद्वारे लागणाऱ्या पाण्याची गरज दर्शविते.
2) विविध पिकांची पाण्याची गरज ही पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाशी संबंधित असते. हा संबंध विविध पिकाच्या "पीक गुणांक'द्वारे निश्‍चित केला जातो. म्हणजेच जर विशिष्ट पिकाचा त्याच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक गुणांक माहीत असेल तर विशिष्ट जागेच्या हवामानाप्रमाणे सूत्रांच्या साह्याने संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढून विशिष्ट पिकाची त्या वाढीच्या अवस्थेसाठी बाष्पर्णोत्सर्ज किंवा पाण्याची गरज काढता येते.
3) राज्यातील काही जिल्ह्यासाठी मागील 25-30 वर्षांच्या हवामानाच्या घटकाच्या माहितीच्या आधारे योग्य त्या पद्धतीद्वारे विविध आठवड्यासाठी काढलेल्या संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाचा (तक्ता क्र. 1) वापर करता येईल.

4) बाष्पीभवन पात्राची गरज ः ज्या भागासाठी संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाची मागील वर्षाची सरासरी आकडेवारी उपलब्ध नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना सरासरी माहितीपेक्षा तंतोतंत माहितीद्वारे पाणी द्यावयाचे असेल त्यांनी आपल्या शेतात बाष्पीभवन पात्र बसविल्यास त्याद्वारे पाण्याच्या बाष्पीभवनाचे मोजमाप करू शकतात. बाष्पीभवन पात्र प्रत्येक शेतासाठी वेगळे बसविण्याची आवश्‍यकता नाही. शेतकरी सामुदायिक पद्धतीने संपूर्ण गावासाठी एकाच बाष्पीभवन पात्राचा उपयोग करू शकतात.

असे असते बाष्पीभवन पात्र ः
1) बाष्पीभवन पात्र 1.2 मीटर व्यासाचे व 30 सें.मी. खोलीचे, दोन्ही बाजूंनी पांढऱ्या रंगाने रंगविलेले असते. हे पात्र लोखंडी पत्र्यापासून बनविलेले असते. हे पात्र शेतात एका लाकडी चौकटीवर ठेवावे. चौकटीखालून हवा खेळती राहील हे बघावे. बाष्पीभवन पात्राच्या मध्यभागी एक दर्शक असतो. या दर्शकाला एक मोजपट्टी बसविलेली असते.
2) बाष्पीभवन पात्र प्रथम दर्शकाचे टोकापर्यंत भरावे (सकाळी 8 च्या दरम्यान). दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मागच्या संपूर्ण दिवसाच्या हवामानाप्रमाणे बाष्पीभवन पात्रामधल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खोल गेली असेल. पाण्याची पातळी किती मिलिमीटरने खाली गेली हे मोजपट्टीच्या साह्याने मोजावे. हे मोजमाप म्हणजे एका दिवसात झालेले पाण्याचे बाष्पीभवन.
3) बाष्पीभवन पात्रामधील पाण्याचे बाष्पीभवन संपूर्ण पीक असणाऱ्या जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षा जास्त असते. असे बाष्पीभवन पात्र लोखंडी असल्याने त्याचे तापमान वाढल्यामुळे तसेच बाष्पीभवन पात्रातील पृष्ठभाग हा संपूर्ण पाण्याचा असल्याने होते; परंतु बाष्पीभवन पात्रामधून होणारे बाष्पीभवन व जमिनीमधून होणारे बाष्पीभवन यामध्ये संबंध आहे. बाष्पीभवन पात्रातून होणारे बाष्पीभवन हे जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या 70 ते 80 टक्के असते. यालाच बाष्पीभवन पात्र गुणांक असे संबोधतात. हा गुणांक 0.7 ते 0.8 इतका घ्यावा. महाराष्ट्रासाठी सर्वसाधारणपणे हा गुणांक 0.75 इतका घ्यावा. बाष्पीभवन पात्रातील बाष्पीभवनास बाष्पीभवन पात्र गुणांकाने गुणल्यास संदर्भीय पर्णोत्सर्जन मिळते.

पीक गुणांक (ब) ः
1) पाण्याची गरज ही पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. सुरवातीच्या काळात गरज कमी असते. जशी वाढ होते तशी गरज वाढत जाऊन पूर्ण वाढ झाल्यावर व फुले-फळे धारणा झाल्यावर गरज थोडी कमी होते.
2) पीक व पिकांच्या अवस्थेप्रमाणे बदलती पाण्याची गरज ही पीक गुणांकाच्या साह्याने लक्षात घेता येते. पीक गुणांक हा साधारणतः पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे 0.2 ते 1.0 च्या दरम्यान असू शकतो.
3) काही महत्त्वाच्या पिकांचा अधिकतम पीक गुणांक खालीलप्रमाणे आहे. चिकू, आंबा, चिंच, नारळ, आवळा व या प्रकारच्या पूर्ण वाढ झालेल्या फळझाडांसाठी 0.65 ते 0.70, संत्रा, मोसंबी, इतर लिंबूवर्गीय पिके व पेरूसाठी 0.75, डाळिंब, बोर व अंजिरासाठी 0.65.

ओलीत गुणांक (क) ः
1) कुठल्याही सिंचन पद्धतीने पिकास पाणी देताना हे त्याच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात द्यावे लागते. प्रवाही व फवारा सिंचन पद्धतीने पाणी हे जमिनीच्या संपूर्ण पृष्ठभागावर द्यावे लागते. त्यामुळे या पद्धतीद्वारे मुळांच्या कार्यक्षम कक्षेसह इतरही भाग ओला होतो; परंतु ठिबक सिंचन प्रणालीमध्ये पाणी तोटीद्वारे मुळाच्या कक्षेमध्ये देता येते. त्यामुळे तोट्यांची संख्या व प्रवाह यांचा व्यवस्थित मेळ घडवून आणून फक्त पिकाच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेतच पाणी देता येते. बाकीचा भाग कोरडा ठेवता येतो.
2) ठिबक सिंचन प्रणालीद्वारे सिंचनाच्या पाण्याची मात्रा काढताना शेताचे किंवा झाडाचे संपूर्ण क्षेत्रफळ गृहित न धरता फक्त जो भाग ओला करावयाचा आहे तेवढाच गृहित धरावा. त्यासाठी एकूण क्षेत्रफळास ओलीत गुणांकाने गुणावे लागते. ओलीत गुणांक 0.1 ते 1.0 एवढा पिकानुसार गृहीत धरावा.
3) ओलीत गुणांक पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसारसुद्धा बदलत जातो. मुख्यत्वेकरून फळझाडांसाठी सुरवातीच्या काळात कार्यक्षम मुळांचे क्षेत्र हे जास्त नसल्याने ओलीत गुणांक हासुद्धा कमी असतो व तो झाडाच्या वयाप्रमाणे वाढत जातो. हा नंतर स्थिर होतो.
4) काही महत्त्वाच्या पिकांचा अधिकतम ओलीत गुणांक ः
1) मध्यम अंतरावरची पिके (उदा. केळी, द्राक्षे) - 0.4 ते 0.6
2) जास्त अंतरावरची पिके (उदा. फळझाडे - डाळिंब, लिंबू) - 0.2 ते 0.4
3) खूप अंतरावरची पिके (उदा. आंबा, नारळ, चिकू) - 0.2 ते 0.25

फळझाडांसाठी झाडांनी व्यापलेले क्षेत्र (ड) ः
एका झाडाने व्यापलेले क्षेत्र हे दोन ओळींमधील अंतर (मीटर) गुणिले एका ओळीतील दोन झाडांमधील अंतर (मीटर) याप्रमाणे काढावे.

ओळीत घेणाऱ्या फळपिकांसाठी एका तोटीचे क्षेत्र (ड) ः
एका तोटीचे क्षेत्र हे उपनळ्यांमधील अंतर (मीटर) गुणिले एका उपनळीवर असलेल्या दोन तोट्यांमधील अंतर (मीटर) याप्रमाणे काढावे.

संचाची कार्यक्षमता (इ) ः
ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा अपेक्षित कार्यक्षमतेसाठी तयार करता येतो. ठिबक संच प्रणालीसाठी लागणारा खर्च व पाणी वापराची कार्यक्षमता याचा योग्य मेळ घालून संचाची अपेक्षित कार्यक्षमता साधारणतः 90 ते 95 टक्के (0.9 ते 0.95) एवढी गृहीत धरावी.
--------------------------------------------------------------------------
उदाहरण ः
मध्यम प्रकारच्या जमिनीत सोलापूर जिल्ह्यात पूर्ण वाढ झालेल्या 4.5 x 3.0 मीटर अंतरावर घेतलेल्या डाळिंब पिकासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (ताण नसताना) ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याची गरज खालीलप्रमाणे काढावी ः
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे संदर्भीय पर्णोत्सर्जन (अ) = 3.77 मि.मी., पीक गुणांक (ब) = 0.65, ओलीत गुणांक (क) = 0.4, झाडाने व्यापलेले क्षेत्र (ड) = 13.5 मी 2, संचाची कार्यक्षमता (इ) = 0.9

एका झाडाला द्यावयाचे पाणी (लिटर) = अ x ब x क x ड = 3.77 x 0.65 x 0.4 x 13.5
ई = 0.9
= 14.7 = 15 लिटर

एका दिवशी एका डाळिंबाच्या झाडाला 15 लिटर पाणी द्यावे. जर प्रतितासाला चार लिटर प्रवाह देणाऱ्या चार तोट्या एका झाडाला बसविल्या असतील तर संच 56 मिनिटे म्हणजे एक तास चालवावा. त्यासाठी खालील सूत्र अवलंबावे ः

संच चालविण्याचा कालावधी = द्यावयाचे एकंदर पाणी (लिटर)
एका तोटीचा प्रवाह (लि./तास) x एका झाडाला बसविलेल्या एकंदर तोट्या
= 15 = 15
4 x 4 = 16
= 0.93 तास किंवा 56 मिनिटे

दोन सिंचनाच्या पाळ्यांमधील कालावधी ः
ठिबक सिंचन पद्धतीने सर्वसाधारणपणे दररोज पाणी देणे अपेक्षित आहे. पण जमिनीच्या प्रकाराप्रमाणे हलक्‍या जमिनीत दररोज पाणी द्यावे, मध्यम जमिनीत एक दिवसाआड पाणी दिले तरी चालू शकते. तसेच भारी जमिनीत दर दोन दिवसांआड पाणी दिले तरी चालू शकते. जेव्हा दोन पाळ्यांमधील अंतर एक दिवसापेक्षा जास्त असेल तेव्हा एका वेळी द्यावयाचे पाणी काढताना एकत्रित दिवसाच्या संदर्भीय बाष्पपर्णोत्सजर्नाचा विचार करावा.
जर वरील उदाहरणासाठी मध्यम प्रकारच्या जमिनीत एक दिवसाआड पाणी द्यावयाचे असल्यास दोन दिवसांचे संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन गृहीत धरावे ते 3.77 x 2 = 6.54 मि.मी. एवढे होईल व त्यासाठी एक दिवसाआड (7.54 x 0.65 x 0.4 x 13.5)/ 9 -- 30 लिटर पाणी द्यावे किंवा एका दिवसाआड संच दोन तास चालवावा.

10/02/2016

बिब्बा वृक्षाची माहिती द्यावी.

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो. पाने काहीशी हृदयाकृती, पानांच्या कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या असतात. फळे एक इंच आकाराची असतात. बी काळ्या रंगाची असते. काजूप्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होते. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळतात.

रंगाने गर्द - काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत. सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 15 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्यानंतर पिशवीत पेरावे. 5 x 8 आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये रोपे तयार करता येतात. रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लावावीत. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत मिसळावे. लागवड मध्यम, हलक्‍या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्‍यकतेनुसार पाणी, खत व्यवस्थापन करावे. पाच-सात वर्षांत झाडे फळे येण्यास सुरवात होते.

10/02/2016

पर्यावरण पूरक बांबू ट्री गार्ड...

बांबूपासून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध होत असून, त्यातून रोजगार निर्मितीसोबतच पर्यावरण संरक्षण होत आहे. वाढणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर बांबू लागवड एक उत्तम पर्याय आहे.
बांबूच्या मुळाच्या विशिष्ट संरचनेमुळे हलक्‍या जमिनीवर बांबूची चांगली वाढ होते.

बांबू ट्री गार्ड ः
- बांबूपासून वृक्षसंवर्धनासाठी विविध प्रकारचे ट्री गार्ड बनविता येतात.
- बांबूपासून तयार केलेले हे ट्री गार्ड स्वस्तात तयार होतात.

1) मॉडेल पीडीकेव्ही/ बिटीजी/ 2 ः
- या प्रकारच्या ट्री गार्डसाठी 10 ते 12 फूट लांबीच्या व 2 ते 3 इंच व्यासाच्या 4 ते 5 परिपक्व झालेल्या बांबूची आवश्‍यकता असते. यासोबतच तीन इंच लांबीचे 12 नट बोल्ट, 100 ग्रॅम दोन इंच लांबीचे खिळे, 100 ग्रॅम बारीक तार व वूड प्रिझर्व्हेटिव्ह (लाकूड परीक्षक) यांची आवश्‍यकता असते.
- अशा प्रकारचे ट्री गार्ड 5 फूट सहा इंच उंच असून, त्रिकोणी आकाराचे असतात.
- एका बाजूची रुंदी 18 इंच असून, एकंदर उपलब्ध लागवड क्षेत्र 1.12 चौरस फूट असते.
- बांबूचे 6 फूट उंच तीन भरीव खांब तयार करून त्यावर आडव्या अर्ध्या पट्ट्यांची शिडी तयार करतात.
- अशा तीन शिड्या नट बोल्टच्या सहायाने बांबूच्या तीन खांबावरती घट्ट बसवून बांबू ट्री गार्ड तयार होतो.
- तयार झालेल्या ट्री गार्डला बांबू प्रिझर्व्हेटिव्हची प्रक्रिया करून ते उपयोगासाठी तयार होतात.
- अशा प्रकारचे ट्री गार्ड 3 ते 5 वर्षे पर्यंत टिकतात.
- ट्री गार्ड तयार करण्यासाठी प्रशिक्षित कारागिरांची आवश्‍यकता असते.

2) मॉडेल पिडीकेव्ही/ बिटीजी/3 ः
- या प्रकारचे ट्री गार्ड आकाराने गोल असतात. अशा प्रकारची ट्री गार्डस तयार करण्यासाठी तीन लांब व हिरव्या बांबूची आवश्‍यकता असते.
- लांब हिरवा बांबू सरळ उभा कापून त्याच्या तीक्ष्ण अवजाराच्या सहाय्याने पातळ (1 मि. मी.) जाडीच्या लांब पट्ट्या तयार करतात.
- सोलून तयार केलेल्या पातळ पट्ट्यांना प्रिझर्व्हेटिव्हची प्रक्रिया करतात.
- ट्री गार्डच्या अधिक मजबुतीसाठी ट्री गार्ड काढून त्याला आडवा करतात, बांबूच्या चार उभ्या कामटी तयार करून त्या सहा पैकी चार खांबांवर बारीक तारेच्या सहायाने घट्ट बांधतात. त्यामुळे ट्री गार्डची वाहतूक व रोपण सुलभ होते.
- या प्रकारच्या ट्री गार्डसच्या निर्मितीसाठी तीन हिरवे लांब बांबू, तार, डांबर व प्रिझर्व्हेटिव्हची आवश्‍यकता असते.

बांबू ट्री गार्ड रोजगार निर्मितीचे साधन ः
- बांबू ट्री गार्डसची निर्मिती हा ग्रामीण क्षेत्रासाठी स्थानिक रोजगार निर्मितीचे चांगले साधन आहे.
- ट्री गार्ड तयार करण्याची पद्धत पूर्णतः नैसर्गिक असून, आवश्‍यक कच्चा माल, बांबू ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होतो.
- गावपातळीवर सुशिक्षित बेरोजगार अल्पशा प्रशिक्षणानंतर असा उद्योग सुरू करू शकतात.
- पडीक जमिनीवर किंवा बांधावर बांबूची लागवड करून बांबूचे उत्पादन घेता येते.
- बांबूआधारित उद्योगातून बेरोजगारी कमी करण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागेल.
- स्थानिक पातळीवर महिला बचत गटासाठी ट्री गार्ड तयार करुन चांगला रोजगार मिळवता येईल.

संपर्क ः डॉ. विजय इलोरकर, 9422831053
(कृषिवनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर)

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Ahmednagar
414003