15/07/2026
गेवराईत ना.पंकजाताई मुंडे यांनी केला विविध विकासकामांचा शुभारंभ, अतिक्रमन धारकांना केले पीटीआरचे वाटप
स्वच्छ, सुंदर आणि प्रगत गेवराई अशी ओळख शहराला मिळवून देणार
'वीज बिल मुक्त नगरपरिषद' उपक्रम राबविण्याची केली सूचना
गेवराईकरांच्या समस्या सोडविण्याची जवाबदारी माझी, सर्वांनी मिळून शहराला विकसित बनवू
गेवराई. दि. १५ जुलै----
गेवराई नगरपरिषद अनेक लोकोपयोगी आणि चांगले उपक्रम राबवित आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी महिला बचत गटांच्या साहाय्याने सुरु असलेला उपक्रम अत्यंत चांगला, कौतुकास्पद आणि पर्यावरणपूरक आहे. लोकसहभागातून असे अनेक उपक्रम राबवून आपण शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रगत शहर अशी ओळख मिळवून देऊ. याकामी नागरिकांनी योगदान देऊन शहर विकासात योगदान द्यावे असे आवाहन करत 'वीज बिल मुक्त नगरपरिषद' अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केली.
गेवराई येथे नगरपरिषदे अंतर्गत होत असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाला.याप्रसंगी गेवराई शहरातील नागरिकांना पीटीआरचे वाटप देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, नगराध्यक्षा गीताभाभी पवार, बाळराजे पवार, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, युद्धाजित पंडित यांच्यासह सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की मी पालकमंत्री असताना गेवराई नगरपरिषदेला आणि मतदारसंघाला भरभरून निधी दिला. नगर परिषदेची इमारत, पाणीपुरवठा योजना, रस्ते, पायाभूत सुविधांसारखी विकास कामे आम्ही इथे केली. ग्रामीण भागात देखील अनेक कामे करता आली. महिला आणि बालविकास मंत्री असताना बचत गटांची चळवळ उभी केली,आज बचत गटांच्या महिलांचे शहर स्वच्छतेसाठी योगदान बघून आनंद वाटतो आहे.
घनकचरा प्रक्रियेच्या माध्यमातून नगरपरिषदेसाठी स्थायी उत्पन्न निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न देखील सोडवणार असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले. गेवराई शहरातील नागरिकांना विश्वास देताना ना. पंकजाताई म्हणाल्या गेवराईकरांच्या समस्या सोडविण्याची जवाबदारी माझी आहे, तुमच्या समस्या मार्गी लावताना दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*विकास कामांचा घेतला आढावा*
-‐----
तत्पूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांनी नगर परिषदेची आढावा बैठक घेतली, शहरातील विकास कामे, योजना यांचा त्यांनी आढावा घेतला. शहराच्या विकासासाठी शॉर्ट टर्म, मिडल टर्म आणि लॉन्ग टर्म' अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
••••