SFI Pune Official

SFI Pune Official

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SFI Pune Official, B. 3/4/5/Umashankar Complex, 594, Narayan Peth, Near Kanyashala, Pune.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) पुणे सर्वांसाठी सुलभ, समावेशक आणि दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही विद्यार्थी कल्याण, सामाजिक न्याय चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी होतो आणि प्रगतीशील मूल्ये, लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देतो.

26/04/2026

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर पुण्यात ‘युवा संवाद’

लोकसभेतील विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेली मतदारसंघ पुनर्रचना, लोकसभा विस्तार आणि महिला आरक्षण ही तीन प्रमुख विधेयके देशाच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी आहेत. या पार्श्वभूमीवर, समाज विज्ञान अकादमी, पुणे येथे 'युवा संवाद' उपक्रमांतर्गत ‘मतदारसंघ पुनर्रचना: का? कशी? आणि त्याचे परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) करण्यात आले होते. याप्रसंगी अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचनेचा भारतीय संविधानातील इतिहास आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती दिली. मतदारसंघ निश्चितीचे नेमके निकष काय असतात ? आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ते कसे असायला हवेत ? यावर त्यांनी प्रकाश टाकला. राज्यकर्त्यांची या विषयावर आजवरची भूमिका आणि सध्याची राजकीय परिस्थिती यातील फरकावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले.

महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना राजकीय पक्षांच्या आणि समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेवर प्रा. पवार यांनी टीका केली. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तर विरुद्ध दक्षिण भारत, हिंदी भाषिक विरुद्ध बिगर-हिंदी भाषिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत विरुद्ध अप्रगत राज्ये अशी जी विषमतावादी फळी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

आगामी काळात 'युवा संवाद' अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्र नियोजन टीम तयार करण्यात येईल, असा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. या चर्चासत्रात १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

#युवाप्रबोधन #मतदारसंघपुनर्रचना #लोकशाही #संविधान #युवासंवाद #राजकारण #महाराष्ट्र

Photos from SFI Pune Official's post 21/04/2026

एसएफआय चे ३० वे पुणे जिल्हा अधिवेशन जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
संस्कृती गोडे यांची जिल्हाध्यक्ष तर अक्षय घोडे यांची सचिव पदी निवड

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) ३० वे पुणे जिल्हा अधिवेशन दि. १३ व १४ एप्रिल रोजी जुन्नर शहरात मोठ्या उत्साहात पार पडले. श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर येथून कॉम्रेड प्रभाकर संझगिरी स्मृती भवनापर्यंत समता रॅली काढून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. रॅलीनंतर एसएफआय चा ध्वज फडकवण्यात आला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआय च्या माजी नेत्या तसेच जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या मरियम ढवळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी साम्राज्यवादी युद्धाचे सर्वसामान्य जनतेवर होणारे परिणाम, शिक्षणाचे बाजारीकरण, धर्मांधता व केंद्रीकरण या मुद्द्यांवर भाष्य करत विद्यार्थ्यांना संघर्षाचे आवाहन केले. उद्घाटन सत्रासाठी एसएफआय चे राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, एसएफआय पुणे चे माजी जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे, माजी अध्यक्ष गणपत घोडे, डीवायएफआय जुन्नर तालुका सचिव राजू शेळके, डीवायएफआय पुणे जिल्हा सहसचिव विलास साबळे, अविनाश गवारी तसेच किसान सभेचे नेते नाथा शिंगाडे, लक्ष्मण जोशी, कोंडीभाऊ बांबळे, मुकुंद घोडे,एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, राज्य समिती सदस्य संदीप मरभळ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्रात शोकप्रस्ताव जिल्हा सचिव अक्षय घोडे यांनी मांडला, तर आभार प्रदर्शन एसएफआय चे पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे यांनी केले.
या अधिवेशनाने २७ सदस्यांची जिल्हा समिती निवडली असून त्यामध्ये १० सदस्यांचे सचिव मंडळ निवडण्यात आले. अधिवेशनामध्ये समाजातील वाढती अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीयवाद याविरोधात लढा तीव्र करणे, वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगारनिर्मिती व रखडलेली शासकीय पदभरती तात्काळ करणे, केजी ते पीजी मोफत आणि दर्जेदार शिक्षणासाठी लढा उभारणे, वसतिगृह व आश्रमशाळांमधील समस्या सोडवणे, विद्यार्थ्यांमधील सोशल मीडियाचे व अमली पदार्थांचे वाढते व्यसन रोखणे, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर उपाययोजना करणे, शुल्कवाढ व आर्थिक लुटीविरोधात संघर्ष उभारणे, एससी/एसटी विद्यार्थ्यांच्या शून्य शुल्काचा प्रश्न सोडवणे, शैक्षणिक संस्थांचे लोकशाहीकरण करून त्या दर्जेदार ज्ञाननिर्मिती करणाऱ्या असाव्यात तसेच महिलांवरील वाढते अत्याचार या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

अधिवेशनाचे निरीक्षण एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष भास्कर म्हसे यांनी केले व शेवटी त्यांनी अधिवेशनाची निरीक्षणे मांडली. त्यानंतर नवीन २७ सदस्यांच्या जिल्हा समितीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी संस्कृती गोडे तर सचिवपदी अक्षय घोडे यांची निवड करण्यात आली. तसेच योगेश हिले (कोषाध्यक्ष), सूरज बांबळे व रोहिदास फलके (उपाध्यक्ष), समीर गारे व गणेश जानकर (सहसचिव), आकाश लोणकर व स्वामी गवारी (सचिव मंडळ सदस्य), निशा साबळे (निमंत्रित सचिव मंडळ सदस्य) यांच्यासह विनायक इरणक, साहिल जोशी, प्रज्वल करवंदे, समीक्षा केदारी, मयुर हिले, प्रियंका गोडे, आशिष वागळे, ऋषिकेश शिंदे, आदित्य कासारे, निकिता मेचकर, बाळकृष्ण गवारी, रोहित जाफरे, समीर माळी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून ४ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
‘हम होंगे कामयाब’ या गीताने व घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात अधिवेशनाची सांगता झाली.

SFI Maharashtra@followers

Photos from SFI Pune Official's post 14/04/2026

जुन्नरमध्ये 'एसएफआय'च्या ३० व्या पुणे जिल्हा अधिवेशनाची समता रॅलीने उत्साहात सुरुवात

'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा' आणि 'सर्वांना शिक्षण, सर्वांना काम' हा नारा देत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) पुणे जिल्हा समितीच्या ३० व्या जिल्हा अधिवेशनाला आज जुन्नर शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रारंभी जुन्नर शहरातून भव्य 'समता रॅली' काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

जुन्नर येथील श्री तुळजाभवानी सभागृह येथे या अधिवेशनाचे उद्घाटन सत्र पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या (AIDWA) राष्ट्रीय नेत्या कॉ.मरियम ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सध्याचे सरकार उद्योगपतींच्या हिताचा निर्णय घेत असून सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावली आहे. देशातील विद्यार्थी आणि युवक समस्येच्या गर्तेत अडकला आहे. अशातच शिक्षणाचे खाजगीकरण होत असून नोकरीचे कंत्राटीकरण सुरू आहे. त्यामुळे शिक्षणाचे खाजगीकरण रोखण्यासाठी आणि नोकरीच्या शाश्वतीसाठी संघटित होऊन लढावे लागले, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष संस्कृती गोडे होत्या तर प्रास्ताविक जिल्हा सचिव अक्षय घोडे यांनी केले.

यावेळी एसएफआय चे महाराष्ट्र राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, राज्य उपाध्यक्ष भास्कर म्हसे, माजी पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, माजी पुणे जिल्हा अध्यक्ष गणपत घोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.

'अभ्यास आणि संघर्ष' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या, विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा आणि सद्यस्थितीतील शिक्षणाचे बाजारीकरण यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून, पुढील दोन दिवस संघटनात्मक बांधणी आणि आगामी आंदोलनांची दिशा यावर मंथन होणार आहे.

या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात किसान सभेचे जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, आदिवासी अधिकार मंचचे संजय साबळे, डीवायएफआय चे विलास साबळे, राजू शेळके, एसएफआय राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, राज्य सहसचिव निशा साबळे, राज्य सचिवमंडळ सदस्य संदिप मरभळ, जिल्हा उपाध्यक्ष रुपाली खमसे, जिल्हा सहसचिव समीर गारे, कोषाध्यक्ष योगेश हिले, जिल्हा सचिवमंडळ सदस्य दिपक वाळकोळी, सूरज बांबळे, आंबेगाव तालुका अध्यक्ष समिक्षा केदारी, जुन्नर तालुका सचिव स्वामी गवारी, पुणे शहर अध्यक्ष आकाश लोणकर, पुणे शहर सचिव गणेश जानकर, खेड चे समीर माळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

11/04/2026

एसएफआय ३० वे पुणे जिल्हा अधिवेशन | जुन्नर

10/04/2026

सह-अभ्यासक्रमाचा निकाल दुरुस्त करण्यात यावा ; एसएफआयची मागणी

मंचर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होऊ नये, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)च्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर युनिटच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले. तृतीय सत्रातील 'सीसी' (Co-Curricular Course) विषयाचा निकाल 'ब्लँक' दिसत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म व फी भरावी लागणार आहे. हि चूक विद्यार्थ्यांची नसून प्रशासनाची आहे, त्यामुळे हा निकाल दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी यावेळी एसएफआय च्या वतीने करण्यात आली आहे.

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांनी 'सीसी' विषयाची परीक्षा नियमितपणे दिली आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावरील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे निकालात हा विषय ब्लँक दर्शवला गेला आहे. सध्या चौथ्या सत्राचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून, या तांत्रिक त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी पुन्हा अतिरिक्त फी भरावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसएफआय च्या वतीने प्राचार्यांना निवेदन देण्यात आलेले आहे, या निवेदनात खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत, १. निकालातील चूक विद्यापीठाची असल्याने विद्यार्थ्यांकडून 'सीसी' विषयासाठी कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाऊ नये. २. निकालातील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे महाविद्यालयाने तात्काळ पत्रव्यवहार करावा. ३. संबंधित विषयाचा निकाल चालू सत्रातच दुरुस्त करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.

‘निकाल दुरुस्त न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल,’ असे यावेळी एसएफआय चे तालुका उपाध्यक्ष आशिष वागळे यांनी सांगितले आहे. या निवेदनाची प्रत माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही पाठवण्यातआली आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन देत म्हटले की, 'तांत्रिक अडचणीमुळे निकालात आलेल्या त्रुटी सोडविण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.'

यावेळी एसएफआय आंबेगाव तालुक्याचे उपाध्यक्ष आशिष वागळे, सहसचिव प्रियंका गोडे, मंचर युनिटचे अध्यक्ष सिद्धार्थ खिलारी, सचिव पल्लवी रोंगटे, उपाध्यक्ष राहुल कवटे, उपाध्यक्ष रेहान खान, सहसचिव विश्वास ढेंगळे, सदस्य संकेत गवारी, जहांगीर शेख आदी विद्यार्थी उपस्थित होते.

27/03/2026
Photos from SFI Pune Official's post 25/03/2026

राजगुरुनगर येथे शहीद दिनी एसएफआय ची एकता रॅली!

राजगुरुनगर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय ) पुणे जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या शहादत दिनी राजगुरुनगर एसटी बस स्थानक ते शहीद राजगुरू जन्मस्थळ अशी एकता रॅली काढण्यात आली.

राजगुरुनगर येथील शहीद स्मारकास अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी रॅलीची पार्श्वभूमी एसएफआय राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे यांनी मांडली. त्यानंतर इन्कलाब जिंदाबाद, शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव अमर रहे, शहीदों के अरमानो को मंजिल तक पोह चाऐंगे, समाजवाद जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद, देश की एकता तूट रही है, नौजवानो एक हो, एक हो के जात, पात, धर्मवाद को फेक दो’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. रॅली मुख्य बाजारपेठेतून राजगुरु वाडा येथे आली.

शहीद राजगुरू यांच्या जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांना किसान सभेचे राज्य सहसचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. ‘शहीदांच्या विचारांना आदर्श मानून एसएफआय काम करत आहे. शहीदांनी देशातील गोरगरीब, कष्टकरी जनतेचं राज्य आले पाहिजे, म्हणून लढा दिला. त्यांचा लढा पुढे घेऊन जात असताना अभ्यास व संघर्ष आवश्यक आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थी शिक्षण, रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबर समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे, यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे’, असे ते म्हणाले.

यावेळी किसान सभेचे खेड तालुका सचिव अमोद गरूड, एसएफआय पुणे जिल्हा अध्यक्ष संस्कृती गोडे, आंबेगाव तालुका सचिव रोहिदास फलके, जुन्नर तालुका सचिव सूरज बांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य सहसचिव निशा साबळे यांनी केले, तर आभार जिल्हा कमिटी सदस्य समीर माळी यांनी व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, जिल्हा कोषाध्यक्ष योगेश हिले, जिल्हा समिती सदस्य समिक्षा केदारी, मोनिका धिंदळे, प्रियंका गोडे, आशिष वागळे, सृष्टी लोखंडे, प्रतिक्षा गवारी, सारिका ढोरे, आदेश हांडे, यशराज काठे, संकेत चिमटे, महेश भारमळ, वैभव पवार, रुपेश मेठल, प्रतीक लोहकरे, स्वप्निल तळपे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
वार – सोमवार | दि.२३/०३/२०२६

23/03/2026

एकता रॅली | शहीद दिन | राजगुरुनगर

23/03/2026

शहीद दिनी विनम्र अभिवादन!

Photos from SFI Pune Official's post 21/03/2026

वार – शुक्रवार | दि.२०/०३/२०२६

एसएफआय आंबेगाव तालुका समितीचे १४ वे तालुका आधिवेशन घोडेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न
अध्यक्षपदी समिक्षा केदारी, सचिवपदी रोहिदास फलके यांची निवड

घोडेगाव : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आंबेगाव तालुका समितीचे १४ वे तालुका आधिवेशन दि.२० मार्च, २०२६ रोजी घोडेगाव शहरात पार पडले. या अधिवेशनाने १५ सदस्यांची तालुका समिती निवड केली, यामध्ये ५ सचिवमंडळ निवडले गेले.

संघटनेचा ध्वज फडकवून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सत्र, प्रतिनिधी सत्र व समिती निवड अशा तीन टप्यात हे अधिवेशन पार पडले. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना एसएफआय चे माजी कार्यकर्ते व वन अधिकारी मा.रईस मोमिन यांनी उद्घाटन सत्रामध्ये ‘आजची सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती व विद्यार्थी चळवळीची भूमिका’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासोबतच भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आंबेगाव तालुका सचिव कॉ. अशोक पेकारी, अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. राजू घोडे, एसएफआयचे पुणे जिल्हा सचिवमंडळ सदस्य दिपक वालकोळी व जिल्हा सहसचिव समीर गारे यांनी निरीक्षण मांडणी केली व अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.

या अधिवेशनात वार्षिक अहवालाचे वाचन करून संघटनेच्या कमजोऱ्या व संघटनेची बलस्थाने यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच पुढील काळात संघटनेची दिशा व लढा काय असावा ? यासाठी ठराव मांडण्यात आले. यावेळी अंगणवाडी सक्षमीकरण व जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीचा व शाळा वाचविण्यासाठीचा लढा तीव्र करा, अनुदानित शाळा - महाविद्यालये, -आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीचा व तेथील समस्या सोडविण्यासाठीचा लढा तीव्र करा, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्रीकीकरण,धर्मांधीकरण व खाजगीकरणाच्या विरोधात लढा तीव्र करा,विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठीचा लढा तीव्र करा, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याना शून्य शुल्क प्रवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लढा तीव्र करा हे ठराव सभागृहात मांडून यावर एकमताने मान्यता घेण्यात आली.

त्यानंतर नवीन समितीचा प्रस्ताव आधिवेशनात मांडून त्यावर एकमताने मान्यता घेऊन तालुक्याची पुढील तालुका समिती नेमण्यात आली. यामध्ये नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष म्हणून समिक्षा केदारी, सचिव रोहिदास फलके यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष आशिष वागळे, कोष्याध्यक्ष मयूर हिले, सहसचिव प्रियांका गोडे, कायम निमंत्रित सचिव मंडळ सदस्य यश गभाले व सदस्य आकाश खामकर, सृष्टी लोखंडे, पवन वायळ, मोनिका धिंदळे, वैष्णवी बुरसे, कुणाल दाभाडे, अभिषेक काळे, तेजल पारधी यांची तालुका समितीचे पदाधिकारी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात एसएफआय पुणे जिल्हा कोषाध्यक्ष योगेश हिले यांनी शुभेच्छा दिल्या, पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे यांनी निरीक्षण मांडले. निकिता मेचकर, अमर माळी यांनी मनोगते व्यक्त केली. या अधिवेशनास तालुक्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधून ६० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने अधिवेशनाची सांगता झाली.

SFI Maharashtra Yogesh Hile Samir Ashabai Machhindra Akshay Ghode

Photos from SFI Pune Official's post 12/03/2026

अखेर पाणी प्रश्न सुटला, प्रशासनाच्या अंमलबजावणी नंतर आंदोलन स्थगित

मंचर : गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मंचर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (SFI) च्या नेतृत्वाखाली पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्यावर यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले आहे.

रात्रभर उघड्यावर ठिय्या
मंचर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (घोडेगाव) अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहाची मुख्य पाईपलाईन फुटल्याने विद्यार्थी पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल २ महिने संघर्ष करत होते. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म राहिल्याने ११ मार्चपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या दिरंगाईचा निषेध म्हणून विद्यार्थिनींनी संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत वसतिगृहाबाहेर उघड्यावर बसून काढली.

प्रशासनाची धावपळ आणि मागण्या मान्य
आंदोलनाचा जोर आणि विद्यार्थिनींचा निर्धार पाहून प्रशासनाला दुसऱ्या दिवशी जाग येऊन, प्रकल्प अधिकारी मा. प्रदिप देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थिनींशी प्रदीर्घ चर्चा केली. प्रशासनाने खालील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत अंमलबजावणी केल्यानंतरच एसएफआय ने आंदोलन स्थगित केले आहे.
• दुसऱ्या दिवशी फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून पाणी वसतिगृहात आले.
• पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून येथील कर्मचारी यांना मा.प्रकल्प अधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत.
• बंद असलेले संगणक कक्षामध्ये लवकरच संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुलींना मा.प्रकल्प अधिकारी यांनी दिले आहे.
• जेवणाच्या दर्जाच्या विषयी सबंधित ठेकेदार यांच्याशी देखील सकारात्मक संवाद साधून आवश्यक बदल करण्याचे आश्वासन भोजन ठेकेदार यांनी मुलींना दिले आहे.
• वसतिगृहातील लाईट फिटिंग व दुरुस्ती एका आठवड्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देखील मुलींना मा.प्रकल्प अधिकारी यांनी दिले आहे.

जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, व पाणी येत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा मुलींनी घेतला होता. मात्र, अखेर प्रशासनाने दुपारी ३ वाजता पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, आंबेगाव तालुका सचिव रोहिदास फलके, समीक्षा केदारी, यश गभाले, आशिष वागळे, प्रियंका गोडे, सृष्टी लोखंडे, मोनिका धिंदळे,पवन वायाळ, एसएफआय मंचर युनिट च्या आदी विद्यार्थिनी यांनी केले.

"प्रशासनाने यापुढे अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यास व दिलेले आश्वासने पूर्ण न केल्यास येत्या १५ दिवसांत याही पेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा SFI च्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान या आंदोलनास अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, डीवायएफआय आंबेगाव तालुका सचिव अविनाश गवारी यांनी उपस्थित राहून मुलींशी संवाद साधत आंदोलनास पाठींबा देखील व्यक्त केला आहे.

Dilip Walse Patil Somnath Nirmal SFI Maharashtra Samir Ashabai Machhindra SFI Ambegaon Taluka Akshay Ghode Avinash Gawari

Photos from SFI Pune Official's post 12/03/2026

वार – गुरुवार | दि.१२/०३/२०२६

पाण्यासाठी मंचरमध्ये आदिवासी मुलींचा एल्गार; रात्रभर थंडीत वसतिगृहाबाहेर ठिय्या

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव अंतर्गत येणाऱ्या मंचर येथील शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रकल्प अधिकारी व प्रकल्प प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (एसएफआय) आंबेगाव तालुका समितीच्या नेतृत्वाखाली ११ मार्च २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींना संपूर्ण रात्र वसतिगृहाच्या बाहेर उघड्यावर बसून काढावी लागली.

पाईपलाईन फुटल्याने प्यायला पाणी मिळेना -
मिळालेल्या माहितीनुसार, मंचर येथील आदिवासी वसतिगृहाची मुख्य पाणी पुरवठा वाहिनी गेल्या दोन महिन्यांपासून फुटलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा विपरीत परिणाम होत असून, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, संगणक कक्ष आणि अभ्यासिका यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचीही येथे वानवा असल्याचे मुली सांगत आहेत.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार -
एसएफआय आंबेगाव तालुका समितीने २२ फेब्रुवारी रोजी प्रकल्प अधिकारी, घोडेगाव यांना लेखी निवेदन देऊन या समस्या मांडल्या होत्या. प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कालपासून (११ मार्च) हे आंदोलन सुरू असून, रात्रीच्या वेळीही विद्यार्थिनी वसतिगृहाच्या बाहेरच ठिय्या मांडून होत्या.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या -
• वसतिगृहाची फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून २४ तास पाणीपुरवठा सुरू करावा.
• कचरा व्यवस्थापन आणि पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी.
• बंद अवस्थेत असलेले संगणक कक्ष आणि अभ्यासिका कक्ष विद्यार्थ्यांसाठी त्वरित खुले करून तिथे आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांची मुलींसोबत चर्चा -
दरम्यान रात्री ०७:३० वा. ते रात्री १०:०० वाजेपर्यत सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. सोनुल कोतवाल यांनी मुलींसोबत संवाद साधून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, वसतिगृहात पाणी येत नाही, तोपर्यत हे आंदोलन सुरूच राहील असे मुलींनी ठरविले आहे.

"आम्ही गरीब घरची मुले शिक्षणासाठी येथे येतो, पण साध्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. प्रशासनाला आमच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काहीही काळजी नाही. जोपर्यंत आमची पाईपलाईन दुरुस्त होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही."
प्रियंका गोडे - आंदोलक विद्यार्थिनी

या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, आंबेगाव तालुका सचिव रोहिदास फलके, समीक्षा केदारी, यश गभाले, आशिष वागळे, प्रियंका गोडे, सृष्टी लोखंडे, मोनिका धिंदळे,पवन वायाळ, एसएफआय मंचर युनिट च्या आदी विद्यार्थिनी करत आहेत.

Sharad Sonawane - शरद सोनवणेDilip Walse PatilDr.Amol KolheDevendra FadnavisSFI Ambegaon TalukaDYFI MaharashtraSFI - Students' Federation of India SFI Maharashtra Samir Ashabai Machhindra Navnath More

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

B. 3/4/5/Umashankar Complex, 594, Narayan Peth, Near Kanyashala
Pune
411030