15/04/2018
ग्रामपंचायत केळी रूम्हणवाडी
ग्रामपंचायतीची घरपट्टी,पाणीपट्टी आणि इतर कर का भरावेत?
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो.
गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागवू शकते, तसेच जर ग्रामपंचायतला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते.
गावात ज्यावेळी एखादा नागरिक ग्रामपंचायतला कुठल्या कामानिमित्त किंवा प्रमाणपत्र मागणीसाठी जातो, त्यावेळी त्याला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच घरपट्टी, पाणीपट्टी, इत्यादी करांचा भरणा करावयास सांगतात, त्यावेळी त्या नागरिकाची अशी भावना होते की, ग्रामसेवक किंवा सरपंच मला मुद्दामहून अडथळा आणत आहे, वास्तविक पाहता, जर अशा नागरिकाने आधीच ग्रामपंचायतीचा कर भरलेला असेल तर त्या त्या वर्षात वर्षभर त्याला ग्रामपंचायत सुद्धा कराची मागणी करणार नाही आणि फक्त प्रमाणपत्राची फीस भरून त्याला नियोजित वेळेत प्रमाणपत्र ही उपलब्ध होऊ शकेल. आणि नागरिकांचा गैरसमज सुद्धा होणार नाही, की ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच हे त्यांची अडवणूक करत आहेत म्हणून.
कर जर नाहीच भरला तर?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी ५% व्याजसुद्धा भरावे लागते. तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्तीसुद्धा करू शकते. आणि अशा कार्यवाहीचा खर्चही वसूल केला जातो.
कर न भरल्यामुळे एक तर आपली कराची रक्कम वाढत जाते, त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो, आणि जप्तीसुद्धा होऊ शकते, आणि एव्हढे होऊनही शेवटी कराची रक्कम भरावीच लागते.
त्यापेक्षा जर आपण आपला कर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात भरला तर आपल्याला घरपट्टीच्या चालू रकमेवर ५% सूट सुद्धा मिळते. मार्चपर्यंत भरला तर दंडही लागत नाही आणि आपण ग्रामपंचायतला कधीही कुठल्याही कामासाठी गेलो तरी कुणी आपल्याला कर भरा म्हणून तगादाही लावणार नाही.
ज्या गावात ग्रामपंचायतच्या करांचा भरणा लोक स्वइच्छेने करतात, ते गाव नक्कीच प्रगतीपथाकडे अग्रेसर असते, हे सांगण्यासाठी कुणाही ज्योतिषाची गरज नाही. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एका सक्षम गावाची निर्मिती होत असते.
त्यामुळे ग्रामपंचायतीच्या करांचा भरणा करून आपली ग्रामपंचायत आणि गाव अधिक सक्षम करुया
24/03/2018
सर्व धर्म समभाव , सबका मालिक एक है व भारत देशाच्या एकता संदेश देण्यासाठी ग्रामपंचायत केळी रुम्हणवाडी येथून दरवर्षी राम नवमीला साईबाबांची पायी पालखी दिंडी शिर्डीला निघत असते. सदरील दिंडीत अकोले पचांयत समिती सभापती रंजनाताई भरत मेंगाळ, अकोले तालूक्याचे यूवा नेतृत्व व केळी रुम्हणवाडीचे माझी सरपंच भरत मेंगाळ साहेब , ग्राम विकास अधिकारी बैरागी भाऊसाहेब, सूनिता बैरागी मॕडम , केळी रुम्हणवाडीचे सर्व ग्रामस्थ व ग्रामसेवक दिपेश पिटेकर हे उपस्थित होते
20/03/2018
केळी रुम्हणवाडी या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकोले अंतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्य , कुटुंब नियोजन , कायदे विषयक प्रशिक्षण सन २०१७-२०१८
15/03/2018
ग्रामपंचायत केळी रुम्हणवाडी
स्वच्छ गाव सुंदर गाव आदर्श गाव
12/03/2018
आमचा गाव-आमचा विकास’ गावांच्या
विकासासाठी लोक सहभागीय उपक्रम
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे.
महाराष्ट्राने पंचायत राज संस्थेची मुहूर्तमेढ रोवल्याने राज्याला गौरवशाली परंपरा आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे देशातील एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा पातळीवर धोरणात्मक निर्णय, तालुका स्तरावर पर्यवेक्षकीय कामकाज व ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. चौदाव्या वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार केले तर मिळणाऱ्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
ग्रामपंचायतींना त्यांच्या स्व:उत्पन्नाच्या बाबीशिवाय चौदाव्या वित्त आयोगांतर्गत मोठ्या प्रमाणावर अबंधित / मुक्तनिधी प्राप्त होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीच्या नियोजनाचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यामुळे ग्रामस्तरावर लोकसहभागातून गावांच्या गरजा, उपलब्ध साधनसामग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करुन परिपूर्ण आराखडे तयार होणे आवश्यक आहे.
‘आमचा गाव आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीचे सन 2015-20 या कालावधीचे ग्रामपंचायत पंचवार्षिक विकास आराखडा व प्रत्येक वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी गावातील शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, महिला, युवक-युवती, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांशी विविध स्तरावर विचारविनिमय केला जाणार आहे. त्यातून गावांच्या गरजांची निश्चिती व अपेक्षित उत्पन्न अंदाज घेवून प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. म्हणून हे सर्वसमावेशक आराखडे तयार व्हावेत, यासाठी नांदेड येथे नुकतीच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभार्थी हा महत्वाचा घटक आहे. त्या योजनांच्या फलनिष्पतीसाठी लाभार्थ्यांचा सक्रिय सहभागही आवश्यक असल्याने ग्रामसभेच्या माध्यमातून नियोजन करुन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. लघुसिंचन, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, लघू व कुटीर उद्योग, पिकाचे पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, इमारती व दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि अपारंपारिक ऊर्जा या चौदा विषयासंबंधीच्या मुलभूत सेवा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आलेली आहे. या सेवा नियमितपणे व प्रभावीपणे देण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांना उपलब्ध होत असलेल्या स्वत:च्या नियंत्रणाखाली असलेल्या निधीचा सुयोग्य वापर करावयाचा आहे. म्हणून सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सेवेसंबंधीच्या योजनांचे योग्य नियोजन आराखड्यात करावयाचे आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर एक ग्राम संसाधन गट स्थापन केला जाणार आहे. या गटातील सदस्यांना क्षमता बांधणीसाठी त्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती गणासाठी एक प्रशिक्षक व एक प्रभारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्यात 25 जून ते 25 ऑगस्ट 2016 पर्यंत या कामासाठी नियुक्त केलेले संबंधीत अधिकारी, कर्मचारी ग्राम संसाधन गटातील सदस्य गावाच्या विकासाचे हे आराखडे लोकसहभागातून तयार झालेल्या प्रारुप ग्रामपंचायत विकास आराखड्यास ग्रामसभा मान्यता देणार आहे.
या आराखड्यास गट स्तरावरील तांत्रिक छाननी समितीने योग्य असल्याचे मान्य केल्यानंतर संबंधीत ग्रामपंचायतीस ग्रामसभेच्या अंतिम मान्यतेसाठी व जिल्हा परिषदेकडे संकलनासाठी पाठविला जाईल. हे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेसमोर आराखड्याचे सादरीकरण करुन मान्यता घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर ग्रामपंचायती अधिक सक्षम बनविणारी ‘आमचा गाव आमचा विकास’ हा उपक्रम सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून निश्चित यशस्वी होईल. त्याचबरोबर शासन देत असणारा निधी, ग्रामपंचायतीचा स्व: निधी यातून गावात मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध होतील, लाभार्थी समाधानी होवून गावाचे रुप पालटण्यास मोलाची मदत होईल.
12/03/2018
आपल्याला हे माहीत हवे ग्रामसभा म्हणजे काय..? जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात. माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल. अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही. वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत. २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन १ मे - कामगार दिन १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन २ ऑक्टोबर - गांधी जयंती या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते. सभेचा अध्यक्ष आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. ग्रामसभेत कसे बोलावे ? ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे. सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही. सभेचे कामकाज ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील. अत्यंत महत्वाचे - पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी. ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात. ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो. आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही. आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात. आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते. आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी.
11/03/2018
केळेश्वर मंदिर केळी रुम्हणवाडी.
देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात महाराष्ट्रात बांधलेली हेमाडपंथी मंदिरे नजर खिळवून ठेवतात . या शैलीने यानंतरही जादू कायम ठेवल्याने यादवांच्या राज्यानंतरही स्थानिक संस्थांनिकांनी बांधलेली मंदिरे याच शैलीत बांधलेली आहेत . यातील काहीच मंदिरांचे वैभव अजूनही टिकून आहे . ही मंदिरे व हेमाडपंथी स्थापत्यशैली अकोले तालुक्याच्या वैभवाला लाभलेले कौंदणच आहे .
भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो .
देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाते . सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून , त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते . मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते हेही हेमाडपंती स्थापत्यशैलीचे वैशिष्ट आहे .
कोकणचा शेजार लाभलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले (जि. अहमदनगर) तालुक्याला जसे अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान मिळाले आहे; त्याबरोबरच वैभवशाली इतिहास आणि समृद्ध वास्तुरचनेचाही वारसा लाभला आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, विश्रामगड यांसारखे लहान-मोठे दीड डझन गडकिल्ले आणि हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड), सिद्धेश्वर (अकोले), अमृतेश्वर (रतनवाडी) यांसारखी अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे याचीच साक्ष देतात. हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीची विविध वैशिष्टय़े केळी रुम्हणवाडी येथील केळेश्वर मंदिराच्या बांधकामातही आढळतात. बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. कापलेले व कोरीवकाम केलेले दगड विशिष्ट पद्धतीने एकात एक बसवून संपूर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे.
सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १ हजार ६४६ मीटर) असणा-या शिखर स्वामिनी कळसूबाईपासून काही अंतरावर आहे पट्टाकिल्ला ऊर्फ विश्रामगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला हा अकोले तालुक्यातील एकमेव किल्ला. या विश्रामगडाच्या परिसरातच आढळा नदी उगम पावते. येथून काही अंतरावर आहे केळी रुम्हणवाडी हे खेडेगाव. या खेडय़ातच आढळा नदीच्या काठावर अप्रतिम शिल्पसौंदर्याचा आविष्कार असणारे पुरातन देखणे केळेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला प्राचीन धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. केळेश्वर हे नाव कोडेश्वर या नावावरून आलेले असावे असे म्हटले जाते. कारण या मंदिराच्या शेजारीच एक प्रसन्न असे तीर्थ आहे. या तीर्थाला पूर्वी बाराही महिने पाणी असायचे. या पाण्यात अंघोळ केल्याने विविध त्वचारोग बरे होतात असा विचार प्रचलित आहे. त्यामुळे अनेक अंगावर कोडे झालेल्या व्यक्ती या तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी येतात. तसेच केळेश्वर या नावावरून ‘केळी’ व नदीचा आकार नांगराच्या रुम्हण्यासारखा असल्याने ‘रुम्हणवाडी’ असे ‘केळी रुम्हणवाडी’ हे नाव गावाला पडले असावे.
अकोले येथून केळी रुम्हनवाडी ३५ किमी अंतरावर आहे. मुंबई, नाशिकवरून इगतपुरी-घोटी मार्गाने टाकेदजवळचा म्हैसवळण घाट चढूनही केळी रुम्हनवाडीला पोहोचता येते. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील टाहाकारीचे मंदिरही येथून फक्त ३ किमी अंतरावर आहे. मंदिर बाराव्या अथवा तेराव्या शतकात बांधले गेले असावे. काळाच्या ओघात मंदिराच्या बाह्य़स्वरूपात काही बदल झाले. मंदिरावरची मूळची ४ शिखरे पडून गेली. मूळच्या शिखरांच्या जागी नव्याने बांधलेल्या कळसांना व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिराचे प्राचीन वैभव काही प्रमाणात लुप्त झाल्याचा आपणास भास होतो. तथापि शिखरापर्यंतचा मंदिराचा मुख्य दगडातील भाग आजही मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. समोरूनच आढळा नदी वाहते. नदीपासून सुमारे ३०-४० फूट उंचीवर मंदिर उभे असून नदी पात्रालगत बांधलेला घाट, समोरच पावसाळ्यात फेसाळणारा नयनरम्य धबधबा, झाडे आणि सभोवताली असलेल्या डोंगररांगा यामुळे हा परिसर रमणीय बनला आहे.
10/03/2018
विकास कामा बाबत चर्चा करताना जिल्हा परिषद अदयक्षा शालिनीताई विखे मॕडम , जिल्हा परिषद उपादयक्षा राजश्रीताई घुले मॕडम , ग्रामसेवक दिपेश पिटेकर.
10/03/2018
अकोले तालुक्याचे आमदार मा.श्री. वैभवराव पिचड साहेब , ग्रामसेवक दिपेश पिटेकर म्हाळूंगी नदीचे जल पुजन करताना....
10/03/2018
अकोले तालूक्याचे आमदार मा.श्री .वैभवराव पिचड साहेब यांच्या मातोश्री मा.सौ. पिचड मॕडम यांनी ग्राम पंचायत केळी रुम्हणवाडीला भेट दिली असता त्यानी पचायत समिती सभापती मा.सौ. रंजनाताई भरत मेंगाळ व सरपंच शकुंतला परते व ग्रामसेवक पिटेकर दिपेश यांच्याशी गावच्या विकास कामाबाबत चर्चा केली. त्यांनी केळी रुम्हणवाडीच्या विकास कामाबाबत समाधान व्यक्त केले व पुढील विकास कामास शुभेच्छा दिल्या . पचायत समिती सभापती मा.सौ.रंजनाताई भरत मेंगाळ यांच्या हस्ते गावच्या वतिने मा.सौ.पिचड मॕडम यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास अकोले तालूक्याचे यूवा नेतृत्व भरत मेंगाळ साहेब , जनार्दन परते, हे उपस्थित होते.