12/07/2026
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर समिती शिष्टमंडळ कडून मोशी कचरा डेपो दुर्घटना ची पाहणी करून रीत सर अहवाल बनवला आहे...
आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर
मोशी कचरा डेपो दुर्घटना – पाहणी अहवाल व अतिरिक्त मुद्दे
दिनांक : 11/07/2026
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने दि. 11/07/2026 रोजी मोशी कचरा डेपोला भेट देऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. पाहणीदरम्यान प्रशासनाचा निष्काळजीपणा, सुरक्षेतील गंभीर त्रुटी आणि संभाव्य अनियमितता निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर खालील निरीक्षणे व प्रश्न प्रशासनासमोर मांडत आहोत.
अ) पाहणीत निदर्शनास आलेले प्रमुख मुद्दे
1. पीडित कुटुंबांची उपासमार :
गेटबाहेर थांबलेल्या नातेवाईकांसाठी पिण्याचे पाणी, जेवण, निवारा किंवा मूलभूत सुविधांची कोणतीही व्यवस्था PCMC प्रशासनाने केली नव्हती. अनेक कुटुंबीय 48 तासांहून अधिक काळ उघड्यावर थांबले होते.
2. धोकादायक बांधकाम :
पडलेल्या इमारतीचे आणि कचऱ्याच्या डोंगराचे अंतर अत्यंत कमी होते. संबंधित इमारतीला आवश्यक Occupation Certificate (OC) नसताना ती उभारण्यात आल्याची माहिती समोर आली असून याची चौकशी होणे आवश्यक आहे.
3. दुर्घटनेपूर्वी धोक्याची माहिती :
कचऱ्याचा डोंगर मागील 4–5 दिवसांपासून सरकत असल्याची माहिती कामगारांनी तोंडी व लेखी स्वरूपात दिल्याचे सांगितले जाते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली का, याची चौकशी व्हावी.
4. CCTV फुटेज सार्वजनिक नाही :
दुर्घटनास्थळी CCTV यंत्रणा असतानाही संबंधित फुटेज अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. पुरावे सुरक्षित ठेवून ते तातडीने जाहीर करण्यात यावेत.
5. कामगारांच्या सुरक्षेचा अभाव :
कामगारांकडे आवश्यक मास्क, गमबूट, हातमोजे, हेल्मेट तसेच मिथेन व इतर विषारी वायूंसाठी आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध नव्हती.
6. कचरा व्यवस्थापनातील अनियमितता :
ओला, सुका व बांधकाम कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण होत नसल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
7. माहितीतील विसंगती :
मृत, जखमी व बेपत्ता व्यक्तींची अधिकृत आणि अद्ययावत माहिती प्रशासनाकडून स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
8. सुरक्षा यंत्रणेचा अभाव :
धोक्याच्या सूचना, इशारा फलक, गॅस मॉनिटरिंग प्रणाली किंवा इतर आवश्यक सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे दिसून आले.
9. प्रकल्पाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न :
काही यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. सांडपाणी व्यवस्थापन व प्रकल्पाची एकूण कार्यक्षमता याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
ब) पाहणीदरम्यान ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत असे महत्त्वाचे प्रश्न
10. कंत्राटदाराची जबाबदारी :
मोशी डेपोचे कंत्राट कोणत्या संस्थेला देण्यात आले? संबंधित कंत्राटदाराची पात्रता काय होती? कामगारांचा विमा, PF व इतर कायदेशीर बाबींचे पालन झाले होते का?
11. पर्यावरणीय नियमांचे पालन :
NGT व MPCB च्या नियमांनुसार Leachate Treatment Plant कार्यरत होता का? परिसरातील भूजलाची तपासणी शेवटची कधी करण्यात आली?
12. आगीच्या धोक्यावरील तयारी :
मिथेन गॅस साठण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन निर्गमन मार्ग आणि मॉक ड्रिलची अंमलबजावणी झाली होती का?
13. वैद्यकीय सुविधा :
डेपोमध्ये 24x7 प्राथमिक उपचार केंद्र किंवा रुग्णवाहिका उपलब्ध होती का? कामगारांची नियमित आरोग्य तपासणी केली जात होती का?
14. प्रवेश नोंद प्रणाली :
डेपोमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जात होती का? बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली कार्यरत होती का?
15. वजन काटा व कचरा मोजणी :
कचऱ्याच्या वजन काट्यावरील CCTV व डिजिटल नोंदी सार्वजनिक का करण्यात येत नाहीत? बाहेरील बांधकाम कचरा डेपोमध्ये कशाच्या आधारावर स्वीकारला जात होता?
16. माहिती लपवली जात आहे का? :
दुर्घटनेशी संबंधित माहिती वेळेवर व पारदर्शकपणे जाहीर न होण्यामागील कारणांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
क) आम आदमी पार्टीच्या ठोस ५ मागण्या
1. तात्काळ गुन्हा दाखल :
जबाबदार अधिकारी व संबंधितांवर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
2. न्यायालयीन चौकशी :
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी.
3. मोशी डेपोबाबत दीर्घकालीन निर्णय :
मोशी डेपोच्या सुरक्षिततेचे स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण करून पर्यायी कचरा प्रक्रिया प्रकल्पाची जागा तातडीने निश्चित करण्यात यावी.
4. पीडित कुटुंबांना मदत :
प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला ₹50 लाख आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्यास कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
5. CCTV फुटेज सार्वजनिक करावे :
दुर्घटनेशी संबंधित सर्व CCTV फुटेज सुरक्षित ठेवून कायदेशीर प्रक्रियेनंतर सार्वजनिक करण्यात यावे.
आपला विश्वासू,
वैजनाथ शिरसाट
शहर अध्यक्ष
आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर
स्वप्निल जेवळे
महासचिव
आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर