Collector Raigad

Call Directions Website Contact the organization

Collector Raigad Shri Kishan N. Jawale, Collector & DM, Raigad (Official Account)

*महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढा*     *-जिल्हाधिकारी किशन जावळे**महात्मा ज्योति...
06/10/2026

*महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढा*
*-जिल्हाधिकारी किशन जावळे*

*महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ*

रायगड-अलिबाग,दि.6 (जिमाका) : वर्षानुवर्षे महसूल विभागाकडे प्रलंबित असलेली छोटी-मोठी प्रकरणामध्ये किरकोळ कारणांमुळे वाद वाढवत नेल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च होते. पक्षकारांनी महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून परस्पर सामोपचाराने, संवादातून आणि सलोख्याच्या भूमिकेतून ही प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अनंत पाटील (प्रभारी), अँड मच्छिंद म्हात्रे आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, अनेक वेळा जमिनीचा वाद, मालमत्तेशी संबंधित छोटासा प्रश्न किंवा इतर किरकोळ कारणांमुळे पक्षकारांमध्ये वाद निर्माण होतो. पूर्वजांची समान मालमत्ता किंवा एकच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेला वाद वर्षानुवर्षे सुरू राहिल्यास त्याचा परिणाम केवळ संबंधित प्रकरणापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. एखाद्या प्रकरणासाठी वारंवार कार्यालये, न्यायालये आणि वकिलांकडे जावे लागल्याने पक्षकारांचा मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होतो. प्रवास, वकिलांची फी आणि अन्य खर्चामुळे आर्थिक नुकसान होते. त्याचबरोबर कुटुंबासाठी, शेतीसाठी, व्यवसायासाठी किंवा अन्य उत्पादक कामांसाठी देता येणारा वेळही वाया जातो. त्यामुळे छोट्या-मोठ्या वादांना प्रतिष्ठेचा प्रश्न न बनविता परस्पर संवादातून तोडगा काढणे अधिक हिताचे असल्याचे ते म्हणाले.
महसूल प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यामुळे संबंधित कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मोठा वेळ त्यामध्ये खर्च होतो. वारंवार न्यायालयात किंवा कार्यालयात जाणे, वकिलांशी संपर्क साधणे आणि त्यासाठी होणारा खर्च याचा परिणाम कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावरही होतो. कुटुंबाच्या प्रगतीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, शेती व उत्पादनक्षम कामांसाठी किंवा व्यवसायासाठी वापरता येणारी ऊर्जा आणि वेळ वादामध्ये खर्च होतो.त्यामुळे पक्षकारांनी आपापसांतील मतभेद सामोपचाराने सोडवून पुढील पिढ्यांपर्यंत वादाचे ओझे जाऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. परस्परांमध्ये सलोखा निर्माण करून प्रकरण कायमस्वरूपी संपविल्यास कुटुंबातील वातावरणही सकारात्मक राहते आणि संबंधित व्यक्तींना पुढील आयुष्यात अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती करता येते, असेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच प्रांताधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच नायब तहसीलदारांच्या स्तरावरही महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणांच्या निवारणाची कार्यवाही सुरू आहे. संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी केले.
हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले आणि त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
00000000

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगा...
29/09/2026

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

रायगड-अलिबाग, दि.29(जिमाका) : राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कोकण आणि नाशिक विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला. त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील रोजगार महाकुंभाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात करण्यात आला.

युवकांनी केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता विविध क्षेत्रांतील कौशल्य आत्मसात करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

सेवा संकल्प अभियान (१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६) अंतर्गत आज कोकण आणि नाशिक विभागात एकाच दिवशी ४०० पेक्षा अधिक ठिकाणी आणि रायगड जिल्ह्यात १२ ठिकाणी रोजगार मेळावे /प्लेसमेंट आयोजित करण्यात आले आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले.

एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना विविध उद्योग, आस्थापना व रोजगारदात्यांशी थेट संवाद साधण्याची आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. ॲड. गौतम पाटील, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य सोनाली पाटील, उपप्राचार्य श्री. गायकवाड, विविध उद्योगांचे प्रतिनिधी, कौशल्य विकासाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने युवा विद्यार्थी व रोजगाराच्या शोधात असलेले उमेदवार उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बदलत्या रोजगाराच्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता, तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य, संगणकाचे ज्ञान आणि उद्योगाच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निश्चित करून त्यामध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

कौशल्यामुळे रोजगारक्षमतेत वाढ

ग्रामीण तसेच शहरी भागात विविध प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. प्लंबिंग, विद्युत काम, वाहन दुरुस्ती, संगणक, तांत्रिक सेवा, क्रीडा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे युवकांनी आपल्या अंगभूत क्षमता आणि सर्जनशीलतेचा उपयोग करून एखाद्या कौशल्यात प्रावीण्य मिळवावे. एखाद्या कामात कौशल्य आणि प्रावीण्य प्राप्त केल्यास त्या व्यक्तीची रोजगारक्षमता वाढण्याबरोबरच समाजातही त्याचे स्वतंत्र स्थान निर्माण होते.

युवक आणि उद्योग क्षेत्रामध्ये थेट दुवा

रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवक आणि विविध उद्योगांचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यात येत आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी उपलब्ध संधींची माहिती घेऊन संबंधित उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा, आपला बायोडाटा सादर करावा आणि मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावे. उमेदवारांनी स्वतःच्या कौशल्यांची प्रभावी मांडणी करून आपल्या क्षमतेनुसार योग्य रोजगाराची संधी मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी केले.

रोजगार महाकुंभातून कौशल्याला संधी

या रोजगार महाकुंभाचा उद्देश युवकांच्या कौशल्याला योग्य रोजगाराची संधी मिळवून देणे तसेच उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आहे. युवक, प्रशिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी मेळाव्यामध्ये सहभागी संस्थांच्या विविध स्टॉल्सना भेट देऊन उपलब्ध रोजगार व भरती प्रक्रियेची माहिती घेतली.

राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. कार्यक्रमास विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

नवमतदार नोंदणीला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करा- विभागीय आयुक्त रुबल अग्रवालपनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार या...
29/09/2026

नवमतदार नोंदणीला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करा- विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल
पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

रायगड-अलिबाग, दि. २९ (जिमाका) : नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत तसेच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून नाव नोंदणीच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.

मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांना भेट देऊन संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त (प्रशासन) फरोग मुकादम, १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पवन चांडक, १९० उरण विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अवी कुमार सोनवणे, तहसीलदार मीनल भामरे, जितेंद्र इंगळे, उद्धव कदम, नायब तहसीलदार संभाजी शेलार तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवमतदार नोंदणीला गती द्या
विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर दिला. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात यावी. वाढवून दिलेल्या मुदतीचा, म्हणजेच १२ ऑक्टोबरपूर्वीचा कालावधी प्रभावीपणे वापरून बीएलओंनी गृहभेटींना गती द्यावी, पात्र मतदारांची आवश्यक कागदपत्रे तसेच नवमतदारांसाठी फॉर्म क्रमांक ६ संकलित करण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पात्र नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन क्षेत्रीय पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

सहा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेट

१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील कामोठे येथील सहा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांना विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांना मतदार नोंदणीसंदर्भातील सेवा व मार्गदर्शन अधिक सुलभतेने मिळावे, यासाठी कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करून त्यामध्ये आवश्यक वाढ करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना केल्या.

न्यू इंग्लिश स्कूलमधील दहा मतदान केंद्रांची पाहणी
विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील दहा मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी कार्यरत बीएलओंशी संवाद साधून मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षणाच्या कामाचा आढावा घेतला. संबंधित बीएलओंकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या बाबींवर मार्गदर्शन केले.

पनवेल व उरण मतदारसंघातील कामकाजाचा आढावा
उपविभागीय अधिकारी कार्यालयात १८८ पनवेल आणि १९० उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
**

28/09/2026

📢 जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी ‘रोजगार महाकुंभ'
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील १२ ठिकाणी रोजगार मेळावे १४९ कंपनी नोंदणी.
🎓 SSC, HSC, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, फार्मसी व विविध पदवीधारकांसाठी रोजगार व अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध.
#रोजगारमहाकुंभ #सेवासंकल्प

28/09/2026

Asian Games मध्ये 10 मीटर रायफल शूटिंगच्या सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या रायगडच्या खेळाडू पार्थ माने याचा आज जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घरी जाऊन सत्कार करण्यात आला. 🥈

पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पार्थचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 🇮🇳

28/09/2026

रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरिता संपादन होणाऱ्या क्षेत्राचे मोबदला देण्याचे काम सुरू

रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका) :- रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरिता संपादन होणाऱ्या क्षेत्राचे मोबदला देण्यात काम उपविभागीय अधिकारी कार्यालय अलिबाग येथे सुरु असून मिळकतीमध्ये ज्या व्यक्तींचा हितसंबंधअसल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची हरकत उपस्थित करावयाची असल्यास उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात आवश्यक त्या पुराव्यांसह हरकत दाखल कराव्यात असे आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केल आहे.

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) नुसार खालील गावातील बाधित खातेदारांना भूसंपादन मोबदला स्विकारण्याबाबत नोटीस या कार्यामार्फत दि.2 सप्टेंबर 2026 रोजी बजाविण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मौजे चौल ता.अलिबाग व मौजे सावली व टोकेखार ता.मुरुड येथील खातेदारांमार्फत भूसंपादन मोबदला स्वीकारण्याकामी संमती पत्र/करार पत्र प्राप्त सादर केलेली आहेत. उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात प्राप्त संमती पत्रामधील खातेदारांना भूसंपादन मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू आहे.

मौजे चौल, ता.अलिबाग व मौजे सावली, टोकेखार, ता.मुरुड येथील खातेदारांनी नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे मिळकतीचा मोबदला स्विकारणेकामी जिल्हास्तरीय समितीने मंजूरी दिलेला दर मान्य असल्यास संबंधितांनी आपले संमतीपत्र उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या कार्यालयात मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच दि.1 ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया वगळून) समक्ष उपस्थित राहून सादर करावे, असे उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी कळविले आहे.



0000

28/09/2026

पनवेल-खारघर मध्ये 5 ठिकाणी रोजगार महाकुंभ भव्य रोजगार मेळावे

रायगड-अलिबाग,दि.28(जिमाका) : सेवा संकल्प अभियान अंतर्गत दि .29 सप्टेंबर पनवेल-खारघर मध्ये महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, प्लॉट नं. 2 व 3, सेक्टर 16, ठाणा नाका जवळ, खांदागाव, न्यू पनवेल, ITM स्किल्स युनिव्हर्सिटी, प्लॉट 25 व 26, सेक्टर 4, खारघर,) MGM एज्युकेशनल कॅम्पस, 3 रा मजला, प्लॉट 1 व 2, सेक्टर-01, कामोठे, हसमुख भवन, 3 रा मजला, सिडकोच्या मागे, हिरानंदानी पार्क जवळ, सेक्टर 4, खारघर या पाच ठिकाणी रोजगार महाकुंभ रोजगार मेळावे संपन्न होणार असून याचा इच्छूकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल वि.द.टिकोले यांनी केले आहे.

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि.29 सप्टेंबर2026 रोजी राज्यभरात 800 ठिकाणी "रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र" रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या दिवशी सकाळी 8.00 वाजता सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपले आधारकार्ड, बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून इच्छुक उमेदवारांना तात्काळ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

0000000

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळेकेंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण...
24/09/2026

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळे
केंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

रायगड-अलिबाग,दि.24 (जिमाका) : रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अहवालातील वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापनासाठी हा अहवाल अत्यंत उपयुक्त असून, त्यातील निष्कर्षांचा विकासकामे व नियोजनात उपयोग करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) तर्फे राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह जिल्हा व राज्यस्तरीय विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

भूजल उपलब्धता व जलधारक स्तरांची वैज्ञानिक माहिती

कार्यशाळेच्या प्रारंभी केंद्रीय भूजल मंडळ, पुणेच्या पौर्णिमा बराहाते यांनी रायगड जिल्ह्यातील जलधारक स्तरांचे नकाशांकन विषयावर सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील भूजल उपलब्धता, जलधारक स्तरांची स्थिती, भूजल पातळी, भूजल गुणवत्ता, पुनर्भरण क्षमता, भूजल उपशाची स्थिती तसेच विविध भागांतील भूजल व्यवस्थापनाच्या गरजांबाबत वैज्ञानिक माहिती सादर करण्यात आली.

NAQUIM अंतर्गत संकलित माहितीचा नियोजनासाठी उपयोग

हेमलता व्ही. यांनी NAQUIM अंतर्गत माहिती प्रसार विषयावर सादरीकरण केले. कार्यक्रमांतर्गत संकलित व विश्लेषित केलेल्या वैज्ञानिक माहितीचा उपयोग जिल्हा प्रशासन तसेच विविध विभागांच्या नियोजन प्रक्रियेत कशा प्रकारे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विभागीय समन्वयातून भूजल संवर्धनावर भर

कार्यशाळेत कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच इतर संबंधित जिल्हा व राज्यस्तरीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले. स्थानिक भूजल परिस्थितीचा विचार करून विविध विभागांच्या योजनांमध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि भूजल स्रोतांचे संरक्षण याबाबत उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

भूजल संवर्धन व शाश्वत वापरासाठी अहवालाचा उपयोग

NAQUIM अंतर्गत तयार करण्यात आलेली माहिती भूजल संवर्धन, कृत्रिम भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण, सिंचन नियोजन तसेच भूजलाच्या शाश्वत वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे. या वैज्ञानिक माहितीचा संबंधित विभागांनी त्यांच्या नियोजनात समावेश केल्यास भूजल संसाधनांच्या प्रभावी व्यवस्थापनास मदत होईल.

भूजल हे पिण्याचे पाणी, शेती आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन असल्याने त्याचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यशाळेमुळे रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांबाबत उपलब्ध वैज्ञानिक माहितीचा प्रत्यक्ष नियोजन व विकासकामांमध्ये उपयोग होण्यास चालना मिळणार असून, भूजल संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी विभागीय समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

000

22/09/2026

Address

District Collector’s Office, At/PO – Alibag, District – Raigad
Alibag
402201

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912141222001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Collector Raigad:

Shortcuts

Share