25/05/2026
जलशक्ती अभियान
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता
करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- येत्या पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोटक्षेत्रनिहाय विकास करावा, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एम.जी. नांद्रे, सहा. पशु आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर.डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ –मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला. जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ देता कामा नये. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे यासाठी विविध जलोपचार करावे लागतील. त्यात लहान लहान समतल चर, शोष खड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान लहान बंधारे, नाला खोलीकरण, विहीरींचे पुनर्भरण असए विविध उपक्रम राबविता येतील. या उपाययोजना विविध विभागांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्यात जलयुक्त शिवार सारख्या अभियानातील कामांचाही समावेश आहे. त्या त्या भागातील पाणलोट क्षेत्रनिहाय पाणी अडवून ते ते क्षेत्र विकसीत करावे. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे. जलसंचय जन भागिदारी या उपक्रमाचा भाग म्हणून या प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.
00000
05/05/2026
औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर,दि,४(जिमाका)- जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या समस्या निकाली काढण्याबाबत शासन सकारात्मक व तत्पर आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांचा आणि उद्योग संघटनांचा परस्पर समन्वय असणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी या समस्यांवर समन्वय राखून तात्काळ उपाययोजना कराव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,मनपा उपायुक्त लखीचंद चव्हाण, राष्ट्रीय महामार्गचे अधीक्षक अभियंता आशिष देवकर, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी दुष्यंत आठवले, राजेंद्र चौधरी, राजेश मंथारी आदी उपस्थित होते.
उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, वीज पुरवठ्याची उपकेंद्र, सुरक्षा व्यवस्था याबाबत आपले प्रश्न मांडले. उद्योगांना समाजकंटकांकडून होणारा त्रास याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट निर्देश देऊन सीसीटीव्ही यंत्रणा व पोलीस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले. तसेच अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर गतिरोधक हे निकषांप्रमाणे बसावावे असेही त्यांनी सांगितले.
०००००
04/05/2026
जलयुक्त शिवार २.० आढावा बैठक
जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर,दि,४(जिमाका)- जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची कामे वेळत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने समन्वय राखून कामे करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
जलयुक्त शिवार २.० अंतर्गत आज जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेण्यात आला. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध जलसंधारण उपचार उपाययोजना राबविणाऱ्या यंत्रणांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम., उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) कपिल बिडकर, वरिष्ठ भू वैज्ञानिक जीवन बेडवाल तसेच तालुकास्तरावरील अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारची ११९ कामे पूर्ण
सन २०२५-२६ या वर्षात गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणांतील व जलसाठ्यांमधील गाळ काढण्याच्या २०० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ११९ कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सुमारे २०.९५ लाख घनमीटर गाळ काढून १८७१ शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १३ कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. या योजनेमुळे पाझर तलावांची साठवण क्षमता वाढली असून शेतीला सुपिक गाळाचा मोठा फायदा होत आहे.
४८ नाल्यांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव
सन २०२६-२७ साठी ४८ नाल्यांच्या खोलीकरणाचे प्रस्ताव तयार असून सुमारे ७.५० लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. यासाठी अंदाजे ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा
जिल्ह्यात एकूण ३५२१ कामे मूळ गाव आराखड्यानुसार मंजूर होती, तर सुधारित आराखड्यानुसार २७२८ कामे मंजूर आहेत. मृद व जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद आणि भूजल विभाग या विभागांमार्फत ही कामे करण्यात येत आहेत. विशेष निधी अंतर्गत १९६९ कामांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी १६८६ कामे पूर्ण झाली आहेत. विभागांच्या अभिसरणाच्या माध्यमातून ६१० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रलंबित कामांच्या सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा यावेळी घेण्यात आला.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे ६२ गावांमध्ये
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतीत ६२ गावांमध्ये ५२ सुक्ष्म सिंचनासाठी जलोपचार कामे सुरु आहेत. त्यासाठी ४९ कोटी ४ लक्ष रुपयांचा निधी खर्च होणार आहे. २२ हजार २९३ हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
येत्या पावसाळ्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण करावी. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने परस्पर समन्वय राखावा. नाला खोलीकरणाच्या कामांवर भर द्या. येत्या पावसाळ्यात अधिकाधिक जलसंधारण होऊ शकेल यादृष्टीने कामांची गती वाढवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी दिले.
00000
19/04/2026
खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी.
छत्रपती संभाजीनगर दि.१७ (जिमाका)जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनय गौडा जी .सी. यांनी बैठकीत दिले.
जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील. उपविभागीय कृषी अधिकारी श्री आघाव, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे रवींद्र पाटील, जिल्हा विपणन अधिकारी श्री राठोड. जिल्हा कृषि निविष्ठा महासंघाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्यासह आरसीएफ, कोरोमंडल, नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड या खत कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ मधील खताची मागणी, आवंठण, विक्री याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामध्ये युरिया ,डी.ए पी,एम.ओ पी, संयुक्त खते, एस.एस.पी अशा विविध प्रकारच्या खतांची उपलब्धता मागणी आणि कृषी आयुक्तांकडून मंजूर आवंठण याबाबतचा आढावा त्यांनी घेतला .जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या खत, युरिया खतसाठा बाबत प्रमाणापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खतसाठा केला असेल किंवा त्याची विक्री दुकानदाराने केले असेल तर याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा खतसाठा नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यातील युरियाचा बफर्स साठा दहा हजार ५५० मेट्रिक टन असून डीएपी खताचा साठा १२०० मेट्रिक टन संरक्षित करण्यात आलेला आहे.
शेतकरी धारण करत असलेल्या शेतीक्षेत्राच्या आवश्यकते पेक्षा जास्त अधिक खतसाठा खरेदी होत असेल किंवा एकाच व्यक्तीच्या नावावर अधिक प्रमाणात खतविक्री होत असेल अशा दुकानदार,विक्रेते यांची तपासणी करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करावा.तपासणी अंति दोषी आढळणाऱ्या साठेबाज व्यक्ती आणि दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले. तपासणी करत असताना कृषी विभागाने पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे.दोषी आढळणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबरोबरच खतांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या यादीनुसार त्यांनी खरेदी केलेले खताची खातरजमा टास्कफोर्स मार्फत करण्यात यावी .तालुका निहाय विविध खतांची उपलब्धता आणि वितरण यांचे नियोजन याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला.
जिल्ह्यातील कृषी उत्पादन आणि विकासाचा घेतला आढावा
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असणाऱ्या प्रमुख पीकपद्धती, फळपीक भाजीपाला, निर्यात होणारे उत्पादने याबरोबरच जिल्ह्यात न लागवडीखालील क्षेत्र व त्या अनुषंगाने कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतला. कापूस, मोसंबी, ऊस, सोयाबीन, या पिकाच्या उत्पादनासंदर्भातील क्षेत्रनिहाय माहिती घेतली तसेच जिल्ह्यामध्ये आवश्यक असणारा खतं आणि बी बियाणे यांच्या मागणीनुसार पुरवठा साठी केलेल्या नियोजनाबाबत आढावा घेतला. यामध्ये एकूण इ पॉस मशीन,खत पुरवठा त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा विक्री केंद्र तपासणी ,गुणवत्ता नियंत्रण अभियानाअंतर्गत केलेला तपासण्या,कृषी विभागाअंतर्गत असलेल्या विविध कार्यालयाची कार्यपद्धती, खरीप हंगामाचे पूर्व नियोजन याबाबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी आढावा सादर केला.
00000
15/04/2026
उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन;
मार्गदर्शक सूचना जारी
छत्रपती संभाजीनगर, दि;१५,(जिमाका) प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा ,मुंबई यांनी दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल२०२६ या कालावधीत येलो अलर्ट (yellow Alert) जारी केला आहे . कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जनार्दन विधाते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सुरक्षेचे उपाययोजना
तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.
बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.
चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सावधगिरीच्या सूचना
चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत. उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिक माहितीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोशल मीडिया हँडलला () भेट द्यावी किंवा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्यामार्फत करण्यात आले आहे.
00000
14/04/2026
संविधानातील अधिकार आणि कर्तव्याच्या पालनाबरोबरच मूल्यांचा अंगीकार करावा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.
छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका)-भारतीय संविधानाने हक्काबरोबरच कर्तव्य दिली असून एक सुजाण नागरिक म्हणून
संविधानाच्या 'उद्देशिकेमध्ये' मुख्य मूल्यांचा उल्लेख आहे यातील,न्याय,स्वातंत्र्य ,समता,
बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्याचा अंगीकार करून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपनिवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड , निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, रोहयो उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे ,जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, चरित्र आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असून त्यांनी समानतेचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला. एकात्मता, बंधुभाव या मूलभूत तत्वाच्या अंगीकार व्यक्तीने संविधानाच्या माध्यमातून करण्याबाबत मार्गदर्शन केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाची असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असल्याचे विधाते यांनी सांगितले.
00000
11/04/2026
महात्मा ज्योतिराव फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली
छत्रपती संभाजीनगर, दि. ११ (जिमाका.) महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते ,सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, रोहियो विभागाचे उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे, तहसीलदार रूपा चित्रक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.
00000
11/04/2026
वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी यांनी घेतला आढावा
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधाचे काम समन्वयाने व गतीने पूर्ण करा
छत्रपती संभाजीनगर, दि.११ (जिमाका)- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील अंतर्भूत असलेल्या भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स दर्शनबारी,रस्ते, पथदिवे , पाणी पुरवठा, शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित यंत्रणेकडून आढावा घेतला .
पोलीस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री ,सहाय्यक जिल्हाधिकारी, अंकिता ताकभाते,कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड , उप वनसंरक्षक सुवर्णा माने, केंद्रीय पुरातत्व विभागाचे डॉ.शिवकुमार भगत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस .भगत ,कार्यकारी अभियंता ,एस .जी केंद्रे ,विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता अनघा पुराणिक ,भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक चंद्रकांत सेवक,घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव योगेश टोपरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंदिर परिसरातील विकास कामाबरोबरच दर्शनबारी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भक्त निवासाचे काम दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावे. जर हे काम कालमर्यादेत नाही झाले तर संबंधित कंत्राटदारावर यांच्याबाबत वाढीव निधी न देता कारवाई करण्याबाबतही निर्देशित करण्यात आले. नवीन रस्ते ,पाणीपुरवठा, वीज यंत्रणांची उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी बैठकीत दिले.
घृष्णेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून विविध विकास कामाच्या अंतर्गत होत असलेल्या बांधकाम ,पुरातत्व विभागाअंतर्गत येणाऱ्या संरक्षित वास्तू आणि परिसराचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ते सूचना, निर्देश आणि सहकार्य करण्याबरोबरच वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळण्याबाबतही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाला केले . आगामी कालावधीत कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या विविध देशातील भक्तगण आणि नागरिकांना विविध सेवा सुविधा पुरवण्यासाठी घृष्णेश्वर विकास आराखड्यात विविध कामांचा समावेश केलेला आहे. सदरील काम पूर्ण करण्यासाठी, निविदा, कार्यादेश, तांत्रिक मान्यता व इतर अनुषंगिक निधीच्या उपलब्धतेची कार्यवाही तात्काळ मार्गे लावून काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान कार्यान्वित करण्याबाबतही पाणीपुरवठा आणि महावितरण विभागाला निर्देशित करण्यात आले. वनविभाग अंतर्गत गिरी परिक्रमा आणि इतर अनुषंगिक आवश्यक परवानगी देण्याबाबतची पाठपुरावा करून तात्काळ संबंधित कामकाज पूर्ण करावे
पर्यटकांना तसेच येणाऱ्या भाविकांना पाणी ,पथदिवे, दर्शनवारीचे सुविधा, वाहतुकीची पर्यायी व्यवस्था. वाहनतळ , बस स्टँडची व्यवस्था, निवास व्यवस्था याबाबत विशेष लक्ष देऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि भक्तांना रस्त्यावर दिशादर्शक फलक , आणि चिन्ह मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत लावावीत जेणेकरून नागरिकांना योग्य ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. नवीन रस्ते मार्गांमध्ये पर्यायी बसवाहनतळ अंतर्भाव करण्याबरोबरच अतिक्रमण झालेल्या नागरिकांस पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे काम ही करण्याबाबत ही सूचना करण्यात आली.
तहसील कार्यालयातील महसूल विषयक कामकाजाचा घेतला आढावा
खुलताबाद तहसीलच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात आलेले लाभ, प्रलंबित फेरफार, जनगणनाविषयक कामकाज भूसंपादन व घरकुलासाठी आवश्यक असणाऱ्या वाळू उपलब्ध बाबत आढावा घेण्यात आला. तलाठी स्तरावर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित असलेल्या फेरफार बाबत संबंधित तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यावर खुलासा मागून घ्यावा व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार यांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
00000
11/04/2026
जनगणना संबंधी काम प्राधान्याने पूर्ण करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी. .
छत्रपती संभाजीनगर , दि.१० (जिमाका). एक मे पासून जनगणनेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून प्राथमिक पूर्वतयारी अनुषंगाने असलेले निरीक्षक आणि समन्वयक, प्रगणक यांचे प्रशिक्षण, ऑनलाईन पोर्टल वरील नोंदणीचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी यांनी बैठकीत दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे ,जनगणना जिल्हा समन्वयक पवन गोडे उपस्थित होते,दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, उपस्थित होते.
निवडणुकीच्या कामाप्रमाणे जनगणना कामासाठी सर्व अधिकारी -कर्मचारी आणि जनगणनेच्या कामात नियुक्त असणाऱ्या सर्व यंत्रणांनी प्रथम प्राधान्याने हे काम पूर्ण करावे. त्या अनुषंगाने असलेले सर्व प्रशिक्षण ,निरीक्षक आणि समन्वयक यांची नोंदणी, त्याचबरोबर करावयाचे कार्यपद्धती ,याविषयीचे काम समजून घेऊन प्रत्यक्ष पोर्टलवर या संदर्भातील माहितीची नोंदणी आवश्यक आहे . कालबद्ध काम असल्याने प्राधान्याने काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले.
00000
11/04/2026
महाराजस्व अभियानात नागरिकांनी विविध योजनाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
सातबारा विलगीकरण करून ६८ सातबारा प्रमाणपत्र वितरण
छत्रपती संभाजीनगर, दि.१० (जिमाका) जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे वितरण शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे . नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी केले.
कांचनवाडी महसूल मंडळाच्या अंतर्गत तिसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, छत्रपती संभाजी नगरचे तालुक्याचे अपर तहसीलदार उमेश पाटील, तिसगावच्या सरपंच श्रीमती शकुंतला कस्तुरे तसेच विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर महाराजस्व शिबिर आयोजित केले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा उतारा ,आधार कार्ड दुरुस्ती, प्रलंबित फेरफार निकाली काढण्याबरोबरच वाद नसलेल्या फेरफार नोंदणी, रहिवाशी ,उत्पन्न प्रमाणपत्र, अकर्षक प्रमाणपत्र, जमीन अधिकृत झाल्याचे प्रमाणपत्र, एकत्रित झालेला सातबारा विलगीकरण करून स्वतंत्र सातबारा नोंद,शेतीची मोजणी, घरकुल या संदर्भात असणाऱ्या विविध प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. या शिबिरामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच एक मे पासून जनगणनेची सुरुवात होणार असून नागरिकांनी स्वतःही जनगणनेमध्ये सहभाग नोंदवून आपली नोंदणी करण्याबाबतही आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रलंबित फेरफार दोन दिवसाच्या आत निकाली काढून याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले.
गेवराई येथील गावातील स्मशानभूमीचा सातबारा ज्ञानेश्वर मुळे व गावकरी यांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते वितरित केले . द्वारकादास रतन शेलार यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे कागदपत्र आणि चावी सुपूर्त केली. शिबिरात एकूण ६६९ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांच्या तसेच योजनांचे लाभ वितरित करण्यात आले
मराठवाडा विभागात प्रथमच शेती आणि बिगर शेती सातबारा विलगीकरण
छत्रपती संभाजीनगर तहसील अंतर्गत एकूण ६८ प्लॉट आणि भूखंडाचे वेगळे सातबारा करून लाभार्थ्यांना स्वतंत्र सातबारे वितरित करण्यात आले आहेत. शेती आणि बिगर शेती अशा क्षेत्राचे वेगवेगळे सातबारा वर्गीकरण करून इथून पुढेही एकत्रित सातबारा विलगीकरण करून स्वतंत्र सातबारा निर्गमित करण्याचे नियोजन तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले. स्वतंत्र सातबारा केल्यामुळे सातबारा मधील दुबार नोंदी होण्याचे तसेच गैरप्रकार होण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल असेही त्यांनी सांगितले.
00000
08/04/2026
पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.
सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
छत्रपती संभाजीनगर, दि.८ (जिमाका). सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्याबरोबर आवास , शेत रस्ते, कृषी, पाणीपुरवठाया पायाभूत विकास योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी आज येथे दिले
पैठण तहसील कार्यालयामध्ये आढावा तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम ,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी अनुपमा गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी बळीराम राठोड, विस्तार अधिकारी मनोज चव्हाण गटशिक्षण अधिकारी यांच्यासह सर्व तालुकास्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.
आवास योजनेतील घरकुलांसाठी मोफत वाळू वाटप, लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज व त्याचा संबंधित विभागाला निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा.मतदार यादी मॅपिंगचे काम , जनगणना कामाच्या संदर्भातील प्रशिक्षण, कृषी लागवडीखालील क्षेत्राच्या सिंचन सुविधा व पीक प्रकार याबाबत आढावा घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत पानंद रस्ते,. तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी आणि वाटप याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या.
पानंद रस्त्याचे कामकाज आणि फेरफार नोंदीचे प्रकरण एक महिन्याच्या वर प्रलंबित ठेवू नये, तसेच पीएम किसान ,ई केवायसी आणि ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. आवास योजनेतील घरांसाठी मोफत राखीव वाळू उपलब्ध करून देण्या बरोबरच नवीन वाळू घाटा वरील वाळू उपलब्ध करून देण्यात यावी. प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रभेटी देऊन संबंधित योजनेच्या कामकाजाची वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांचा घेतला आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम यांनी ग्राम विकास अंतर्गत असलेल्या विविध विकास कामाच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला .पायाभूत सेवा पुरवठा करणाऱ्यांमध्ये अंगणवाडी, शाळा आणि आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालय हे सुस्थितीत कार्यान्वित असायला पाहिजेत या अनुषंगाने आवश्यक ते कार्यवाही करून स्वच्छ ,सुंदर कार्यालय संकल्पना राबविण्यात यावी. सुसज्ज अंगणवाड्या, आरोग्य केंद्र करावेत ,याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुलाचे उद्दिष्ट प्राधान्याने पूर्ण करून आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घर देण्यासाठी योग्य ती कार्यवाही ग्रामविकास अधिकारी ते उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छ, सुंदर गाव आणि आरोग्य संपन्न गाव बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा. एक महिन्याच्या आत सर्व ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी, शाळा तसेच जिल्हा परिषद शाळा यामध्ये पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्रीची मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. कार्यालयातील जुन्या कालबाह्य वस्तूचे निर्लेखन करण्याबाबतही संबंधित गटविकास अधिकारी श्रीमती मिन्नू यांनी सुचित केले.
00000