22/09/2026
भरती परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्सचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद!
छत्रपती संभाजीनगर विभागातील २४७ विद्यार्थ्यांशी उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने स्मार्ट सिटी कार्यालयात थेट संवाद साधत परीक्षा व भरती प्रक्रियेतील सुधारणा, पारदर्शकता आणि सुरक्षिततेबाबत विविध सूचना जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी निश्चित परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता, पारदर्शक उत्तरतालिका व गुणांकन, परीक्षा केंद्रांवरील मूलभूत सुविधा, वेळेत निकाल व नियुक्ती, प्रतीक्षा यादी, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा तसेच ऑनलाइन परीक्षेतील सुरक्षितता याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
टास्क फोर्सच्या अध्यक्षा तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सूचनेचे दस्तऐवजीकरण करून त्यांचा सखोल अभ्यास करण्यात येत असल्याचे सांगितले. भरती परीक्षा अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा सचिव डॉ. एन. रामास्वामी, सदस्य तथा नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, दूरदृश्य प्रणालीद्वारे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले आणि सदस्य तथा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे सहभागी झाले.
तसेच विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आणि सह आयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.