DIO Chandrapur

Directions Website

DIO Chandrapur जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर चे अधिकृत पेज

10 ऑक्टो. पर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करा                                              – जिल्हाधिकारी वसुमन...
07/10/2026

10 ऑक्टो. पर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करा

– जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø पिण्याच्या पाण्याचे स्रोत राखीव ठेवा

Ø चारा, जलसंधारण व रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 07 : कमी पर्जन्यमान आणि पावसातील दीर्घ खंडामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. या तालुक्यांतील 1 हजार 579 म्हणजेच 100 टक्के गावांमध्ये पीक नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 50 ते 60 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याबाबत प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने काम करावे. या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक तहसीलदाराने दररोज सायंकाळी पंचनाम्याच्या कामाचा आढावा घ्यावा. किती क्षेत्राचे आणि किती खातेदारांचे पंचनामे झाले, याची अद्ययावत माहिती गुगल शीटमध्ये नियमितपणे नोंदवावी.

राज्य शासनाकडून पंचनाम्याच्या कामाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करावे. तालुका आणि ग्रामस्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवावा. पंचनाम्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी तहसीलदारांनी वेळोवेळी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन कामाची पडताळणी करावी. पंचनाम्यात भरलेली माहितीची फेरतपासणी करावी. प्रत्येक पंचनाम्यावर संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक असून, पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची यादी चावडी, ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करावी.

पिण्याच्या पाण्याचे स्रोत राखीव ठेवा : पाणीटंचाईचा आढावा घेताना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, सध्या उपलब्ध असलेले जलस्रोत प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. राखीव जलस्रोतांमधून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. सध्या पाणी उपलब्ध असले तरी आगामी उन्हाळा आणि पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने उपलब्ध जलसाठा आणि संभाव्य मागणीचा विचार करून आतापासूनच नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये जलतारा तसेच जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. संबंधित विभागांनी या कामांसाठी निश्चित उद्दिष्ट ठरवून तातडीने अंमलबजावणी सुरू करावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीबाबत कोणत्याही बँकेची तक्रार येणार नाही, याची बँकांनी दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, याची तालुकानिहाय माहिती पशुसंवर्धन विभागाने तातडीने सादर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता मनोज दाभर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुरेश कुंबरे, भुजल वैज्ञानिक लिना बाराहाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

०००००००
Maharashtra DGIPR

205 अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीØ  सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजनचंद्रपूर, दि. 07 : ...
07/10/2026

205 अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

Ø सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजन

चंद्रपूर, दि. 07 : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे 6 ऑक्टोबर रोजी आयोजित या शिबिरात विविध विभागांतील 205 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय कार्यालयातील 205 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 149 जणांची रक्त तपासणी, 175 जणांची बीपी आणि शुगर तपासणी, 65 जणांची दंत तपासणी, 93 जणांची ईसीजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, दगडू कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी झाले आणि त्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी सेवा दिली.

यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ. सायली दाभेराव आणि क्लिनिकल डायटिशियन डॉ. प्रिती कांबळे (जनबंधु) यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी आरोग्य तपासणीसाठी सेवा देणाऱ्या सर्व तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सहायक कर्मचारी यांचे आभार मानले.

००००००
#सेवा_संकल्प_अभियान

उपजीविका संसाधन केंद्रातून दुर्गमभागात आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशाØ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष पुढाकारØ स्...
07/10/2026

उपजीविका संसाधन केंद्रातून दुर्गम

भागात आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष पुढाकार

Ø स्थानिक गरजांवर आधारित उपजीविकेवर भर

चंद्रपूर, दि. 07 : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासीबहुल आणि रोजगाराच्या संधीपासून दूर असलेल्या भागातील युवक व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘उपजीविका संसाधन केंद्र’ महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शनापासून कौशल्य प्रशिक्षण, अर्थसहाय्य आणि बाजारपेठेशी जोडणीपर्यंतच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्याच्या विकास प्रक्रियेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील युवक आणि महिलांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा ध्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याच संकल्पनेतून मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून चंद्रपूर येथे उपजीविका संसाधन केंद्रे कार्यरत आहेत.

चंद्रपूरच्या स्थानिक गरजांवर आधारित संधी : चंद्रपूर जिल्ह्यात शेती, वनसंपदा तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या कुटुंबांतील युवक व महिलांना त्यांच्या परिसरात उपलब्ध संधींशी जोडण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे. केंद्राच्या माध्यमातून केवळ प्रशिक्षण देण्याऐवजी संबंधित परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्था, बाजारपेठ, उपलब्ध रोजगार आणि संभाव्य व्यवसायाच्या संधींचा अभ्यास करून त्यानुसार उपजीविकेचे पर्याय निश्चित केले जातात.

युवक व महिलांचे समुपदेशन करून त्यांच्या कौशल्यांचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतर त्यांची क्षमता, आवड आणि स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन वेतनाधारित रोजगार, स्वयंरोजगार किंवा उद्योजकता विकास या तीन प्रमुख मार्गांशी त्यांना जोडण्यात येते.

प्रशिक्षणापासून रोजगारापर्यंत मदतीचा हात : नोकरी करू इच्छिणाऱ्या युवकांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन तसेच संभाव्य नियोक्त्यांशी थेट जोडणी उपलब्ध करून दिली जाते. नोकरी मिळाल्यानंतर संबंधित युवकांना रोजगारात स्थिर होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येते. स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी मर्यादित असलेल्या युवक व महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांना परिसराच्या गरजेनुसार व्यवसाय प्रशिक्षण, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मार्गदर्शन आणि उत्पादने अथवा सेवांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत केली जाते.

आदिवासीबहुल, वनालगत आणि मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रोजगार आणि उद्योगाच्या संधी दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उपजीविका संसाधन केंद्रांचा अनुभव महत्त्वाचा ठरत आहे. स्थानिक गरजांचा अभ्यास करून रोजगार व व्यवसायाचे पर्याय उपलब्ध केल्यास दुर्गम भागातही रोजगार आणि उद्योजकतेचे शाश्वत मॉडेल विकसित करता येऊ शकते, या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना : चंद्रपूरच्या ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना स्थानिक स्तरावर उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावर होऊ शकतो. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेशी जोडण्यावर उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. योग्य कौशल्य, आर्थिक संधी, मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडणी या बाबी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्याने युवकांना रोजगारक्षम बनविणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि स्थानिक पातळीवर नवीन उद्योजक घडविण्यास मदत होणार आहे.

००००००

191 आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणीØ सेवा संकल्प अभियानातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीचंद्रपूर, दि. 0...
07/10/2026

191 आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी

Ø सेवा संकल्प अभियानातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती

चंद्रपूर, दि. 07 : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे व नामांकित पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दंत व मुख आरोग्य तपासणीचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 63 शाळांमधील विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी करण्यात येणार असून गोजोली येथील श्रीराम उच्च माध्यमिक व प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेत आयोजित शिबिरात 191 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

मौखिक आरोग्य कक्ष व दंत विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, दंतशास्त्र विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गोजोली येथे आयोजित शिबिरात डॉ. संदीप पिपरे यांनी विद्यार्थ्यांना सेवा संकल्प अभियानासह मौखिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. दातांची रचना व प्रकार, दातांची कीड, दुभंगलेले ओठ, हिरड्यांचे आजार याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच दात योग्य पद्धतीने कसे घासावेत, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.

तंबाखू, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, मौखिक आरोग्यावर होणारा परिणाम तसेच तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. शिबिरात दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे, डॉ. रवींद्र गेडाम, डॉ. मृणाल बंडीवार आणि डॉ. स्मिता दास यांनी एकूण 191 विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी केली.

तपासणीमध्ये 72 विद्यार्थ्यांना स्केलिंगचा, 6 विद्यार्थ्यांना दातांच्या पुनर्स्थापना उपचाराचा सल्ला देण्यात आला. 47 विद्यार्थ्यांमध्ये दातांची कीड, 3 विद्यार्थ्यांमध्ये फ्लोरोसिस आढळून आले. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य उत्तम व दात स्वच्छ आढळून आले, अशा विद्यार्थ्यांचा डॉ. संदीप पिपरे व डॉ. रवींद्र गेडाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना शक्यतेनुसार मोबाईल डेंटल व्हॅनद्वारे उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे संदर्भित करण्यात आले.

००००००
#सेवा_संकल्प_अभियान

वाढोणा येथे 103 सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचारØ सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबीरचंद्रपूर, दि. 07 : सेवा...
07/10/2026

वाढोणा येथे 103 सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार

Ø सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबीर

चंद्रपूर, दि. 07 : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानाच्या माध्यमातून सिकलसेल आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाढोणा येथे विशेष आरोग्य तपासणी, समुपदेशन व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात एकूण 103 सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार व औषधांचे वितरण करण्यात आले.

सिकलसेल हा आनुवंशिक रक्तविकार असून त्याचे वेळेत निदान, नियमित वैद्यकीय तपासणी, योग्य औषधोपचार, संतुलित आहार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करता येते. याच उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले.

या विशेष शिबिरात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथील माजी प्राध्यापक डॉ. घनश्याम कोडवानी तसेच आयुषचे सहायक संचालक डॉ. धनंजय हांगे यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेऊन त्यांना आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच औषधांचे वितरण करण्यात आले.

कॅरमच्या गोट्यांतून आनुवंशिकतेचे प्रात्यक्षिक : जिल्हा समन्वयक संतोष चात्रेश्वर यांनी सिकलसेल आजाराचे स्वरूप, त्यामागील आनुवंशिक कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच रुग्णांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व सुविधांची माहिती दिली. सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्यामुळे विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सिकलसेल आजाराचा आनुवंशिक वारसा पुढील पिढीकडे कसा जाऊ शकतो, हे सहजपणे समजावे यासाठी कॅरमच्या गोट्यांचा वापर करून प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

सिकलसेल रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा तसेच आजाराशी संबंधित त्रास अथवा लक्षणे जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. साईनाथ भोवरे, नागभीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित बनपूरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल डोरलीकर, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज शेख यांनी तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मुंजनकर, डॉ. गजेंद्र अहिरकर, डॉ. चैतन्य चौधरी, डॉ. विवेक बोळखे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सुरनार यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक संतोष चात्रेश्वर यांनी तर आभार आंबोरकर यांनी मानले.

०००००००
#सेवा_संकल्प_अभियान
Maharashtra DGIPR

Seva Sankalp abhiyan stall at chintamani college under gondpipri subdivision on dt. 06/10/26 . Giving information about ...
07/10/2026

Seva Sankalp abhiyan stall at chintamani college under gondpipri subdivision on dt. 06/10/26 . Giving information about various on going schemes of mahavitaran
#सेवा_संकल्प_अभियान

माननीय कार्यकारी अभियंता वरोरा विभाग यांच्या  मार्गदर्शनाखाली भद्रावती उपविभाग अंतर्गत पिर्ली गावात सेवा सेतू कॅम्प घेण्...
07/10/2026

माननीय कार्यकारी अभियंता वरोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती उपविभाग अंतर्गत पिर्ली गावात सेवा सेतू कॅम्प घेण्यात आले , या सभेत १००+ कास्तकार उपस्थित होते तसेच त्यांना मोटरला लावलेले कॅपॅसिटर बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व सर्वांना प्रत्येक मोटरला कॅपॅसिटर लावण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले, त्याच प्रकारे १०० युनिट च्या खाली घरगुती मीटर वरील वापर करणारे ग्राहकांना स्मार्ट सोलर स्कीम बद्दल माहिती सुद्धा देण्यात आले. तसेच जनसभेत ग्राहकांचे तक्रार ऐकून त्याचा वर त्वरित कारवाई करून तक्रारीचे निराकरण करण्यात आले .

सदर सभेत माननीय कार्यकारी अभियंता श्री नवघरे साहेब , उपकार्यकारी अभियंता श्री चौरसिया साहेब ,सहायक अभियंता श्री लोनगाडगे साहेब व concern सर्व जनमित्र उपस्थित होते.
#सेवा_संकल्प_अभियान
Maharashtra DGIPR

सेवानिवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महाउपलब्धी’बाबत कार्यशाळा संपन्नØ ई-केवायसी, मोबाईल नोंदणी व पीपीओ क्रमांकाबाबत मार्गदर्शनचं...
06/10/2026

सेवानिवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महाउपलब्धी’बाबत कार्यशाळा संपन्न

Ø ई-केवायसी, मोबाईल नोंदणी व पीपीओ क्रमांकाबाबत मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 06 : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा सुलभपणे वापर करता यावा, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा वापर, आवश्यक माहितीची नोंदणी, निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँक खात्याचे ई-केवायसी, मोबाईल क्रमांकाची नोंदणी तसेच पीपीओ क्रमांकासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काही महिन्यांत निवृत्तीवेतनाची देयके ई-बिल प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँक खात्यात निवृत्तीवेतन जमा होते, त्या खात्याचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान उपस्थित सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व माहिती समजावून सांगण्यात आली.

कार्यशाळेला जिल्हा कोषागार कार्यालयातील तृप्ती टेमकर, अपर कोषागार अधिकारी स्वाती कुलकर्णी, अपर कोषागार अधिकारी संजय पडीशालवार, निवृत्तीवेतनधारक संघटनेचे उपाध्यक्ष अरुण धानोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.

००००००
#सेवा_संकल्प_अभियान

जांभुळघाट आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलंबितØ विद्यार्थ्यांच्या केस कापण्याच्या प्रकरणाची गंभीर दखलØ शिस्तभंगाची कार्यवाही...
06/10/2026

जांभुळघाट आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलंबित

Ø विद्यार्थ्यांच्या केस कापण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल

Ø शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित

चंद्रपूर, दि. 06 : शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जांभुळघाट, ता. चिमूर येथे विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे केस अर्धवट कापण्यात आल्याच्या प्रकरणाची आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याच्या कारणावरून आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक पी. एस. गिरी यांना आदिवासी विकास विभाग, नागपूरच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी निलंबित केले आहे.

जांभुळघाट येथील शासकीय आश्रमशाळेत दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी पुरुष अधीक्षक पी. के. आत्राम यांनी विद्यार्थ्यांची इच्छा नसताना त्यांचे केस बारीक करण्याच्या उद्देशाने अर्धवट कापल्याचे प्रकरण समोर आले. एकूण 82 विद्यार्थ्यांचे केस सुरुवातीला अर्धवट कापून सोडण्यात आले व उर्वरित कटिंग रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान दुखावला गेल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.

या प्रकरणाबाबत चार विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी. एस. गिरी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी या तक्रारीची अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी नसतानाही विद्यार्थी मोबाईल वापरत असल्याची बाब शालेय प्रशासनाच्या निदर्शनास नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शालेय प्रशासनावरील नियंत्रणाबाबतही प्रश्न उपस्थित झाला.

प्रकल्प अधिकारी, चिमूर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा विचार करून मुख्याध्यापक पी. एस. गिरी यांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करीत त्यांच्यावर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस केली होती.

पी. एस. गिरी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 व नियम 28 चा भंग केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 (1) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पी. एस. गिरी यांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित केले आहे.

निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोठी येथे निश्चित करण्यात आले असून, संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. नियमानुसार निलंबन कालावधीत त्यांना निर्वाह भत्ता व पूरक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे.

तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांनी कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय स्वीकारल्यास ती बाब गैरवर्तणूक समजून त्यांच्याविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येईल आणि नियमानुसार निर्वाह भत्त्यापासूनही ते वंचित राहू शकतील, असे अपर आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

००००००

5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार अपडेट करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहनचंद्रपूर, दि. 06 : मुलाचे/ मुलीचे वय 5 वर्षे पूर्ण झ...
06/10/2026

5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार अपडेट करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 06 : मुलाचे/ मुलीचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले मॅडेटरी बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते. त्यानंतर वयाची 15 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी लागते. या दोन्ही टप्प्यांवर एमबीयू वेळेत पूर्ण करणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये वाढत्या वयानुसार मुलांचे हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र आधारमध्ये नोंदविले जाते. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित विविध सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊन आधार कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते, त्यामुळे 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार कार्ड त्वरीत अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

लहान मुलांसाठी आधार क्रमांक अतिशय महत्वाचा असून शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी, तसेच विविध योजनांचा लाभ घेताना आधारचा वापर होत असल्याने पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड काढण्याबरोबरच वेळोवेळी त्यातील माहिती अपडेट ठेवून आधारचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे आधार एमबीयू. मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक व शासकीय कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी वेळीच दक्षता घेऊन एमबीयू पूर्ण करावे.

जिल्हातील एकूण प्रलंबित एमबीयूपैकी 27 हजार एमबीयू पूर्ण करण्याचे नियोजन शाळेतच विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या मुलांचे एमबीयू पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. तसेच यानंतरही एमबीयू प्रलंबित असल्यास जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.

पालकांनी आपल्या मुलाच्या आधारची सद्यस्थिती अधिकृत आधार सेवांद्वारे तपासावी. एमबीयू प्रलंबित असल्यास संबंधित आधार केंद्रावर जाऊन अपडेटची आवश्यकता आहे का, याची खात्री करता येते. आधार क्रमांकाची स्थिती तपासल्यानंतर आवश्यक असल्यास तातडीने एमबीयू पूर्ण करावे. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आधारची स्थिती आणि एमबीयूची आवश्यकता पालकांनी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. मुलाच्या आधारचा वापर करण्यापूर्वी त्याची स्थिती सक्रिय आहे की नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००
Maharashtra DGIPR

Address

Chandrapur
442401

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DIO Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share