05/09/2026
शिवार फेरी व मशरूम लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात
सांगवी रेल्वे : कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे व अँफ्प्रो संस्था, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व महिला शेतकऱ्यांसाठी शिवार फेरी व मशरूम लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
शिवार फेरीचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तार विभागाच्या वतीने वासुदेव चांदुरकर यांनी केले. शिवार फेरीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विविध कृषी तंत्रज्ञानाची माहिती व प्रात्यक्षिके शेतकरी व महिला शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. यामध्ये सोयाबीन, हळद, ऊस, फळपिके, रेशीम उद्योग, गांडूळ खत निर्मिती तसेच शेळीपालन यांचा समावेश होता.
विविध पिकांमधील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्षेत्र व्यवस्थापक विवेक चौधरी यांनी शिवार फेरीदरम्यान विविध प्रक्षेत्रांवरील पिके व कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागामार्फत मशरूम लागवड तंत्रज्ञान व प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात आले. नम्रता राजस यांनी मशरूम लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले. मशरूम लागवडीसाठी आवश्यक बाबी, उत्पादन प्रक्रिया आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधी याबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास अँफ्प्रो संस्था, दारव्हा येथील व्यवस्थापक निखिल केरवतकर, तसेच सुरज मेश्राम, प्रतिक वानखडे, दत्ता राठोड, राहूल कडू, प्रिया दुधे, अर्चना घोडमारे व निकिता गावंडे यांची उपस्थिती होती.
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शास्त्रज्ञ मयूर इंगोले, अक्षय इझाळकर व नागेश्वर खोडे यांचा सहभाग होता. कार्यक्रमास शेतकरी व महिला शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वासुदेव चांदुरकर यांनी केले. उपस्थित शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी शिवार फेरी व मशरूम लागवड प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.