18/05/2026
मातुश्री सुभेदार अहिल्याबाई
अठरावं शतक मराठा साम्राज्यासाठी वादळी ठरलं.अटक पर्यंत मजल मारून उत्कर्षाचं शिखर गाठणे ते सत्तासंपत्तीचा लोभ आणि एकीच्या अभावामुळे लयास जाणे अश्या दोन्ही अवस्था मराठा माम्राज्याने अनुभवल्या.
याच काळात मराठा साम्राज्याच्या अवकाश पटलावर अहिल्याबाई नावाचा तारा स्वतेजाने लखलखत होता.
त्या होळकर साम्राज्याच्या विश्वस्त होत्या.गरजूंसाठी मातुश्री होत्या.धर्मकार्य करणार्या सनातनी होत्या.
सासरा,नवरा,मुलगा,नातू आणि जावई अश्या स्वतःच्या कुटुंबातल्या पुरूषांना स्वर्गवासी होताना पाहणारी ही अभागी स्त्री पण काळाची पावले ओळखून त्यांनी समर्थपणे होळकर साम्राज्याचा व्याप सांभाळला.त्याकाळात एका स्त्रीने हे करणे सोप्पे नाही. त्या होळकरांच्या रूपाने मराठेशाहीच्या खंबीर आधारस्तंभ झाल्या.
या महिन्यात त्यांची जयंती (३१ मे).अहिल्याबाईंच्या स्मृतींना वंदन.अहिल्याबाईंच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारे हे सुंदर पुस्तक.
"ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर - विनया खडपेकर"
18/07/2025
*काश्मिरीयत*
लेखिका - सुप्रिया राज
रसग्रहण - मंगेश गोगटे
जम्मू काश्मीर म्हटले कि सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात येते तेथील भीषण वर्णन, दहशदवाद, काश्मीर बंद ची आवाहने, दगडफेक करणारे तरुण, बुरख्यात वावरणाऱ्या बायका, AK 47 मिरवणारे टेररिस्ट, व हे कंट्रोल करायला जीवाची बाजी लावणारे मिलिटरी, बॉर्डर सिक्युरिटी व स्थानिक पोलिसांचे जवान.....
आपल्या दृष्टीने काश्मीर इतकेच आहे.
लेखिका सुप्रिया राज 2014 साली फेमिली ट्रिप साठी काश्मीर मध्ये दाखल झाली तेव्हा तिची सुद्धा काश्मीर बद्दल ची इमेज काही वेगळी नव्हती.
पण त्या थोड्या दिवसाच्या ट्रिप मध्ये तिला असे जाणवले कि मीडिया मधून ~दिसणारी~ दाखवली गेलेली प्रतिमा आणी वास्तव अगदी सेम नाही.
तेव्हा ती निर्णय घेते काश्मीर च्या टुरिस्ट जागा सोडून LOC च्या जवळच्या गावात जाऊन खरे काश्मीर स्वतः जाणून घेण्याचा.
चाळीशीतील मराठी बाई जगातील सर्वात अशांत सीमेवर एकटी प्रवास करणार ही कल्पनाच इतकी विलक्षण किंवा विचित्र होती कि सुप्रिया ला कोणी उत्तेजन दिले नाही.
सर्वांनी तिथे जाणे कसा मूर्खपणा आहे. तेथील रानटी मुस्लिम पुरुष तिला फाडून खातील वैगरे सांगून तिला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला.
पण जेव्हा इरादे बुलंद असतात तेव्हा कुठलेही आव्हान तुम्हाला रोखू शकत नाही.
2015 सालच्या च्या उन्हाळात सुप्रिया जेव्हा श्रीनगर च्या फ्लाईट मध्ये चढली तेव्हा तिच्या सोबत होती चार कपडे असलेली झोळी, चॉकलेट्स ने भरलेली पिशवी फक्त 5000 रुपये असलेली पर्स आणी दुर्दम्य इच्छाशक्ती बस्स!
पुढच्या दोन महिन्यात काही ओळख पाळख नसतांना, सोबत फार पैसे नसतांना लेखिका आपला सोलो ट्रेव्हल कसा पूर्ण करते?
तिला काय अडचणी येतात?
सेन्सेटिव्ह बॉर्डर एरियात जातांना परवाने मिळवण्यासाठी काय खटाटोप करायला लागतो, अनोळखी लोकांकडून तिला काय अनुभव मिळतो?
खिशात फार पैसा नसतांना ती प्रवास कसा करते?
ज्या भागात रहायची हॉटेल्स तर सोडा पण खाणावळी पण नाहीत त्या भागात तीला आसरा कोण देतो, खाण्या पिण्याची व्यवस्था कशी होते हे जाणून घेण्यासाठी एकदा *काश्मिरीयत* वाचायला हवे
लेखिकेने फार सोप्या शैली मध्ये पुस्तक लिहिले आहे, गप्पा मारव्या अशी भाषा आहे.
अलंकारिक जड भाषा वापरायचा मोह आवरला आहे.
एखाद्या व्यक्ती विषयी चे आधीचे अंदाज चुकले तर ते सुप्रिया ने मोकळेपणाने कबूल केले आहे.
काही तुरळक अनावस्था प्रसंग मिर्च मसाला न लावता सांगितले आहेत.
काही ठिकाणी झालेली फजिती पण कबूल केली आहे.
ठिकठिकाणी आलेले माणुसकीचे प्रसंग वाचताना आपले डोळे पाणावतात.
थोड्या दिवसाच्या ओळखीत जन्म भराच्या सुखद आठवणी देणारे लोकं व त्यांची ताटातूट होतांना लेखिकेला झालेले दुःख आहे आपल्याला पण जाणवते.
गुरेज ला जायचा अट्टाहास, त्या साठी घेतलेले कष्ट, मिलिटरी ला वाटलेला संशय, पाकिस्तान ची एजन्ट असावी असे वाटून त्यांनी ठेवलेली पाळत वैगरे प्रसंग वाचतांना आपण थरारून जातो.
लेखिके सोबत आपण सुद्धा दुर्गम काश्मीर च्या खोऱ्यात प्रवास करत आहोत असा फील येतो.
पुस्तक वाचून खाली ठेवतो तो वर काश्मीर बद्दल च्या आपल्या कल्पना अमुलाग्र बदललेल्या असतात.
माणुसकी चा धर्म सर्वात श्रेष्ठ व प्रेमाची भाषा जगात कुठेही समजली जाऊ शकते हाच संदेश देते *काश्मिरीयत*
18/07/2025
कालच मारुती चितमपल्ली ह्यांचे पक्षी जाय दिगंतरा हे पुस्तक वाचले. छोट्या कथांमधून हे जाणवते की जंगल आणि जंगलातील एकूणच पशुपक्षी ह्यांचे अगदी जवळून निरीक्षण चितमपल्ली यांनी केले आहे.
सकाळ झाली की जंगलात क्रमाने हे जीव आवाज करतात. भ्रुंग राज प्रथम, मग कोतवाल, शामा आणि बुलबुल. असे ते म्हणतात.
खंड्या (किंगफिशर) पक्ष्याचे वर्णन करताना त्याचा रंगीबेरंगी अवतार खुलवून सांगतात एका ठिकाणी.काही पक्षी अगदी हजारो किलोमीटर प्रवास करून भारतातील जंगलात स्थलांतर करतात. एका कथेत असा उल्लेख आहे की हत्ती सुद्धा आसाम, ओरिसा मधून छत्तीसगढ बस्तर आणि तेथून नवेगाव जंगलात १००- १५० वर्षांपूर्वी स्थलांतर करीत.
१९३२ मध्ये १२ नोव्हेंबर ला सोलापूर येथे चितमपल्ली ह्यांचा गरीब कुटुंबात जन्म झाला.२ वर्षांचा कोईमतुर इथे जंगल course ( वानिकी) शिकून ते कोकणात ( वडगाव) जंगल अधिकारी म्हणून कामाला लागले आणि नंतर भंडारा जिह्यातील नवेगाव नॅशनल पार्क मध्ये. त्यांच्या कथेमध्ये हया पार्क बद्दल उल्लेख आहे.माधवराव पाटील आणि जंगलातील स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांनी जंगल अनुभव घेतले/वेचले/ समृद्ध केले. काही कथांमंधे हे पाटील आणि स्थानिक लोकांचा उल्लेख आहे.
१८ जून २०२५ ला वयाच्या ९३ व्या वर्षी चितमपल्ली स्वतः दिगंतरी उडून गेलेत. अरण्य ऋषी म्हणून त्यांना संबोधले गेले हे दर्शवते की जंगल आणि जंगलाचा अभ्यास ह्यांचा ध्यास त्यांनी घेतला होता.
चकवा चांदण हे त्यांचे आत्मचरित्र आत्ता वाचायला घेतलय.
18/07/2025
दोन डोळे शेजारी , चंद्रकांत खोत लिखित श्रीरामकृष्ण परमहंस ( ठाकूर असे त्यांना म्हटले जायचे) ह्यांचे चरित्र वाचले. गदाधर खुदीराम चट्टोपाध्याय म्हणजे श्रीरामकृष्ण ह्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ चा आणि १५ ऑगस्ट १८८६ ला त्यांनी देह ठेवला.माताजी सारदा देवी हया त्यांच्या पत्नी. श्रीरामकृष्ण ह्यां चा जन्म पश्चिम बंगाल मधील हुगळी जिल्ह्यातील कामारपुकुर हया गावी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे घर ( झोपडी)आजही आपल्याला बघायला मिळते, बाजूला आत्ता देऊळ बांधले आहे .त्यांचं कार्यक्षेत्र कलकत्त्याच्या उत्तरेस दक्षिणे श्वर गावी पार पडले.येथे ते राणी रास मणी हिने १८५५ मध्ये गंगा ( हुगळी नदी) बांधलेल्या काली मातेच्या देवळात पूजा करू लागले. इथेच त्यांना सिद्धी मिळाली आणि त्यांना अनेक शिष्य येऊन मिळाले. पुस्तकामध्ये १०८ लेख आहेत आणि सार दा देवी कथन करीत आहेत असे सगळे प्रसंग लिहिले आहेत. शिष्यां बरोबरचे ठाकूर ह्याचे शिकवणीपर बोल / कथा ऐकायला मिळ तात.
स्वामी विवेकानंद हे त्यांचे एक शिष्य. त्यांनी ठाकूर ह्यांच्या निर्वाणानंतर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन स्थापन केलं, हेतू हा की लोकांचे कल्याण व्हावे - मुलींचे शिक्षण व्हावे, गरजूंना कठीण परिस्थितीत मदत व्हावी. बेलूर येथील मठ हा तेव्हा १८९७ मध्ये साकार झाला आणि आज हया मिशनच्या शेकडो शाखा आहेत , माणसातील देवाची सेवा आणि त्याद्वारे पूजा ही निष्काम भावना ह्यामागची. स्वामी विवेकानंद ही गुरू शिष्य जीवन कहाणी सुद्धा थोडक्यात कळते इथे.
माता सारदा देवी हया गुरुपत्नी. पण त्यांनीही मोलाची साथ दिली ठाकूर ह्यांना. ठाकूर गेल्यानंतर मठ आणि मिशन आणि शिष्य ह्यांच्या बरोबरची आपुलकीची त्यांची जाणीव जाणवते.
दोन डोळे , एक डोळा ठाकूर आणि दुसरा माताजी आणि दोघेही एकच प्रतिमा बघत आहेत असे कल्पून पुस्तकाचे नाव दिले आहे. स्वामी विवेकानंद ह्याचे चरित्र वाचले होते( पुस्तकाचे नाव आठवत नाही) आणि त्यांच्या गुरुंचेही वाचावे असे वाटले होते. हे पुस्तक वाचून एक मनीची इच्छा पूर्ण झाली🙏🙂
18/07/2025
"रत्नागिरी ते आइनस्टाइन"
लेखक - सर्वोत्तम ठाकूर.
सर्वसामान्य लोकांना जवळच्या वाटणाऱ्या, त्यांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचा वेध घेणारे डॉक्टर ठाकूर यांचे विविध लेख या पुस्तकात एकत्र केले आहेत.
मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना आणि प्रसिद्ध लेखक भानू काळे यांचे दोन शब्द वाचताना या पुस्तकाचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं.
व्यवसाय आणि रत्नागिरी या लेखात कोकणातील विविध उद्योगधंद्यांचा लेखाजोखा आहे, त्याचबरोबर थिबा राजाचा इतिहास विशद केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीतील जीवनावर भाष्य केलं आहे.
आणखी काही वैचारिक लेख आहेत.
' विनोबांच्या सहवासात' या लेखात १९५८ सालच्या विनोबा भावेंच्या कोकणातील पदयात्रेत सहभागी झाल्यावेळचा डॉक्टरांचा अनुभव आहे.
' तुमची केस कठीण दिसते !' या लेखात प्रसिद्ध डॉक्टर रुग्णांना कसे हातोहात बनवतात, गरज नसताना शस्त्रक्रिया कशा लादल्या जातात, चुकीचे उपचार कसे केले जातात हे सांगताना वैद्यक क्षेत्रातील दांभिकता उघड केलेली आहे.
अमेरिका भेटीत प्रिस्टन येथील आइनस्टाइन यांचं घर आणि तिथल्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज मधील त्यांच्या अभ्यासिकेचा डॉक्टरांनी घेतलेला शोध आणि त्यामागची आस्था " आइनस्टाइनची खोली आणि आपला इतिहास" हा लेख वाचताना आपल्या लक्षात येते.
डॉक्टर सर्वोत्तम ठाकूर म्हणजे सुनीताबाई देशपांडे यांचे धाकटे बंधु अर्थात आपल्या लाडक्या पुलंचे मेव्हणे ! ' बारा जूनचे लग्न' या लेखात डॉक्टरांनी पु. ल. आणि सुनीताबाई यांच्या लग्नाचा किस्सा शब्दांकित केला आहे. माई म्हणजे सुनीताबाई होणाऱ्या लग्नाबद्दल आपल्या आईजवळ सुतोवाच करतानाचा संवाद या लेखात आहे.
"कुणाशी ठरवलंयस " आई.
"आहे एक " माई.
या आरंभीच्या बोलण्यातूनच या प्रसंगाची रंजकता लक्षात येईल... वाचकांची उत्सुकता कायम रहावी म्हणून आई आणि माईंमधील संपूर्ण संवाद इथे सांगण्याचा मोह आवरता घेत आहे.
"दिनेश येईपर्यंत" या लेखात पुलंचे अखेरचे क्षण अनुभवताना आपण व्याकुळ होतो.
या पुस्तकाची ही आत्ताची तिसरी आवृत्ती आहे. त्या अर्थाने हे पुस्तक नवीन नसलं तरी थोडं वेगळं असल्याने त्याबद्दल आज इथे सांगणं उचित वाटलं. डॉक्टर ठाकूरांच्या साक्षीने अनेक विषयांना स्पर्श करताना आपण देखील त्या प्रसंगांचे साक्षीदार होऊन जातो.
राजेश चंद्रकांत सुंकले ..
१७ जुलै २०२५.
16/07/2025
आजच शब्दांच धन हे मारुती चितमपल्ली ह्यांचं पुस्तक वाचून झालेय.त्यांचं आत्मचरित्र वाचले आहे त्यामुळे हे पुस्तक वाचताना काही संदर्भ स्पष्ट होतात. एकूण १५ लेख आहेत आणि परिशिष्ट आहे. काही गोष्टी नव्याने कळतात. चित्तमपल्ली ह्यांची पुस्तके वनस्पती, पक्षी प्राणी हयांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी सांगतात किंवा त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीबद्दल वा प्रसिद्ध होऊन गेलेल्या ( पशुपक्षी जंगल यांवर लिहिणाऱ्या) लेखकांवर प्रकाश टाकतात. हे शब्दांच धन एकदा तरी हातात घेऊन बघावं असं नक्की🙏
15/07/2025
महामाया व महाकाळ
वज्रडाकिणी व हेरूक
प्रकृती व पुरूष
यंत्र व तंत्र
आणि
निळावंती व बाजिंदा...
यांच्या मिलनातून हे सृष्टीचं चक्र अव्याहतपणे सुरू आहे...
जन्म व मृत्युचा खेळ सुरू आहे.
या सृष्टीचक्राचं अनोखं व अद्भुत दर्शन घडवणारी कादंबरी म्हणजे "महामाया निळावंती"
रहस्य,विज्ञान,मानवी भावभावना,निसर्ग अश्या अनेक पैलुंना ही कादंबरी स्पर्श करते.मृत्यूनंतर प्रत्येकाचा स्वतःचा असा मोक्ष असतो आणि निसर्गातले विविध घटक एकमेकांशी कसे संवाद साधतात या दोन संकल्पना अतिशय प्रभावीपणे या कादंबरीत मांडल्या आहेत.
अनेक चक्रावून सोडणार्या विचित्र घटना या कथेत आहेत.त्या सुट्या वाचताना काहीवेळा अनाकलनीय वाटतात पण कथा संपूर्ण वाचल्यावर घटनाक्रमांची मांडणी अगदी चपखल बसली आहे हे पटते.
ही कथा नक्कीच नेहमीसारखी नाही.वेगळ्या धाटणीची आहे.
पण तुम्हाला ती वेगळ्या जगात घेऊन जाते.तिच्या जगात...
महामाया निळावंतीच्या मायाजाळात...