नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकी नंतर 22 डिसेंबर 2025 रोजी मी केलेल्या विश्लेषणानुसार अपेक्षित निकाल लागलेत.
पक्ष फुटल्याने गैरभाजपा पक्षांची ताकद विभागली, एकत्र असते तरी निकाल वेगळे दिसले असते.
युतीत असलेल्या पक्षांचे नेते मांडलिक झाल्याने भाजपची ताकद वाढली.
सर्व सत्ता, निवडणूक आयोग, पैसा आणि धर्म सर्व घटकांचा वापर करूनही एवढीच मजल मारता आली ह्याचा अर्थ काय होतो?
शिल्लक मागे उरलेल्या पक्षांची मात्र वाताहात झाली. कार्यकर्त्यांना जवळजवळ वाऱ्यावर सोडल्याची भावना बळावत आहे. कुणी कुणाला विचारत नाहीये. कुठलाही कार्यक्रम नाही, बोलावणे नाही, प्रचार–प्रसार नाही, आपल्याच कोषात धुंद लोक पक्ष संपवायला कारणीभूत ठरताहेत.
असेच निकाल महानगर पालिकांचे लागतील ह्यात कुणाच्याही मनात आज तरी शंका उरलेली नाही.
राहुल गांधी यांचे जबरदस्त कमबॅक यामुळे काँग्रेसचा जनाधार वाढू लागला आहे पण राज्यात आणि जिल्ह्यात जमिनीस्तरावर अपवाद वगळता प्रभावी नेतृत्व नसल्याने काँग्रेस हवी तशी उभारी घेऊ शकली नाही हे वास्तव मान्य करावेच लागेल. उबाठा आणि मनसे तर अस्तित्वहीन झालेली आहे. मुंबई ताब्यात ठेवली तरच उबाठा आणि मनसे तग धरू शकेल अन्यथा हे पक्ष इतिहासात जमा होतील.
निवडणुकीत जनाधार लागतोच पण तेवढाच पुरेसा नसतो. सर्वात महत्त्वाचे असते निवडणुकांचे व्यवस्थापन, प्रभावशाली वक्ते, पैसा, चर्चेतील मुद्दे, जनतेचे प्रश्न, समस्यांचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडण्याची कला, माध्यमे आणि सर्वसामान्य माणसाची सहानुभूती व विश्वास या सर्वच स्तरावर आघाडीतील घटकपक्ष उदासीन दिसून आलेत. परिणामी असेच निकाल लागणार ह्याची कल्पना विश्लेषकांना आलेली होती.
काँग्रेस सोबत युती केल्याने जिल्ह्यातील फुलंब्री येथे उबाठाला खाते उघडता आले. काँग्रेसला आघाडीतून बाहेर ठेवणे परवडणारे नाही ह्याची जाणीव माविआ ला झाली असेल तर काही प्रमाणात मनपा मध्ये फरक पडू शकेल.
भाजपकडे आय आय एम आणि आय आय टी सह बदलत्या काळात व्यवस्थापन सांभाळणारे लोक आहेत. MBA झालेल्यांची फौज आहे. कमालीचे ट्विस्ट निर्माण करणारे लेखक आहेत. युतीने आपापसांत भांडणाचे असे मायावी चित्र निर्माण केले की जनतेच्या समोर केवळ युतीतील पक्षांचीच चर्चा अधिक झाली. त्यांच्यातील वादांचा तोटा अजित पवार गटाला सर्वाधिक झाला.
पण या दरम्यान आघाडी गाफील राहिली आणि विरोधकांची जागा शिंदेसेनेने बळकावत आपला वरचष्मा कायम ठेवला.
मविआ कडे प्रवक्त्यांची कमतरता जाणवली. सत्ताधाऱ्यांचे अपयश, चर्चेतील मुद्दे, जनतेचे प्रश्न, समस्या, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर रान उठवण्यात ही मंडळी कमी पडली. नेत्यांच्या हव्या तेवढ्या सभा झाल्या नाहीत, प्रचारात कमालीची उदासीनता आणि तोचतोपणा होता. तेचते चेहरे आणि नेहमीचेच कारभारी हा भाजपाला सशक्त पर्याय आहे असे जनतेला वाटलेच नाही.
पराभूत लोकांच्या हाती पक्ष सोपवल्याने बहुतांश ठिकाणी पराभवच होणार ह्याचा अंदाज ह्यांना आला नाही. निव्वळ अँटी इन्क्युंबन्सी च्या जोरावर सत्ता मिळवू या भ्रमात राहिल्याने यशाने हुलकावणी दिली.
एकंदरीत अपयशाची आधीच कल्पना होती, केवळ निवडणुकांना सामोरे जायचे म्हणून गेल्याने अल्प प्रमाणात आणि नैसर्गिक विरोधी जनमतामुळे जेवढे यश मिळायचे तेवढे यश आघाडीला मिळाले.
विदर्भात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. काँग्रेसने संघटन बळकट करण्याकडे आणि प्रवक्त्यांची फौज उभीं करण्याकडे लक्ष दिल्यास बोलणारी तोंडे वाढतील आणि भाजपला देशभर असलेला एकमेव पर्याय म्हणून काँग्रेस ताकदीने उभा राहील. पण त्यासाठी काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलून टाकायला हवा.
बदलत्या काळानुसार संघटनेत बदल करावे लागतील. नव्या टॅलेंटची आणि नेतृत्वाचा शोध घ्यायला हवा. स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदानाला उजळणी देत जनतेच्या मनात जागा मिळवावी लागेल. पारंपारिक पद्धतीचे राजकारण करण्याचा काळ कधीच संपलाय ह्याची जाणीव व्हायला हवी.
काही घटक पक्षातील स्थानिक नेतृत्वाकडे पाहिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते. राग राग करत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कसपटाप्रमाणे वागणूक देणे सत्तेच्या काळात धकून जाते; पण सत्ता नसताना, पक्ष हवालदिल आणि दुर्बल झाल्यावर अहंकार, ताठा, गर्व असणारे आणि कार्यकर्त्यांवर चिडचिड करणारे नेते बाजूला सारण्याची कला पक्ष नेतृत्वाकडे असायला हवी. त्या ऐवजी विनयशील आणि आपुलकी जोपासणाऱ्या चेहऱ्याची निवड करायला हवी हे उमगायला पाहिजे.
शहराच्या समस्या, विरोधकांचे कमकुवत दुवे, जनतेच्या मनाचा ठाव घेता येईल असे प्रश्न, उत्कंठा वाढवली जाईल असे आंदोलन, त्यानंतरचे एपिसोड्स ह्यांची तयारी हवी.
ह्या सर्वच बाबतील महाविकासआघाडी गाफील राहिली आणि भाजपा ह्या सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरली.
या सर्वच स्तरावर माविआ जोवर आपल्या कार्यशैलीत बदल करत नाही, तोवर भाजपला पुढील काळ मात देणे अशक्य आहे.
भाजपाशी वाद असल्याची बतावणी करून शिंदेसेनेने भाजपा विरोधकांची जागा काही प्रमाणात बळकावली. भाजपाचे विरोधक असलेल्या हिंदूंची मते मिळवण्यात शिंदेसेना यशस्वी ठरली.
रघुनाथदादा पाटील.
राजकीय विश्लेषक, लेखक, कादंबरीकार, राजकारणी, BSC (Gen), MBA (Marketing.), MA (Mass communication & Journalism), LLB
रघुनाथदादा पाटील प्रतिष्ठान
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
