भयकथा-संग्रह

भयकथा-संग्रह

Share

नावाप्रमाणेच हा एक संग्रह आहे भयकथां?

नावाप्रमाणेच हा एक संग्रह आहे भयकथांचा. फक्त मनोरंजन आणी एका वय्यक्तिक छंदामुळे तयार केलेला. पण यात तूम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तूम्ही सुद्धा तूमच्या गोष्टी आम्हाला message करु शकता. त्या तूमच्या नावासहीत पेजवर पोस्ट केल्या जातील.

26/12/2025

या ख्रिसमसला तुमच्या घरी कोण येणार?

गिफ्ट देणारा सँटा कि मुलं पळवणारा क्रॅम्पस?

भली मोठी शिंगे, भयानक तिक्ष्ण दात, अर्धा बकरा तर अर्धा राक्षस असे भयंकर रुप असलेला सैतान, ज्याला पाहून लहान मुलेच काय, तर मोठी माणसेही थरथर कापू लागतील. पण हा राक्षस ज्याला लोक क्रॅम्पस म्हणून ओळखतात, तो नेमका आहे तरी कोण?

तोही सँटा सारखाच, ख्रिसमसच्याच दिवशी येतो का?

आणि तो खरच मुलं पळवतो का? मुलं पळवण्या मागच त्याचं कारण काय असत?

आज आपण ख्रिसमसच्या म्हणजेच नाताळ सणाच्या निमीत्ताने याच क्रॅम्पस बद्दल जाणून घेणार आहोत.

नाताळचा सण म्हणजेच ख्रिसमस म्हटला, तर लहान मुलांसाठी सर्वात मोठा आकर्षणाचा विषय असतो, तो म्हणजे सँटाक्लॉज, ज्याला मराठीत नाताळबाबा असेही म्हटले जाते. आपण हे लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत, कि नाताळ सणाच्या आदल्या रात्री, म्हणजे 24 डिसेंबरच्या रात्री आपण झोपताना काही इच्छा मागीतल्या, किंवा त्या एका चिठ्ठीवर लिहून झोपण्याआधी आपल्या उशाशी ठेवल्या, कि रात्री आपण झोपल्यावर, घराच्या धुरांड्यातून किंवा खिडकीतून सँटा आपल्या घरी येतो आणि आपल्या त्या इच्छा पुर्ण करुन जातो.

काहीवेळा तर मुले 24 डिसेंबरच्या रात्री आकाशात सँटाचा बाराशिंगे चालवत असलेला रथही शोधत असतात. याशिवाय प्रत्यक्षात मोठ मोठ्या दुकानांबाहेर सँटाच्या वेशात चॉकलेट वाटणारी माणसेही आपण अनेकदा पाहीली आहेत. थोडक्यात, ख्रिसमस म्हटला कि हा सँटा आला आणि सँटा म्हणजे भेटवस्तू आणि खुपसारी चॉकलेटं वाटणारा सँटा आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतो.

पण मग अचानकच विषय येतो, त्या क्रॅम्पसचा! हो क्रॅम्पस. अस मानल जात, कि ख्रिसमसच्या दिवसात आकाशातून जसा सँटा येतो. तसाच पाताळातून क्रॅम्पसही बाहेर येतो. पण तो दिसायला फारच भयानक असतो! क्रॅम्पस हा सँटाच्या उलट, वाईट मुलांना शिक्षा देण्यासाठी आणि स्वत:सोबत त्यांना पाताळात घेऊन जाण्यासाठी येतो! क्रॅम्पस हा प्रत्येक घरांच्या छतावरुन, त्यांच्या घरांच्या दारासमोरुन फेरफटका मारतो आणि वाईट मुलांना शिक्षा देतो.

म्हणजे भारतात जसा बागुलबूवा लहान मुलांना घाबरवतो तसाच विदेशात क्रॅम्पस हे काम करतो.

विचार केल्यावर, या क्रॅम्पस मागे एकच भावना समजते, लहान मुलांनी पालकांच ऐकाव आणि उगाचच दंगा मस्ती करु नये, इतरांशी वाईट वागू नये, कदाचीत याकरीताच या क्रॅम्पस नावाच्या काल्पनिक राक्षसाचा कथांमधून जन्म झाला असावा.

पण हे सगळ वाचून, तुम्हाला अस वाटत असेल कि तुम्हाला क्रॅम्पस बद्दल सगळं काही कळल असेल तर थोडं थांबा कारण तुम्हाला अजून बरच काही कळणं गरजेच आहे.

त्यासाठी आधी आपल्याला मध्य युरोपातील या गोष्टीकडे थोड निट लक्ष देवून ऐकाव लागेल.

क्रॅम्पस या राक्षसाचा सर्वात जास्त उल्लेख हा मध्य युरोपातील लोकसाहित्यात ऐकायला मिळतो. शिंगे असलेला आणि अर्ध बकरा अर्ध राक्षस असे रुप असलेला हा क्रॅम्पस ख्रिसमसच्या फार आधीच तिथे येतो आणि वाईट मुलांना शिक्षा देतो अस म्हणतात. तो त्यांना टोपलीत बसवतो आणि स्वत:सोबत नरकात घेवून जातो. पण तो एकटा नसतो. तर तो सेंट निकोलसचा एक विरुद्ध स्वभावी साथी म्हणून तिथे येतो.

तुम्ही म्हणाल आता हे सेंट निकोलस कोण? गोंधळून जावू नका, तेही स्पष्ट करतो.

दरवर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला, म्हणजेच 5 डिसेंबरच्या रात्री, जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील मुले सेंट निकोलसच्या भेटीसाठी फार उत्सुकतेने तयारी करत असतात. कारण जी मुले चांगली वागतात त्यांना सेंट निकोलस भेटवस्तू आणि खाऊ देतात, परंतु जी मुले वाईट वागतात त्यांना त्यांचा धमकावणारा साथीदार, क्रॅम्पस, जो राक्षसी स्वभावाचा असतो, तो अशा मुलांना मारहाण करतो आणि त्यांना नरकात खेचतो!

थांबा, तुम्हालाही तेच वाटल? सेंट निकोलस यांना मध्य युरोपातील सँटा म्हणूनच ओळखले जाते.

पण तिथे ते 4 डिसेंबरच्या रात्री क्रॅम्पस आणि एका परखता नावाच्या दोन चेहऱ्याच्या देवी सोबत येतात. एक अशी देवी जी सुंदर आणि कुरुप, गोरी आणि काळी अशी दुहेरी चेहऱ्याची असते. पण आज आपण केवळ क्रॅम्पस बद्दल बोलणार आहोत.

क्रॅम्पस हे नाव "क्लॉ" या जुन्या जर्मनिक शब्दापासून मिळाले आहे आणि तो नॉर्स पौराणिक कथांमध्ये नरकावर राज्य करणाऱ्या हेलचा मुलगा असल्याचे म्हटले जाते. क्रॅम्पसचे वर्णन मानवी व्यक्तिमत्त्व पण अर्धा बकरा आणि अर्धा राक्षस असे केले जाते, जो ग्रीक पौराणिक कथां मधल्या सैतायर आणि फॉन्सस अशा राक्षसी प्राण्यां प्रमाणे अाहे. त्याला लांब शिंगे, नखे आणि बकरीसारखी दाढी असते. तो दुष्ट वाईट मुलांना बर्चच्या फांद्यांनी मारतो किंवा त्यांना पोत्यात घालून पळवून नेतो आणि त्यांना त्याच्या गुहेत घेऊन जातो. क्रॅम्पसचा जन्म मनुष्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचे एक प्रकारे संरक्षण करण्यासाठी झाला असावा. तसेच भूत पिशाच्चांना घाबरवण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भीतीवर मात करण्यासाठी तो जन्मला असावा असे मानले जाते.

क्रॅम्पस बद्दल तुम्ही आधीही कधी ऐकले होते का? कमेंट करुन नक्की सांगा.

https://youtu.be/Yjm9SmxIYD8





जेव्हा ग्रहण लागते | भयकथा | Marathi Horror Story | Horror Experience in Marathi | Marathi Bhaykatha 07/04/2024

सुटका...
लेखक- आनंद कुलकर्णी

जानेवारीतले थंडीचे दिवस.सूर्यनारायण संध्याकाळी जरा लवकरच आपल्या धामास जाण्याच्या तयारीत.पश्चिमेच्या समाधीस्थानात आसनस्थ होण्यासाठी.पुन्हा पहाटे डोळे उघडण्यासाठी.हळूहळू अंधाराचा सर्प साऱ्या आसमंतास गिळू लागला.सावल्या लांबलचक होऊन तिमिराच्या पायावर कोसळू लागल्या.पश्चिमेकडची लाली सुद्धा लोप पावू लागली.रात्रीचे निशाचर अंग झटकून बाहेर पडू लागले.घुबडांचे चित्कार,कोल्हेकुईची कर्कश वाणी,तरसांचे विचित्र हास्य,लांडग्यांचे बीभत्स रुदन वातावरण भीतीदायक बनवू लागले.साऱ्या शहरावर अंधाराची दाट काळी साय पसरू लागली.
त्या प्रचंड शहराच्या बाहेरची ती निर्जन टेकडी.आजूबाजूला दाट झाडी.त्यातून घोंगावणारा बोचरा,गार वारा.त्यात विसावलेले आणि काही जागे झालेले निशाचर.खडकाळ जमिनीतून,वर जाणारी कच्ची चढण.त्या चढणीवरून धापा टाकत,पुन्हा बसत पुन्हा उठत टेकडीच्या माथ्याकडे जाणारी ती असहाय्य, अभागी स्त्री.तसल्या थंडीतही घामाने निथळत,धपापल्या उराने चढ चढत,टेकडीवरच्या त्या मंद प्रकाशाच्या रोखाने जाणारी एक श्रीमंत,सुंदर तरुणी.घरातून तडकाफडकी बाहेर पळून आलेली.वाट फुटेल तिकडे चालत शेवटी या अंतिम आशेकडे पावले टाकणारी.डोळ्यांतली आसवे आणि घसा दोन्ही सुकलेली.अबला,असहाय्य.पण ती होती तरी कोण?
लग्नापासूनची ही पाचवी अमावास्या. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली.गेल्या चार अमावस्यांच्या विचारानेच आज ती भयंकर अस्वस्थ होती.तिच्या मनाचा चंद्र दोन दिवस आधीच भीतीने गिळला होता.संध्याकाळ आसमंताला पछाडू लागली तशी तिच्या मनालाही भिववू लागली.आता पुन्हा तेच.परत परत तेच.लग्नानंतरची ती पहिली रात्र.शयनगृहात ते दोघेच.गुजगोष्टी करत बसलेले.फ्रेश होऊन ती वॉशरूमच्या बाहेर आली तेंव्हा मात्र तो तो उरला नव्हता.बेडवर बसून अधाशी नजरेने तिच्याकडे बघत होता.त्याचा चेहरा,त्यावरील विकृत हास्य,त्याचे डोळे,त्यातली ती फिकट हिरवट पिवळसर झाक,किळसवाणी.क्षणात त्याचे तिला बेडवर ओढणे,भांबावलेल्या तिला बळजबरी कुस्करणे, रात्रभर प्रचंड वेदना,लोळागोळा होऊन पडलेली दोघांची शरीरे,त्याचे तृप्त,तिचे घायाळ,उध्वस्त.
अमावास्येला तर कहरच.त्याचे घरीच राहणे.जनावरासारखे तिच्यावर तुटून पडणे.एखादया अजगराप्रमाणे त्याचे तिला घट्ट आवळून भोगणे.दिवसा रात्री कधीही.त्यात पुन्हा मद्यपान. तो घाणेरडा दर्प.पण कोणाला सांगावे.त्यालाही विचारण्याची सोय नव्हती. त्यालाच काही आठवत नसे.ऐकल्यावर तिच्याकडेच टक लावून बघत असे.एक हलकीशी हरवी पिवळसर छटा त्याच्या डोळ्यांत झळकत असे.भीतीदायक,किळसवाणी.त्याहून किळसवाणे त्याच्या चेहऱ्यावरील हास्य छटा.मग तिनेच विचारणे बंद केले.ती तरी काय करू शकत होती.संस्कारांच्या बांधाआड आसवांचा पूर थोपवत होती.लाजेच्या पदराखाली घायाळ मन लपवत होती.संकोचाच्या भिंतीआड जखमी शरीर वागवत होती.माहेरी गेली तरी काही सांगत नसे.परत सासरी जाताना जीव नकोसा होई.त्याचे आईवडिलांना पण न जुमानणे.तिला त्याच तीन,चार दिवसांत अशक्य ओरबाडणे.पण महिन्याच्या इतर दिवसांत सामान्य वागणे.सारेच अतर्क्य,अनाकलनीय.
ती त्या टेकडीवरच्या,लहान घुमटीपर्यंत येऊन पोहोचली.कशीतरी एक व्यक्ती आत जाऊन बसू शकेल एवढीच ती घुमटी.ती इथवर कशी आली तिलाच कळेना.तिच्या घरचे बाहेरगावी गेले होते.घरात ती आणि तो पशू. हळूहळू त्याच्यातला पाशवी रंग त्याच्या चर्येवर उमटू लागलेला दिसत होता.आज रात्री परत तेच होणार या भीतीनेच तिने घरातून,सायंकाळी च पलायन केले होते.कुठे जाणार,काय करणार काहीच माहिती नाही.एक अनामिक ओढ तिला इथपर्यंत घेऊन आली होती.पडत,ठेचकाळत कशीबशी.
तिने त्या छोट्या,बंद दाराच्या गजांतून आत पाहिले.एक मंद तेवणारे तुपाचे निरांजन.तिन्ही बाजूंना भिंत असल्याने,छोट्या दारातून येणाऱ्या आणि विझवू पाहणाऱ्या आगाऊ वाऱ्याला न जुमानता फडफडणारी;पण ठामपणे पेटलेली स्निग्ध ज्योत.त्या ज्योतीच्या प्रकाशाच्या अभिषेकात न्हाऊन निघणारी,एक शुभ्र संगमरवरी,सुबक ठेंगणी मूर्ती.जरीकाठाचे भगवे वस्त्र ल्यालेली.तीन शिरे आणि सहा हात.तिन्ही चेहऱ्यांवर स्मितहास्य.कपाळी केशरी गंधाचे टिळे.हातांत विविध शस्त्रे.त्रिशूळ,गदा,चक्र.सोबत पद्म, कमण्डलू, माला.काखेस भगवी झोळी.शुभ्र गाईस टेकून उभी.पायांत घोटाळणारे चार श्वान.चरणांवर सकाळी वाहिलेली फुले थोडीशी कोमेजलेली.चरणांसमोर चंदनी खडावा.चंदनविलेपित.सुगंधी.
दोन्ही हात जोडून ती करुण नजरेने त्या दैवताकडे बघू लागली.हृदयाच्या भिंतींना दुःख धक्के देऊ लागले.डोळ्यांच्या कडांचे बांध फुटून आसवांचे लोट कधी वाहू लागले तिचे तिलाच कळेना.मिटलेल्या तोंडाची दारे उघडून हुंदके आक्रोशाच्या रुपात बाहेर उड्या घेते झाले.हातांची गजांवरील पकड घट्ट झाली.तापलेल्या मस्तकाने गजांवर हल्लाबोल केला.किल्ल्याच्या दारावर कितीदा धडका देऊन गंडस्थळ फुटलेल्या हत्तीसारखे तिचे डोके भग्न पावले.दरवाजाला रक्ताचा अभिषेक झाला.थकलेली काया घुमटीच्या उंबऱ्यावर लोळण घेती झाली.कोसळताना तिने आत बघितले.त्या मूर्तीच्या हातातील त्रिशूळातील मधल्या शूळाच्या टोकावर एक लालबुंद ठिणगी पेटली होती.क्षणार्धात त्या ठिणगीचा सूर्य झाला.त्या तेजस्वी लाल पिवळ्या प्रकाशाने घाबरलेल्या तिच्या बुबुळांनी पटकन पापण्यांच्या चादरींत स्वतःला मुस्कटून घेतले.तिचा देह धरणीवर नतमस्तक झाला.
तिच्या बंगलोच्या मागच्या दाराजवळ ती उभी होती.तिच्यासमोर काही फूट अंतरावर तो पाठमोरा उभा होता.एक कृश,कळकट देह.चिंध्या ल्यालेला.मद्यपान केलेला.दुर्गंधीयुक्त.त्याने मागे वळून पाहिले.विस्कटलेल्या दाढीमिश्यांनी झाकलेल्या चेहऱ्यावर एक उदास भाव होता.हिरवट पिवळे डोळे क्षणभर तिच्यावर रोखून त्याने मान फिरवली आणि बंगलोत प्रवेशता झाला.तिही त्याच्यामागून घरात शिरली.लाईट्स गेलेले.पूर्ण दिवाणखाना अंधाराच्या मिठीत.काही क्षण तो पुरुष दिवाणखान्यात फिरता झाला.नन्तर त्या भव्य जिन्याच्या पायऱ्या चढू लागला.तीही त्याच्यामागून जिना चढू लागली.वर गेल्यावर तिच्याच शयनगृहाचा दरवाजा उघडून तो आत जाता झाला.दार लावत असताना परत एक कटाक्ष त्याने तिच्यावर टाकला.धाडकन दार बंद झाले.तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली.आत जावे की नको.बळ एकवटून तिने दरवाजा ढकलला.दार उघडले गेले.आत काळोखाचा समुद्र.तरीही त्यात तिने बुडी दिली.अचानक लाईट्स आले.तिच्यासमोर हातभर अंतरावर तो छताला लोम्बकळत होता.
खाडकन तिचे डोळे उघडले.कपाळातून वेदना उसळत होत्या.रक्त सुकले होते.कितीतरी वेळ ती बेशुद्ध पडली होती.ती उभी राहिली.तिने गजांतून आत पाहिले.निरांजनाच्या स्निग्ध उजेडात ती सात्विक मूर्ती उजळून निघाली होती.त्या दैवताकडे बघून तिने हात जोडले.त्या दैवताच्या डोळ्यांत अपार करुणा दिसत होती.ओठांवर स्नेहार्द्र,मंद स्मित विलसत होते.ती एकटक त्याच्याकडे बघू लागली.कितीतरी वेळ तिची जणू समाधीच लागली.भानावर आली तेंव्हा चंद्रकोर बरीच वर आलेली दिसली.आता तिच्या पायांना परतीची ओढ जाणवू लागली.ज्या अनामिक,अदृश्य शक्तीने तिला त्या नरकातून पळून इथवर येण्यास भाग पाडले होते तिनेच तिच्या पावलांना माघारी फिरण्यास बजावले.त्या दैवतास पुन्हा नमस्कार करून ती उतार उतरू लागली.पण आता तिचे मन वेगळ्याच शक्तीने भारले गेले होते.सायंकाळची टेकडीवर येताना असलेली भीती कुठल्या कुठे पळून गेली होती.खाली दूर शहर दिव्यांनी उजळून निघाले होते.जणू आकाशातल्या चांदण्याच निखळून खाली पडल्या होत्या.पण टेकडीवर मात्र भयाण काळोख होता.पण तिला त्याची फिकीर नव्हती.एका विलक्षण तंद्रीत ती वाट उतरत होती.ठेचकळायला लावणारे खडक,पायांतून सळसळत जाणारा एखादा जीव,झुडुपांमध्ये लुकलुकणारे लाल,हिरवे डोळे,निशाचरांचे चित्रविचित्र आवाज,प्रचंड गार वारे या कश्याचीच तिला तमा नव्हती.ती निर्धास्त वाट उतरत गेली.
https://youtu.be/S5CHN8AxcWA
बंगलो पूर्ण काळोखात बुडून गेलेला.गेटचे कुलूप उघडून ती आत गेली.मुख्य दरवाजाचे कुलूप उघडले.तशी एक भयंकर आरोळी बंगलोत घुमली.पण तिला फरक पडला नाही.घराबाहेर जाण्याआधी तिने युक्तीप्रयुक्तीने त्याला शयनगृहात कोंडलेले.त्याच्या मद्याच्या बाटल्याही बाहेर नाल्यात रित्या केलेल्या. नोकरचाकर दुपारीच तिने घरी पाठवले होते.वॉचमन रजेवर.घरचे बाकीचे बाहेरगावी. कुठल्यातरी एका अदृश्य प्रेरणेने तिने हे सर्व केले होते.तिचे तिलाच कळत नव्हते.तिने दिवाणखान्यातल्या सर्व लाईट्स चालू केल्या आणि ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागली.तसतसे तिच्या शयनगृहातून एक विचित्र गुरगुर तिला ऐकू येऊ लागली.पाशवी आवाज.पण ती शांतच होती.तिने शयनगृहाचे कुलूप काढून दार ढकलले.
एकदम लाईट्स गेल्या.ती दारातच उभी होती.खोलीतले काहीही दिसत नव्हते.फक्त तिच्या नवऱ्याच्या घशातून येणारा तो विचित्र आवाज.खाडकन दार झाकले गेले.ती तशीच पुढे सरकली.तेव्हढ्यात त्याने तिच्यावर झडप घातली.पण तिने निकराने त्याला जोरात ढकलून दिले तसा तो भुईवर कोसळला.चकित झालेला तो परत उभा राहिला.जास्तच त्वेषाने तिच्यावर त्याने झेप घेतली तरी तिनेही त्याच त्वेषाने पुन्हा त्याला ढकलले.आता मात्र तो भांबावून गेला.तरीही त्याने तिला बेडवर ढकलले व जबरदस्ती करू लागला पण तेव्हढ्यात अचानक खालून,दिवाणखान्यातून खट् खट् खट् असा आवाज येऊ लागला.अचानक विजेचा झटका बसावा असा तो तिच्यापासून दूर झाला व जमिनीवर ताठ उभा राहिला.तो खट् खट् आवाज करीत कुणीतरी जिना चढत वर येत होते.तिच्या नवऱ्याचे शरीर थरथरू लागले.घशातली गुरगुर जास्तच वाढू लागली.दातांवर दात आपटू लागले.हुडहुडी भरल्यासारखे तो करू लागला.तो खट् खट् आवाज आता परिवर्तित होऊन खाड् खाड् असा जोरात व सुस्पष्ट येऊ लागला.तिचा नवरा डोळे फाडून शयनगृहाच्या बंद दाराकडे पाहू लागला.
खाडकन दार उघडले गेले.तो दाराकडे बघतच होता.त्याचे थरथरणारे शरीर अचानक लाकडासारखे ताठ झाले.घशातून एक प्रचंड आरोळी बाहेर पडली.तिने दाराकडे पाहिले.एक लालबुंद ठिणगी अधांतरी तरंगत होती.एक चंदनी सुगंध दरवळू लागला.क्षणार्धात त्या ठिणगीचा सूर्य झाला.त्या सहस्त्ररश्मीच्या शलाका त्याच्या शरीरावर बाणांसारख्या झेपावल्या. त्याच्या देहाची प्रचंड आग होऊ लागली.तो गुरासारखा भयंकर ओरडू लागला.गडबडा लोळू लागला.त्याच्या शरीरातून एक हिरवट धूर बाहेर निघाला व त्यातून एक हिडीस रूप प्रकट झालं.एक कृश,रोगट शरीर.चिंध्या ल्यालेलं.अस्ताव्यस्त केस.विस्कटलेल्या दाढीमिश्या.घाणेरडे हिरवट पिवळसर डोळे.अंगाला उग्र दर्प.तिचा भानावर आलेला नवरा व ती दोघेही डोळे विस्फारून ते दृश्य पाहू लागले.भयंकर आरडाओरडा करणाऱ्या त्या अभागी देहातून ठिणग्यांचा कारंजा उसळू लागला.त्याच्या अंगभर ठिणग्यांचं झाडच डवरलं.हळूहळू त्याचा आवाज,त्याची गुरगुर सारेच शांत होत गेलं.त्याचं पेटलेलं शरीरही हळूहळू विरत गेलं.राखही शिल्लक नाही राहिली.दुसऱ्या मितीतला त्याचा मागमूसही नष्ट झाला.
तो सूर्यही हळूहळू विझत गेला.विझत विझत त्याची ती लालबुंद ठिणगी तेव्हढी तरंगत राहिली.तीही विझली तशी अचानक लाईट्स आले.त्या दोघांनाही शयनगृहाच्या भिंतीवर एक भव्य सावली दिसली.तिने लगेच ती सावली ओळखली.त्या टेकडीवरच्या घुमटीतली ती सुबक ठेंगणी मूर्ती.तिचीच ही सावली.पण त्या सावलीची तिन्ही शिरे मात्र पार शयनगृहाच्या छताला जाऊन भिडलेली.तिने नवऱ्याला खुणावले व दोघांनीही त्या सावलीपुढे लोटांगण घातले.तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या.अमावास्या दोन दिवसांवर आलेली पण आता त्या दुरात्म्याच्या ग्रहणातून त्या उभयतांची सुटका झाली होती.दोघांनी उठून पाहिले तो ती सावली अदृश्य झालेली.दोघेही हात जोडून साश्रूनयनांनी दाराकडे वळले.कुणीतरी जिना उतरत होते.चंदनी सुगंध दरवळत हळूहळू विरत चालला होता.चंदनी खडावांचा खाड् खाड् आवाजही दूर दूर जात होता.अनंतात.

https://youtu.be/S5CHN8AxcWA



जेव्हा ग्रहण लागते | भयकथा | Marathi Horror Story | Horror Experience in Marathi | Marathi Bhaykatha जेव्हा ग्रहण लागते मराठी भयकथा Marathi Horror StoryBagulboowa (Bagulbuva/बागुलबूवा) तर्फे बनवलेला हा व्हिडियो संपूर्णत: काल्पनिक स्वरुपाच....

अमावस्या ग्रहण - अधाशी | सूर्य ग्रहण Marathi Horror Story | Bhaykatha | Horror Experience in Marathi 07/04/2024

अधाशी...
लेखक- आनंद कुलकर्णी
सायंकाळची वेळ.त्या गजबजलेल्या शहरातील,मध्यवस्तीतील, तो अतिशय पॉश बंगलो.बागेतल्या झाडांसह,लायटिंगच्या माळांनी आणि फुलांच्या हारांनी सजलेला.मंद ध्वनियंत्रणा,बाळगोपाळांचा कलकलाट आणि पैपाहुण्यांच्या हास्यविनोदाने दुमदुमणारा.गर्दीच्या केंद्रस्थानी एक नवविवाहित जोडपे.देखणा,तरुण वर आणि नाजुक,सुंदर वधू उंची पोशाख ल्यायलेले.भेटवस्तूंचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करणारे.दोघांच्या मित्रमैत्रिणींचे हास्यविनोद आणि एकमेकांतील नवीन चेहऱ्यांचे निरीक्षण. स्वादिष्ट पक्वान्नांचा घमघमाट आणि ऊंची अत्तरांच्या सुवासात न्हाऊन गेलेला आसमंत.आतिषबाजीने धुरकटलेला आणि ठिणग्यांनी उजळलेला.ऊंची वस्त्रे,साड्या वगैरेंमध्ये पक्वान्नांचा आस्वाद घेत,गप्पाटप्पा मारणाऱ्या उच्चभ्रु लोकांनी गजबजलेला.सेवेकरी नोकरांची लगबग,रिचवले जाणारे मद्य आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे प्याले,सारेच धुंद वातावरण.पूर्ण स्वागत समारंभच धुंदफुंद.
रात्र चढू लागली तसे हळूहळू सर्व ढेकर देत आणि एकमेकांना सांभाळत आपापल्या घरी पांगू लागले.नोकरचाकरांनी आपापली जेवणे आटोपली आणि बागेतील सर्व पसारा आवरला.नवीन जोडप्यासह घरचे सर्व आपापल्या शयनगृहांत निघून गेले.नवपरिणीत जोडप्याची,दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम, उंची,कोमल बिछाना आणि सुंदर फुलांनी सजवलेली.सर्वत्र अत्तर शिंपडले होते आणि आकर्षक मंद रोषणाई होती.नवरोबाच्या मित्रांची त्याच्याशी चेष्टा चालूच होती.नवरीच्या मैत्रिणी पण चावट शेरे मारून नवरीला लाजून चूर करीत होत्या.दोघांना बेस्टलक देऊन एकदाची ती जत्रा निघून गेली तसे दोघांना ही हायसे वाटले.रूमचे दार लावून दोघेही पलंगावर बसले.गेले काही दिवस,लग्नसमारंभ,देवदेव आणि आजची पार्टी यामुळे दोघेही थकून गेले होते.तसे लग्न ठरल्यावर दोघेही मोबाईलवर बोलत असत.एकमेकांना जाणून घेत होते.पण आज प्रत्यक्ष एकत्र येण्याचा पहिलाच प्रसंग.संकोच आणि आवेग दोन्हीही.उत्साह आणि लज्जा दोन्हीही.दोघांच्यात गुजगोष्टी सुरू झाल्या.
रात्रीचे बारा वाजले तसे त्या शयनगृहात एक हिडीस दृश्य आकार घेऊ लागले.छताच्या पंख्याच्या हुकमधून,एक जाडसर रुपेरी दोर प्रकट होऊ लागला.आस्ते आस्ते त्याची लांबी वाढत,त्याच्या दुसऱ्या टोकाने वर्तुळाकार धारण केला.त्या वर्तुळात एक किळसवाणा चेहरा प्रकट होऊ लागला.अस्ताव्यस्त विस्कटलेले,घामट,लांब केस,मिटलेले डोळे,निस्तेज घाणेरडी त्वचा,दाढी मिश्यांचे दाट पुंजके.हळूहळू कणाकणाने चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत एक खतृड,रोगट शरीर साकार झाले.मळकट,फाटक्या वस्त्रांनी आच्छादलेले.दुर्गंधीयुक्त.अचानक त्याने खाडकन डोळे उघडले.हिरवट पिवळी बुबुळे गरागरा फिरू लागली.ते दोरीचे वर्तुळ अचानक खेचले जाऊन आवळले गेले.त्याचे कृश हात गळ्याभोवती फिरू लागले.शरीर जोरजोरात झोके घेऊ लागले.रोगट पाय हवेतच थाडथाड लाथा झाडू लागले.तसा तो दोर जास्तच आवळला जाऊ लागला.दोन्ही हात दोर सोडवण्याची पराकाष्ठा करू लागले.दोराने करकचून आवळलेल्या,घुसमटलेल्या घशातून विचित्र आवाज येऊ लागले.हिरवट पिवळे डोळे आता रक्ताळले होते.
खोबणीबाहेर पडू पाहू लागले.नाकातोंडातून द्रव वाहू लागला.खालच्या बाजूनेही घाण बाहेर पडू लागली.खूप धडपडीनन्तर शेवटचे आचके देत तो शांत झाला.असहाय्यपणे हात ढिले पडून खाली आले.पायही थांबले.पूर्ण शांत झालेला तो रोगी सावकाश झोके घेऊ लागला.आपोआप.नंतर झोकेही थांबले.तो विद्रुप तसाच लोम्बकळत राहिला.स्तब्ध.पण या सर्वांची वार्ताही त्या जोडप्याला नव्हती.त्या पलंगापासून हाताच्या अंतरावर ते धूड लोम्बकळत होते.कुठल्यातरी वेगळ्या मितीत ते असावे म्हणूनच त्या दोघांनाही ते दिसत नव्हते.ते प्रणयोत्सुक जोडपे गुजगोष्टींत रममाण.तो डोळे फाडफाडून त्यांच्याकडेच बघत होता.पण तो होता तरी कोण?
त्या वेश्येने,शिव्या देत सरळ त्याला दारातूनच हाकलले.आधीच तो असाध्य आजाराने ग्रासलेला.दारूच्या व्यसनाने पोखरलेला.लहानसहान चोऱ्यामाऱ्या करून पोट भरणारा.एका धंदेवाईक बाईचा मुलगा.आई असाध्य आजाराने खूप पूर्वीच मेलेली.बापाचा पत्ताच नाही.शहराबाहेरील त्या बकाल वस्तीत वाढला.गुन्हेगारीच्या गर्तेत आपसूक ढकलला गेला.कित्येकदा जेलची हवा खाऊन आलेला.तरीही तसाच जगणारा.मिळवलेले पैसे बाई आणि बाटलीत उडवणारा बेफिकीर माणूस.तरुणपणीच आईसारखाच असाध्य रोगास बळी पडलेला.हळूहळू खंगू लागलेला.भिकेकंगाल अवस्था झालेला.वेश्यांनीही दूर लोटलेला.एक अभागी जीव.
https://youtu.be/BFtSYhgnVAQ
दुःखी व अपमानित तो जीव त्या निर्मिती अवस्थेत असणाऱ्या,भव्य इमारतीजवळ आला.मागच्या बाजूस,उघड्या दरवाजातील, तात्पुरता अडसर बाजूला ढकलून आत शिरला.कसेबसे तोल जाणारे,मद्यधुंद शरीर सावरत त्या भव्य पण कच्च्या हॉलमधल्या जिन्यावरून पायऱ्या चढत वर गेला.एका खोलीत शिरला.सर्वत्र पाणी मारल्याने ओलसर झालेल्या जमिनीवर कुडकुडत बसला.खिश्यात कोंबलेला वडापाव काढून एक घास खाल्ला.अपमानित मनाला तो घास कडूशार लागला.डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले.घास तसाच थुंकून तो ढसाढसा रडू लागला.ओल्या जमिनीवर लोळू लागला.थोड्या वेळाने मन शांत झाल्यावर परत उठून बसला.दुसऱ्या खिशातील दारूची छोटी बाटली काढून तोंडाला लावली.शेवटच्या घोटासह दुःखाचाही कढ गिळून टाकला.आता त्याचे मन एका भयंकर निश्चयाने भारले गेले होते.आज स्वतःच्या देहाची आणि मनाची तगमग तो कायमचा शांत करणार होता.त्याने उघड्या खिडकीतून आकाशाकडे पाहिले.चंद्रकला दिवसेंदिवस क्षीण होत चाललेली.अमावास्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली.आज त्यानेही आयुष्याचा चंद्र कायमचा मरणाच्या अंधाऱ्या जबड्यात ढकलून द्यायचे ठरवले.त्याच्या नजरेस कोपऱ्यात पडलेला एक जाडजूड दोरखंड पडला.त्याने छतात ठोकलेल्या एका लोखंडी हुक कडे पाहिले.बराच वेळ तो तिकडेच पाहत होता.
त्या रात्रीनन्तर दुसऱ्या दिवशी कामगारांना एक प्रेत त्या खोलीत लोम्बकळताना दिसले.प्रॉपर्टी मालकाने पोलिसांना बोलावून घेतले.बातम्या आल्या.कुणीच प्रेत नं ओळखल्याने बेवारस म्हणून नोंद झाली.परस्पर विल्हेवाट लावली गेली.पण नन्तर येईल त्या अमावास्येच्या आधी एक भयंकर प्रकार घडू लागला.अमावास्येच्या आधी एकदोन रात्री ते धूड प्रकट होऊ लागले.गळफासाची असह्य यातना सोसू लागले.जिवंतपणी वासनेने पिसाटलेला त्याचा देह आणि मन मेल्यानन्तरही वासनेने धगधगत होते.मरणानेही त्याची सुटका झाली नाही.दुसऱ्या मितीत घडणारा तो प्रकार इहलोकात कुणालाही दिसत नसे.अमावास्या संपून गेली की ते दृश्य विरून जात असे.
तोवर तो अभागी जीव मरणयातना सोसत राही.उघडया डोळ्यांनी असहाय्यपणे खोलीचे अंतरंग बघत राही.
बंगलोचे काम पूर्ण होऊन वर्षभर झाला असेल.एक अतिश्रीमंत,व्यापारी कुटुंब बाहेरच्या शहरातून तिथे राहायला आले.मूळ मालकाने तो प्रसंग लपवून,प्रचंड किमतीत तो पॉश बंगलो त्या कुटुंबाच्या गळी उतरवला.आणि त्या खोलीला आपली पर्सनल रूम बनवली,त्या कुटुंबातील एका देखण्या,तरण्याबांड युवकाने.एके रात्री ते धूड प्रकट झाल्यावर प्रथमच त्याच्या डोळ्यांना नजरेस पडला तो सुंदर तरुण.ते धूड लोम्बकळत त्याला न्याहाळत असे.सुंदर चेहरा,जिममध्ये कमावलेली पिळदार शरीरयष्टी,अतिशय उंची कपडे,महागडी अत्तरे वापरणारा एक लक्ष्मीपुत्र.कधीमधी घरचे नसले की मित्रमैत्रिणी आणून ओली पार्टी साजरी करणारा,उंची महागडी मद्ये हौस म्हणून पिणारा,एखाद्या सुंदर मैत्रिणीसोबत त्या खोलीत रात्र घालवणारा,कधीतरी एकटा असेल तर भावनावेगाने कामातुर होऊन हस्तमैथुन करणारा,एक उमदा पूर्ण पुरुष.त्याच्या स्वच्छंदी आयुष्याचा आणि सुंदर शरीराचा मोह त्या बीभत्स धूडास पडला.कित्येक अमावस्या ते धूड त्या मोहक तरुणाचे शरीर न्याहाळत असे.त्याच्या शरीराची तीव्र अभिलाषा त्या लोम्बकळणाऱ्या धूडाच्या मनात रुजली होती.गरज होती फक्त एका संधीची.
आणि तीच आज मिळाली.ती मिळवून दिली नवरदेवाच्या हळदीच्या अंगाने.कितीतरी वेळ ते नवयुगुल गोडगुलाबी गप्पा मारीत बसले होते.फ्रेश होण्याच्या बहाण्याने नवरीने वॉशरूममध्ये जाणे केले.नवरदेव थोडा वेळ इकडे तिकडे करत खिडकीतून आकाशाकडे बघू लागला.चंद्रकोर क्षीण होत चाललेली.अमावास्या दोन दिवसांवर आलेली.एक थंडगार शिरशिरी आपादमस्तक त्याच्या शरीरात सळसळत गेली.एक विलक्षण झटका त्याच्या शरीराला बसला.मागे सरकून तो बेडवरच कोसळला.काही क्षण शांततेत गेले.त्याने डोळे उघडले व बेडवर बसून राहिला.थोड्या वेळाने नववधू फ्रेश होवून बाहेर आली.आधीच गोरी काया,गेल्या काही दिवसांत,हळदीच्या स्पर्शाने आणखी उजळली होती.तिने हसून नवऱ्याकडे बघितले.तो एकटक तिच्याकडेच बघत होता.त्याच्या चेहऱ्यावर एक मंद पण विकृत हास्य होते.आणि डोळ्यांमध्ये एक हलकीशी हिरवट पिवळसर छटा.नजर तिच्या शरीरावर रोखलेली.तीव्र.अधाशी.
https://youtu.be/BFtSYhgnVAQ



अमावस्या ग्रहण - अधाशी | सूर्य ग्रहण Marathi Horror Story | Bhaykatha | Horror Experience in Marathi अमावस्या ग्रहण - अधाशीसूर्य ग्रहण स्पेशल Marathi Horror StoryBagulboowa (Bagulbuva/बागुलबूवा) तर्फे बनवलेला हा व्हिडियो संपूर्णत: काल्पनिक...

पिझ्झा (सत्य घटना) | Marathi Horror Experience | Horror Story | Marathi Ghost Story | Bhaykatha 20/09/2023

शीर्षक: पिझ्झा

कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काही अमानवी प्रसंग घडतात जे त्या व्यक्तीला अमानवी शक्तींच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायला भाग पाडतात.

विनीत एक २५ वर्षाचा तरुण, एका ७ मजली इमारतीत सहकुटुंब राहायचा. नोकरी करत असल्याकारणाने त्याचा एक निश्चित दिनक्रम होता.

तो दिवस अतिशय साधारण होता. त्यादिवशी सकाळीच विनितचे आई बाबा गावी जाण्यासाठी रवाना झाले होते. गावात कोणत्या तरी उत्सवासाठी ते गेले होते. कामावरून सुट्टी न मिळाल्यामुळे विनितला जाता आले नाही. तो नेहमीप्रमाणे लॅपटॉप वगैरे घेऊन ऑफिसला गेला. आईची सकाळी घाई गडबड व्हायला नको म्हणून विनीत ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये जेवणार होता. वेळ कधी निघुन गेला काही समजलच नाही. कॅन्टीन मध्ये जेवत असतानाच विनीतला एक कल्पना आली. "संध्याकाळी घरी एकांतात राहण्यापेक्षा मित्रांना बोलवून मस्तपैकी पार्टी करू" असा विचार त्याने मनोमनी करून टाकला व त्यानुसार त्याने आई बाबांची परवानगी घेऊन लंच ब्रेक संपायच्या आधी पटापट त्याच्या जिवलग मित्रांना रात्रीच्या नियोजनाबद्दल सांगितले. सगळ्यांनी एकमताने होकार दर्शवला व रात्रीचा प्लॅन निश्चित झाला. सगळेजण रात्री ८ च्या दरम्यान विनीतच्या घरी भेटणार होते. विनीत ७ वाजता घरी पोहोचला. पटापट सगळं आवरून घेतलं. आवराआवर करण्यात ८ कधी वाजले ते त्याला कळलंच नाही. एक एक करून त्याचे सगळे मित्र यायला लागले. ८:३० पर्यंत सर्वजण आले. सुजय, सुमित, पार्थ, निशांत, सार्थक, वेदांत असे एकूण मिळून ६ जण आलेले. सर्वजण ती रात्र विनितच्याच घरी झोपणार होते त्यामुळेच ते सर्व तयारीत आले होते. नियोजन केल्याप्रमाणे पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली. सोबत जवळच्याच दुकानातून कोल्ड्रिंक्स सुद्धा आणण्यात आले. पिझ्झाची ऑर्डर देऊन १ तास झाला तरीही अजून पिझ्झा आला नव्हता. विनीतने कॉल करून चौकशी करायचे ठरवले. त्याने ज्या नंबरवरून ऑर्डर केलेली त्याच नंबरवर पुन्हा एकदा कॉल केला.
विनीत: हॅलो, मी तासभर आधी ७ लार्ज पिझ्झाची ऑर्डर केली होती पण तुमचा माणूस अजूनही ऑर्डर घेऊन पोहोचलेला नाही आहे.
Staff: सॉरी सर, पण डिलीव्हरी बॉय तुमची ऑर्डर घेऊन केव्हाच निघालेला आहे. परंतु तरीही तुम्ही दोन मिनिट होल्ड करा, आम्ही त्याच्याशी संपर्क साधून तुम्हाला त्वरित कळवू.
दोन मिनिटांनी पुन्हा एकदा त्या नंबरवरून कॉल आला व असे समजले की डिलीव्हरी बॉय सोबत कोणताही संपर्क होत नाही आहे. शेवटी नाईलाजाने सगळ्यांनी मिळून पिझ्झाची ऑर्डर कॅन्सल केली आणि दुसऱ्या हॉटेलमधून चायनीज जेवण मागवायचे ठरवले. ऑर्डर केल्याच्या अर्ध्या तासानंतर लगेच हॉटेलमधून एक माणूस त्यांची ऑर्डर घेऊन आला. रात्री ९:३० वाजता त्यांची पार्टी सुरू झाली. एकत्र मिळून गाणी गाणे, गप्पागोष्टी करणे, एकमेकांची मस्करी करणे ह्या सगळ्यात कधी १२ वाजून गेले समजलेच नाही. विनीतने केलेले नियोजन यशस्वीरीत्या पार पडले होते व मित्रांसोबत पुन्हा एकदा ते जुने दिवस जगायला मिळाले ह्याचा आनंद प्रत्येकाला होता. पुढचा दिवस रविवारचा होता. त्यामुळे सर्वजण निवांत होते. झोपण्याच्या वेळीसुद्धा एकमेकांची थट्टा करणे सुरूच होते. जुन्या आठवणी, जुने किस्से संपत नव्हते. शेवटी सर्वजण १:३० च्या सुमारास गाढ झोपी गेले.

रात्री ३ च्या सुमारास विनितचा फोन वाजला. त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आलेला. कोणाचीही झोपमोड होऊ नये ह्यासाठी त्याने पटकन झोपेत असतानाच कॉल उचलला आणि कॉल उचलल्यावर समोरून एक व्यक्ती बोलू लागली, "हॅलो सर, मी तुमची पिझ्झाची ऑर्डर घेऊन आलेलो आहे." सुरुवातीला तर विनितला काहीच समजले नाही. Wrong नंबर असेल असा विचार करून कॉल कट करणार इतक्यात त्याची नजर मोबाईल मधील घड्याळात गेली. जेव्हा त्याने वेळ पाहिली तेव्हा त्याची सगळी झोप एका क्षणात उडून गेली. इतक्या रात्री कोणती पिझ्झा कंपनी सुरू असते असा विचार तो करू लागला आणि पुन्हा एकदा ती व्यक्ती समोरून बोलू लागली, "साहेब मी तुमची पिझ्झाची ऑर्डर घेऊन आलोय आणि तुमच्या इमारतीखाली उभा आहे." हे ऐकताच विनीत धावत त्याच्या घराच्या गॅलरी जवळ गेला. दुसऱ्याच मजल्यावर राहत असल्यामुळे इमारतीच्या आवारात कोण वावरत आहे हे त्याला स्पष्ट दिसायचं. त्याने जेव्हा पडदे बाजूला करून खाली पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की ज्या कंपनी मधून त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला होता त्याच कंपनीचा माणूस ऑर्डर घेऊन आला होता आणि एकटक विनितकडेच पाहत होता. विनीत थोडा घाबरला. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. त्याच नंबरवरून कॉल आलेला. विनीतने घाबरून कॉल कट केला पण तो आपोआप उचलला गेला. समोरील व्यक्ती बोलू लागली,
"सर, येताय ना खाली ऑर्डर घ्यायला?"
विनीत: हो......हो, येतो.
हळुवार सर्वांच्या नकळत दाराला बाहेरून कडी लावून पायऱ्या उतरून विनीत तळमजल्यावर आला. समोरच त्याला तो माणूस दिसला. मनात थोडी भीती होतीच, पण धाडस करत तो समोरील व्यक्तीच्या २ फूट अंतरावर येऊन उभा राहिला. त्या व्यक्तीच्या हातात एकच पिझ्झाचा डब्बा होता जो त्याने काहीच सेकंदात विनितला देऊ केला. "ह्याचे पैसे ?" विनीत म्हणाला. त्यावर तो व्यक्ती काहीच बोलला नाही. पुन्हा एकदा विनीतने विचारलं तरीही तो व्यक्ती शांतपणे उभा होता आणि विनितच्या डोळ्यात बराच वेळ पाहत होता. विनीत आधीच घाबरला होता आणि त्यात त्या व्यक्तीचं असं हे वागणं त्याच्या मनात अजूनच धडकी भरवत होतं. काही विपरीत घडण्याच्या आधीच इथून निघायला हवं असं विचार करून विनीत पाठी फिरला. इमारतीत जात असताना त्याने हलकीशी नजर टाकून पाठी पाहिले. ती व्यक्ती विनीतकडे पाहून एक रहस्यमयी हास्य दाखवत होती.

पिझ्झा घेऊन विनीत घरी आला. अंधारात काही दिसलं नसतं आणि बाकीच्यांची झोप मोड होऊ नये ह्यासाठी पिझ्झाचा डब्बा घेऊन तो किचन मध्ये गेला. तिथली लाईट चालू करून त्याने डब्बा उघडुन पाहिला. त्याला दिसलं की पूर्ण पिझ्झा रक्ताने माखलेला होता. ते पाहून विनितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने त्याचे डोळे चोळून पाहिले, पण समोरील दृश्य काही बदलले नाही. त्याला खात्री पटली होती की हा काहीतरी विपरीत प्रकार आहे. आता तर त्याला त्याच्या मित्रांची झोपमोड करणं भाग होतं. तो पटकन त्याच्या मित्रांना उठवण्यासाठी हॉल मध्ये गेला. इतक्यात घराची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकून विनीत पुन्हा एकदा घाबरला. दरवाज्याजवळ जाऊन दरवाजाच्या keyhole मधून त्याने बाहेर पाहिले. पण त्याला तिथे कोणीही दिसले नाही. पुन्हा एकदा बेल वाजली. ह्यावेळी सुद्धा keyhole मधून पाहिल्यावर कोणीही दिसले नाही त्यामुळे विनितने हळूच दरवाजा उघडुन बाहेर पाहिले. समोर तोच व्यक्ती पिझ्झाचे इतर ६ डब्बे घेऊन उभा होता. विनीतचं हृदय प्रचंड वेगात धडकू लागलं. तो पटकन दरवाज्यापासून लांब झाला. दरवाज्यासमोर असलेला तो माणूस एका दगडाच्या मुर्तीसारखा स्थिर उभा होता. तेवढ्यात विनितला जाणीव झाली की सुजयला जाग आलेली. बेलच्या आवाजामुळे त्याला जाग आली असावी. विनीतला मध्यरात्री दरवाज्याजवळ पाहून सुजयने विचारले,
सुजय: "अरे, असा दरवाज्याजवळ का उभा आहेस?"
विनीत: काही नाही रे, दरवाज्यावर जो माणूस उभा आहे तो कशासाठी आलाय हे विचारत आहे मी.
सुजय: एकतर मी झोपेत आहे नाहीतर तू झोपेत आहेस.
विनीत: असं का म्हणत आहेस?
सुजय: अरे दरवाज्यावर तर कोणीच उभं नाही.

हे ऐकताच विनितने दरवाज्याकडे पाहिले, पण त्याला तर तो माणूस तिथेच उभा दिसत होता. मनात भीती असूनही त्याने ती चेहऱ्यावर दाखवली नाही. सुजयला शांत राहण्याचा इशारा करून विनीत दरवाज्याकडे पाहू लागला. अजूनही तो माणूस विनितकडे एकटक नजरेने पाहत होता. विनीत काही बोलणार इतक्यात त्या व्यक्तीने ते ६ डब्बे विनितला देऊ केले. डब्बे हातात घेताच एक थंडगार वाऱ्याची झुळूक देखील आली आणि अंगावर शहारा आणून गेली. सुजयला काहीच कल्पना नव्हती की दरवाज्यापाशी नक्की काय सुरू आहे. त्याने पुन्हा एकदा विनितला हाक मारली. हाकेने विनीत भानावर आला. त्याने पाठी वळून सुजयकडे पाहिले. हातवारे करत सुजय ने काय चाललय हे विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु विनितच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. घडलेला प्रकार कोणत्या शब्दात सांगू हे त्याला सुचत नव्हते. शेवटी त्याने चेहऱ्यावरचे भाव लपवत काही नाही झालंय असा इशारा केला आणि पुन्हा दरवाज्याकडे त्याचं तोंड केलं. बघतो तर काय..... तो माणूस तिथून अचानक गायब झाला होता. ते पाहिल्यावर विनितच्या मनात धडकी भरली पण तो माणूस तिथून गेल्यामुळे त्याने सुटकेचा निःश्वासही सोडला. विनीतने घराबाहेर डोकावून पाहिले, पूर्ण माळ्यावर शांतता पसरलेली. घराबाहेर येऊन पुन्हा एकदा मनाची संतुष्टी करायचं त्याने ठरवलं. तो घराबाहेर आला, उजवीकडे पाहिले...डावीकडे पाहिले, त्याला कोणीही दिसलं नाही. त्याचा जीव भांड्यात पडला. घरी परत फिरल्यावर त्याची हलकीशी नजर दरवाज्याकडे गेली. त्यावर जे काही लिहिलेलं ते पाहून विनीत जागीच बेशुद्ध झाला. सुजय तिथेच जागा राहून सगळं पाहत असल्यामुळे तो पटकन दरवाज्याकडे आला. काहीच क्षणात त्याने सर्वांना उठवून घातलं. विनीत बेशुद्ध कसा काय झाला ह्या चिंतेत सर्वजण होते त्यामुळे कोणाचीही नजर दरवाज्यावर गेली नाही.

विनितला जाग आली ती थेट सकाळी ८ च्या सुमारास. जाग येताच सर्वजण त्याला विचारू लागले, "अरे नक्की काय झालं, असा मध्यरात्री दरवाज्यापाशी बेशुद्ध कसा काय झालास तू?" विनीत बोलू लागला व त्याने मध्यरात्री घडलेला प्रकार सर्वांना सांगितला. सांगत असताना त्याची नजर सारखी दरवाज्याकडे जात होती. विनितच्या सांगण्याप्रमाणे घडलेल्या प्रकारचे पुरावे म्हणून सर्वजण पिझ्झाचे ७ डब्बे शोधू लागले पण घरभर शोधल्यावर सुद्धा कोणालाही ते मिळाले नाहीत. मध्यरात्री जे काही अनुभवलं होतं ते खरं होतं की फक्त एक भास होता ह्याची खात्री त्याला करायचीच होती. म्हणून तो लगेच दरवाज्याजवळ गेला आणि दरवाजा उघडून पाहिला. सर्वजण विनितच्या पाठोपाठ आले. विनितसोबत त्याच्या मित्रांनी देखील एकच दृश्य पाहिले. दरवाज्यावर रक्ताचे डाग त्यांना दिसले आणि त्यावर अजूनही रक्ताने लिहिलं होतं..........

"सर...... पिझ्झाचा फीडबॅक द्यायला विसरू नका!"

वरील कथा ही संपूर्णतः काल्पनिक असून तिचा वास्तविक जगाशी कोणताही संबंध नाही.

लेखक: निशिकांत साळवी
https://youtu.be/dXipVmPMJNo
तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबूवा ला मेल करु शकता.
[email protected]



पिझ्झा (सत्य घटना) | Marathi Horror Experience | Horror Story | Marathi Ghost Story | Bhaykatha पिझ्झा (सत्य घटना) Marathi Horror ExperienceStoryteller: Rupesh MayekarBagulboowa (Bagulbuva/बागुलबूवा) तर्फे बनविलेला हा व्हिडियो संपूर्णत: काल्पनिक स्वरुपा...

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400001