23/03/2026
लोकनेते दत्ताभाऊ
लोकनेते दत्ताभाऊ मेघे यांनी इहलोकीची यात्रा संपवली. 'शून्य से शिखरतक' अशी भाऊंची वाटचाल होती. वाटचाल संघर्षमय होती, पण भाऊंनी तडजोड केली नाही. त्यांची आपली म्हणून जीवनमूल्य होती, ती त्यांनी अखेरपर्यंत जपली.
भाऊ राजकारणी नव्हते, ते समाजकारणी होते, संवेदनशील ह्युमन होते, दातृत्व हे त्यांच्याजवळचं गुणवैशिष्ट्य दुर्लभ होतं. दत्ताभाऊंजवळ 'व्हिजन'होतं, 'स्लो बट स्टेडी' वाटचाल, हा भाऊंचा आणखी एक गुण. त्याच्याजवळ माणसं जोडण्याची कला होती. स्वभाव शांत, विचारी आणि विवेकी होता. ते स्वाभिमानी होते, अभिमानी होते आणि गर्विष्ठ नव्हते.
दत्ताभाऊंनी संस्था उभारल्या, पण ते संस्थानिक नव्हते. गरीबांच्या गुणी मुलांना ते शिक्षणाकरिता दत्तक घेत. शिकवत. त्यांना उभे करत. सर्व जाती-धर्म-पंथ-पक्षात त्यांच्याविषयी आदर होता, कारण ते निरपेक्ष आणि निर्व्याज होते. सहजता, मितभाषता, आपुलकी, जिव्हाळा हा तर भाऊंचा रक्त रंग. त्यांना तो वारश्यात मिळाला. त्यांनी तो जपला, वृद्धिंगत केला आणि आपल्या मुलांना, सुनांना, नातवंडांना, स्नेह्यांना मुक्तहस्ते वाटला. दत्ताभाऊ कृतार्थ जीवन जगले.
माझे तीर्थरुप आणि दत्ताभाऊ यांच्यात स्नेह होता. भाऊ घरी यायचे, त्यांच्या बाबांशी गप्पा होत. दत्ता भाऊंनी डॉ. दंदे कुटुंबियांच्या नव्या पिढीतील मंडळींशी स्नेहभाव शेवटपर्यंत जपला. शुचिता त्यांनी सांभाळली. राजकारणात त्यांनी चढउतार बघितले, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधी नैराश्य उमटलं नाही. ते धीरोदात्त होते. क्षमा करा आणि विसरा, हेच त्यांचं चिंतन होतं.
दत्ताभाऊंच्या गमनानं समाजानं एक निस्पृह आणि सह्रद नेता गमावला. आम्हा दंदे कुटुंबियांचीही ही हानी आहे. डॉ. दंदे हॉस्पिटल आणि डॉ. दंदे फाउंडेशनच्यावतीनं आम्ही भाऊंना विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो. परमेश्वरानं गतात्म्याला सद्गती द्यावी, आणि मेघे कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावं, अशी प्रार्थना करतो.
शिक्षण संस्थांच्या माध्यमातून भाऊंनी दर्जेदार शिक्षणाचा विश्वास समाजाला दिला. हा विश्वास आपण मिळून सारे अक्षुण्ण ठेवू या, हीच दत्ताभाऊंच्या स्मृतिंना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
नम्र,
डॉ. पिनाक दंदे,
CMD, डॉ. दंदे हॉस्पिटल
अध्यक्ष, डॉ. दंदे फाउंडेशन
दि. २३ मार्च २६