16/09/2026
सैनिकी स्कूल सोसायटी मान्यतेनंतरच्या केंद्रीय पथकाच्या पहिल्याच निरीक्षणात सगरोळीच्या सैनिकी विद्यालयाच्या प्रगतीची दखल : कॅडेट्सची शिस्त, कौशल्ये आणि सर्वांगीण विकासाचे चंद्रपूर सैनिक स्कूलच्या प्राचार्यांकडून कौतुक
सैनिक स्कूल्स सोसायटीकडून सैनिकी विद्यालयास इ. 6 वी वर्गासाठी मान्यता मिळाल्यानंतरच्या पहिल्याच निरीक्षणासाठी कॅप्टन अश्विन अनुपदेव, प्राचार्य, चंद्रपूर सैनिक स्कूल यांनी आज दि. 16 सप्टेंबर रोजी राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी येथे भेट दिली.
या निरीक्षणादरम्यान त्यांनी कॅडेट्सची शैक्षणिक प्रगती, शिस्त, दैनंदिन शालेय संचालन, प्रशिक्षण, उपलब्ध सुविधा तसेच विद्यालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीची सविस्तर पाहणी केली. नियमित सैनिकी तुकडीतील कॅडेट्सनी सादर केलेले DST संचलन, घोडेस्वारी आणि विविध साहसी प्रात्यक्षिके पाहून त्यांनी कॅडेट्सच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यालयातील विविध उपक्रम, सुविधा आणि कागदपत्रांचे व्यवस्थापन याबाबत त्यांनी सकारात्मक अभिप्राय नोंदविला.
प्रथम त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन व 'समता उद्याना'मधील अमर जवान स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन केले. यानंतर विद्यालयाच्या कॅडेट्सनी त्यांना शानदार ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
विद्यालयातील कॅडेट्सची शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि प्रशिक्षणातून विकसित होत असलेली कौशल्ये यांचे त्यांनी निरीक्षण केले. असेंब्लीदरम्यान कॅप्टन अनुपदेव यांनी कॅडेट्सना संबोधित करताना राष्ट्रसेवेसाठी उत्तम नागरिक बनण्यासाठी ज्ञानासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिस्त, सातत्य, जबाबदारी आणि कौशल्यविकास यांना आपल्या जीवनाचा भाग बनविण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शालेय प्रशासनातील सर्व घटकांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर त्यांनी इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रियेचे तसेच विद्यालयाच्या शालेय संचालनाचे सविस्तर निरीक्षण केले. कॅडेट्सना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा, विज्ञान पार्क आणि 'कॅप्टन विक्रम बत्रा प्रयोगशाळे'ची पाहणी केली.
कॅप्टन अश्विन अनुपदेव यांनी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख यांची भेट घेऊन विद्यालयाच्या प्रगतीबद्दल त्यांनी मनःपूर्वक कौतुक व्यक्त केले. मान्यतेनंतर झालेल्या या पहिल्या निरीक्षणामुळे विद्यालयाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचे मूल्यमापन होण्यासोबतच पुढील शैक्षणिक, प्रशिक्षणात्मक आणि प्रशासकीय वाटचालीसाठीही महत्त्वपूर्ण अभिप्राय मिळाला