22/03/2026
कसं शिजलं 'कांड'? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' नीरज जाधव! ५८ अश्लील व्हिडीओ, ५ कोटींची खंडणी आणि बड्यांचे धाबे दणाणले
नाशिक |
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, आता या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. स्वतःला देवी शक्तीचा अवतार मानून महिलांचे शोषण करणाऱ्या खरातच्या या संपूर्ण 'कांडा'चा खरा 'मास्टरमाइंड' त्याचाच मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव असल्याचे उघड झाले आहे. राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींना भविष्याची स्वप्ने दाखवणाऱ्या या बाबाचे काळे साम्राज्य कसे कोसळले आणि ५ कोटींच्या खंडणीसाठी हे अश्लील व्हिडीओ कसे समोर आले, याची इत्थंभूत माहिती .
ऑफीस बॉय बनला 'किंगपिन'
मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरातच्या सिडकोतील कार्यालयात काम करत होता. कामावर असताना त्याला बाबाच्या कथित 'धार्मिक' कृत्यांवर संशय आला. साधूचा आव आणून खरात प्रत्यक्षात महिलांवर अत्याचार करत असल्याची कुणकुण नीरजला लागली होती. त्याने या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्याऐवजी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी याचा वापर करण्याचे ठरवले. डिसेंबर २०२५ मध्ये, नीरजने खरातच्या कार्यालयातील गुप्त सीसीटीव्ही फुटेजचा ताबा मिळवला. या फुटेजमध्ये तब्बल ५८ हून अधिक वेगवेगळ्या महिलांवर खरातने केलेले अत्याचार आणि अश्लील कृत्य कैद होते.
५ कोटींची खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे सत्र
हे ५८ व्हिडिओ हाती लागताच नीरज जाधवने भोंदू बाबा अशोक खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. समाजातील प्रतिष्ठित लोकांशी असलेले संबंध आणि स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी नीरजने त्याच्याकडे ५ कोटी रुपयांची प्रचंड खंडणी मागितली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी बाबावर दबाव आणण्यासाठी त्याला या क्लिप्स दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. मात्र, अशोक खरातने या धमक्यांना फारसे महत्त्व दिले नाही. "तुला काय करायचे ते कर," असे उत्तर देऊन त्याने नीरजला ठणकावून सांगितले.
पीडितांचाच वापर करण्याचा प्रयत्न
भोंदू बाबाकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर होताच, मास्टरमाइंड नीरज जाधवने रणनीती बदलली. त्याने या व्हिडिओतील पीडित महिलांनाच ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा किंवा त्यांच्याद्वारे बाबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले (छेडछाड केलेले) फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले. ही महिला घाबरली आणि तिने अशोक खरातशी संपर्क साधला. नीरज जाधव सतत धमकी देत असल्याचे तिने बाबाला सांगितले. स्वतःला वाचवण्यासाठी खरातने तिला थेट पोलिसात जाण्याचा सल्ला दिला, मात्र स्वतः कोणतीही मदत केली नाही.
अखेर 'अश्लील क्लिप' मेहुण्याला पाठवली अन्...
शिर्डीतील महिलेकडून प्रतिसाद न मिळाल्याने नीरज जाधवने नाशिक शहरातील सिडकोतील एका २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ थेट तिच्या मेहुण्याला पाठवला. या मेहुण्याने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. त्यांनी आपल्या मेहुणीला (पीडित महिलेला) धीर दिला आणि तिला पोलिसात तक्रार करण्यास प्रवृत्त केले. पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसात धाव घेतली आणि अशोक खरातचा खरा चेहरा जगासमोर आला.
गुंगीकारक औषध देऊन अत्याचार, पहाटेच्या वेळी अटक
नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अशोक खरातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाबा आपल्याला गुंगीकारक औषध देऊन अत्याचार करत असल्याचा गंभीर आरोप तिने केला. या तक्रारीनंतर, १८ मार्च २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या वेळी अशोक खरातच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्यावर बलात्कारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय कनेक्शन आणि उद्योगपतींचे धाबे दणाणले
अशोक खरातच्या अटकेनंतर त्याचे राजकीय लोकांशी असलेले जवळचे संबंध उघडकीस आले आहेत. अनेक बडे राजकारणी, त्यांचे नातेवाईक आणि काही उद्योगपती आपल्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी, किंवा भविष्याची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी खरातकडे येत असत. त्याच्या कार्यालयातील ५८ व्हिडिओमध्ये आणखी कोणकोणते बडे चेहरे आहेत, किंवा या बड्या लोकांच्या नातेवाईक महिलाही यात अडकल्या आहेत का, या भीतीने नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित घराण्यांचे धाबे दणाणले आहेत. हे ५८ व्हिडिओ जर सार्वजनिक झाले, तर अनेकांचे राजकीय आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मास्टरमाइंड नीरज जाधवचा शोध सुरू
या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार असलेला नीरज जाधव आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात केली आहेत. खरातने महिलांना गुंगीचे औषध कुठून आणले? त्याला यात कोणी मदत केली? आणि नीरज जाधवने ५ कोटींच्या खंडणीसाठी आणखी कोणाला ब्लॅकमेल केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नाशिक पोलीस तपास करत आहेत. हे प्रकरण महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भोंदूगिरी आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

19/03/2026
18/03/2026
26/02/2026