कथाविश्व

कथाविश्व

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कथाविश्व, Pavan Nagar, CIDCO, Nashik.

03/06/2026

आम्हाला वाटलं होतं सून आली म्हणजे मुली सारखा जीव लावेल आम्हाला, पण कसलं काय” गावाला गेले असताना माझ्या मावशीने तिच्याकडे राहायचा आग्रह केला, त्यावेळी ती सांगत होती.. मावशीची सून, अनघा… ती नेमकी कशी आहे हे सांगायला खरच अवघड… तिला नाव ठेवायला जागा नव्हतीच पण कौतुकही करावं असं काही केलं नव्हतं तिने… मावशीला मुलगी नव्हती, म्हणून सुनेला मुलगी मानेल असं ठरवलं होतं तिने… मावशीचं ऐकून आधीच माझ्या मनात अनघा बद्दल तिढा निर्माण झालेला…
#कथाविश्व
माझा 2 दिवस मुक्काम करायचा ठरला होता मावशीकडे..

अनघा ने स्मितहास्य करत माझं स्वागत केलं, थोड्या वेळासाठी मावशी उगाच असं बोलली असं वाटलं पण दुसऱ्याच क्षणी दिसतं तसं नसेल कदाचित..असा विचार आला.. अनघा ने चहा, नाष्टा बनवला आणि स्वयंपाकाच्या तयारीला ती लागली…मावशी मला बेडरूम मध्ये घेऊन गेली आणि आम्ही गप्पा मारायला लागलो… “अगं ही अनघा ना…फक्त कामं रेटून नेत असते, आम्हाला लळा लागेल असं कधी वागलीच नाही…मुलीची फार हौस होती ग…पण कसलं काय… शेवटी सून ती सूनच… खरंच मला मुलगी असती तर किती बरं झालं असतं…” मावशीचा तक्रारीचा सूर चालूच होता. नंतर आम्ही जेवणं केली, अनघा ने मला काहीच काम करू दिलं नाही.. अनघा चा गणपती मंडळात गाण्यामध्ये प्रथम क्रमांक आला, तिला तसा फोन आला अणि तिने आनंदात पळत पळत येऊन मावशीला सांगितलं, “आई मला प्रथम क्रमांक मिळाला…”

“आमचा दादा सुद्धा इतका छान गातो, पहिलीला असताना नाच रे मोरा म्हटलेलं, इतका छान गातो ना तो…” आपला मुलगा सुने पेक्षा श्रेष्ठ हे दाखवायचा मावशीचा प्रयत्न होता, अनघा हिरमुसली…

मी तिचं अभिनंदन केलं आणि तिला गाऊन दाखवायला सांगितलं, के सुरेल गाते ती..अगदी पट्टीच्या गायिकेला लाजवेल असं, तिचं कौतुक केल्यावर तिला आनंद गगनात मावेनासा झाला… दुसऱ्या दिवशी अचानक अनघा आजारी पडली, तापाने फणफणली होती, सकाळी मावशी स्वयंपाक घरात गेल्या, अजून नाष्टा काहीच नाही म्हणून चिडली, आणि बडबड सुरू केली “आज काय डुलकी लागली या बयेला… घरात पाहुणे आहेत हे तरी लक्षात ठेवावं”

अनघा तिच्या खोलीत कण्हत पडलेली, तिला उभही राहता येत नव्हतं इतका अशक्त पणा आलेला, मला दया आली, मी स्वतः चहा करून तिला नेऊन दिला, तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि अपराधी पणाने मला म्हणाली ” ताई मी केला असता ना…” ती खूप घाबरली होती, अपराधी वाटत होतं तिला पण तब्येती मुले उठणही शक्य नव्हतं.. मी मावशीला सांगितल की अनघा ला बरं नाहीये, “नेहमीचंच आहे, कामं टाळायची असतात फक्त, दुसरं काय..” मी तिला चहा दिला हे समजल्यावर मावशी चिडली, “कशाला केलास तू?? तिला उठवलं असतं ना मी चहा करायला…” मला मावशीची खरंच राग आला, इतक्यात शेजारच्या मावशींनी भेटायला बोलावलं आणि मी तिकडे गेले, तिकडे बराच उशीर झाला मला आणि दुपारी मी परत मावशीकडे आले… अनघा चा ताप वाढला होता, मावशीने औपचारिकता म्हणून तिची विचारपूस केली आणि दुसऱ्याच क्षणी “मग आता स्वयंपाकाचं काय?”

अनघा ला काय बोलावं कळत नव्हतं, “आई मला खूप त्रास होतोय .” एवढंच कसंबसं बोलली..मावशी तोंड वाकडं करून तिथून निघून गेली… अनघा कडे काही औषधं होती, पण ती जेवणा नंतर तिला घ्यायची होती…कशीबशी किचन मध्ये आली, बघते तर काय, काहीही तयार नव्हतं, निदान एखाद्या दिवशी तरी सासू स्वयंपाक करेल असं तिला वाटलेलं..आता गोळ्या कश्या घ्याव्या हा प्रश्न तिच्यासमोर होता… मी मावशीला म्हटलं, आज माझ्या हातची भाजी खाऊन बघ, आवडेल तुला..मी चटकन स्वयंपाक करून आधी अनघा ला दिला आणि मग आम्ही जेवलो… मी मावशिचं निरीक्षण करत होते,

मावशी घरातल्या सगळ्यांचे कपडे नीट आवरून ठेवत होती, पण अनघा चे कपडे बाथरूम मध्ये बाजूला फेकून दिलेले… निदान ती आजारी असताना तिचे कपडे धुवायला हरकत होती? हाताने नव्हे, मशीन मधेच धुताय ना कपडे…. तिच्या वस्तू, तिचे कपडे अगदी तुसड्या सारखे बाजूला टाकण्यात येत असत… नंतर संध्याकाळी परत तिला चहा दिला आणि रात्री मीच स्वयंपाक केला, इतक्यात मावसभाऊ आला, त्याने तिला दवाखान्यात नेले आणि ती झोपली… माझी सहनशक्ती संपली,जायच्या आधी मी मावशीला रूम मध्ये बोलावलं आणि म्हटलं “कोणत्या दृष्टिने तू अनघाने मुली सारख वागावं अशी अपेक्षा करतेस?? तिने मुलींसारखं वागावं या आधी तू तिच्याशी आई सारखं वागतेय का ?? तू तिला अगदी नोकरप्रमाणे वागणूक देऊन एकदम टिपिकल सुने सारखं वागवतेय, तुला मुलगी असती तर आजारपणात तिला कामं सांगितली असती?? तिचे कपडे असे फेकून दिले असतेस?? तिला असं उलट सुलट बोलून टोमणे मारले असतेस?? अगं तुझं नशीब समज अनघा सारखी सहनशील सून मिळाली..दुसरी असती तर ऐकून घेतलं नसतं… एखाद्या मुलीला समोरून कितीही अपमान, अनादर, तुच्छ वागणूक मिळाली तरी आपल्या आई वडीलांप्रमाणे तिने सासरच्या मंडळींशी वागायला हवं हे कोणते लॉजिक??
©Sanjana Ingale
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

03/06/2026

रॉंग नंबर
#कथाविश्व
माधवराव कुलकर्णींचा फोन फारसा वाजत नसे.

वाजलाच तर एखादी बँक, एखादी विमा कंपनी किंवा महिन्यातून एक-दोन वेळा मुलाचा फोन.

निवृत्तीला सात वर्षे झाली होती. पत्नी शैलजा गेल्यानंतर घरातला आवाज आणखी कमी झाला होता. घरात सगळं होतं—फर्निचर, पुस्तकं, फोटो, आठवणी... फक्त माणसांची वर्दळ कमी झाली होती.

माधवराव मात्र तक्रार करत बसणाऱ्यांपैकी नव्हते.

सकाळी फिरणं, झाडांना पाणी घालणं, वर्तमानपत्र, एखादं पुस्तक आणि संध्याकाळी देवळापर्यंत फेरफटका.

आयुष्य शांतपणे चाललं होतं.

त्या दिवशी दुपारी फोन वाजला.

अनोळखी नंबर.

"हॅलो?"

समोरून एका मुलीचा घाईघाईचा आवाज आला.

"आई, ऐक ना... मी पोहोचले गं."

माधवरावांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.

"बाळा, आई नाही बोलत आहे. रॉंग नंबर लागलाय."

क्षणभर शांतता.

"अय्या! सॉरी सॉरी काका. चुकून लागला."

फोन कट झाला.

माधवरावांनी फोन बाजूला ठेवला आणि पुन्हा पुस्तक उघडलं.

दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला पुन्हा फोन.

तोच नंबर.

"हॅलो?"

"आई..."

माधवराव खळखळून हसले.

"अगं, अजून नंबर सेव्ह केला नाहीस वाटतं."

तिकडूनही हसू आलं.

"देवा! पुन्हा तुम्हीच?"

"हो. आणि पुन्हा रॉंग नंबर."

त्या दिवशी पहिल्यांदाच फोन ठेवताना दोघेही हसत होते.

तिसऱ्या दिवशी पुन्हा फोन.

मात्र यावेळी मुलीने आधीच विचारलं,

"काका, आज नंबर बरोबर आहे ना?"

"नाही. पण आता सवय झाली आहे."

दोघेही पुन्हा हसले.

मुलीचं नाव स्नेहा.

पुण्यात एका कंपनीत नोकरी.

एकटी राहणारी.

धावपळीच्या आयुष्यात अडकलेली.

फोनवरची ती दोन-तीन मिनिटांची बोलणी कधी सवय झाली ते दोघांनाही कळलं नाही.

एक दिवस स्नेहाने विचारलं,

"काका, तुम्ही दिवसभर काय करता?"

"हा प्रश्न विचारणारी तू पहिली नाहीस."

"मग उत्तर?"

"सकाळी चहा पितो. झाडांना पाणी घालतो. वर्तमानपत्र वाचतो. पुस्तक वाचतो. फिरायला जातो."

"बस्स?"

"हो."

"बोर होत नाही?"

माधवराव काही क्षण शांत राहिले.

मग म्हणाले,

"एकटं राहणं आणि एकटेपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत गं."

फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती.

त्या दिवशी स्नेहाने विषय बदलला, पण ते वाक्य तिच्या मनात कुठेतरी राहिलं.

हळूहळू फोनची वेळ वाढू लागली.

कधी ऑफिसमधला ताण.

कधी बॉसवरचा राग.

कधी स्वतःवरची चिडचिड.

कधी फक्त गप्पा.

माधवराव ऐकून घ्यायचे.

उपदेश फारसे करायचे नाहीत.

पण योग्य वेळी एखादं वाक्य बोलायचे.

आणि ते वाक्य अनेकदा स्नेहाला आठवडाभर पुरायचं.

एक दिवस ती खूप अस्वस्थ होती.

"काका, मला वाटतं मी आयुष्यात खूप मागे पडते आहे."

"कोणाच्या तुलनेत?"

"सगळ्यांच्या."

माधवराव हसले.

"आपण धावतोय त्या शर्यतीत बाकीचे लोक भाग घेतलेलेच नसतात अनेकदा."

स्नेहा बराच वेळ शांत होती.

मग म्हणाली,

"तुम्ही हे सगळं इतकं सहज कसं बोलता?"

माधवरावांचं उत्तर साधं होतं.

"कारण मी तुझ्यापेक्षा जास्त चुका केल्या आहेत."

महिने गेले.

फोन आता सवय झाला होता.

एक दिवस स्नेहा अचानक म्हणाली,

"काका, मी तुम्हाला भेटायला येऊ का?"

माधवराव थोडे गोंधळले.

"मला?"

"हो. तुम्हाला."

"माझ्यात एवढं काय आहे?"

स्नेहा हसली.

"मला तेच बघायचं आहे."

पुढच्या रविवारी ती आली.

दार उघडलं.

समोर एक साधी, हसरी मुलगी उभी होती.

खांद्यावर बॅग.

डोळ्यांत उत्सुकता.

दोघे काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले.

आणि मग नकळत हसले.

जणू अनेक वर्षांची ओळख होती.

चहा झाला.

गप्पा झाल्या.

जुन्या फोटो अल्बम्स बाहेर आले.

माधवरावांनी तरुणपणाच्या आठवणी सांगितल्या.

स्नेहा पोट धरून हसत होती.

वेळ कसा गेला समजलंच नाही.

निघताना तिची नजर भिंतीवरच्या एका फोटोकडे गेली.

माधवराव आणि त्यांची पत्नी.

स्नेहाने हळूच विचारलं,

"काकू किती वर्षांपूर्वी गेल्या?"

"सात."

माधवराव शांतपणे म्हणाले.

"आणि मुलं?"

"आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत."

स्नेहाने मान हलवली.

मग काही क्षण गप्प राहिली.

नंतर हळू आवाजात म्हणाली,

"माझे बाबा मी दहा वर्षांची असताना गेले."

माधवराव काही बोलले नाहीत.

पण अचानक अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.

संध्याकाळ झाली.

स्नेहा निघायला उठली.

दारापाशी आली.

बॅग खांद्यावर घेतली.

"ठीक आहे काका, निघते."

माधवराव हसले.

"हो. काळजी घे."

ती दोन पावलं पुढे गेली.

मग अचानक थांबली.

क्षणभर विचारात पडल्यासारखी झाली.

आणि परत फिरली.

माधवरावांना काही कळायच्या आत ती त्यांच्या पायांवर वाकली.

ते दचकले.

"अगं! हे काय करतेस?"

स्नेहाने वर पाहिलं.

तिचे डोळे ओलावले होते.

ती हलकंसं हसली.

आणि म्हणाली,

"निघते बाबा..."

क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला.

माधवरावांच्या डोळ्यातलं पाणी तेव्हा अडवलं गेलं नाही.

कारण काही शब्द ऐकण्यासाठी माणूस अनेक वर्षं थांबत असतो.

स्नेहा निघून गेल्यानंतर बराच वेळ माधवराव दारातच उभे होते.

घर तेच होतं.

भिंती त्या होत्या.

खिडक्या त्या होत्या.

पण अनेक वर्षांनी घर पुन्हा रिकामं वाटत नव्हतं.

आता फोन अजूनही येतात.

स्नेहा अजूनही ऑफिसमधला राग काढते.

सल्ला घेते.

कधी फक्त विचारते,

"जेवलात का?"

आणि प्रत्येक फोनच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असतं.

"ठीक आहे बाबा... नंतर बोलते."

माधवरावांना आता एक गोष्ट नक्की कळली होती.

पहिला फोन खरंच रॉंग नंबर होता.

पण नियतीला बहुतेक बरोबर माणूस शोधायचा होता.

एका हरवलेल्या मुलीला बाबा मिळाले होते.

आणि एका एकाकी बापाला पुन्हा मुलगी.

❤️

– समाप्त –

@ लेखन आणि संकल्पना – विजय
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

03/06/2026

'दिवेलागण'
#कथाविश्व
तो सहावी - सातवीत होता. दुपारची शाळा असे त्याची, नी घरी येईपर्यंत सहा होत असत त्याला. तो किल्लीने दरवाजा उघडे... बुट काढून जागेवर ठेवी... मोजे धुवायला टाके... दप्तर खुंटीला अडकवून ठेवी... हात - पाय - तोंड धुऊन तो कपडे बदलत असे. त्याचं हे इतकं करुन होईपर्यंत... त्याची शाळेत शिक्षिका असलेली आई येत असे घरी, साडे सहा दरम्यान.

सर्वात आधी कडकडून भेटत दोघं रोज. तो मग पाणी देई आईला... अगदी पाचच मिनिटं आई सोफ्यावर बसे. ते पाणी पिऊन झालेलं थंड रिकामं भांड, दोन्ही डोळ्यांना लावे ती. तेवढंच काय ते तिचं शिणवटा भागवणं असे. मग अजिबात न रेंगाळता, ती फ्रेश व्हायला जाई. बाहेरची साडी काढून, साधी घरातली साडी नेसे ती. दोन कप चहाचं आधण चढवे... तिच्यासाठी नी त्याच्या बाबांसाठी. बरोब्बर सात वाजता आई देवासमोर दिवा लावत असे... उदबत्ती ओवाळत असे... दोन - चार श्लोक म्हणत असे... उदबत्ती खोचून ठेवत असे उदबत्ती घरात. आणि तो मंद सुगंध घरभर पसरु लागलाच असे की, त्याच्या बाबांची ठरलेली बेल वाजे.

तो दार उघडे... बाबांच्या खांद्यावरची बॅग घेऊन, ती आत नेऊन ठेवे. बाहेर येतांना मग बाबांसाठी, पाण्याचा ग्लास घेऊन येई तो. बाबा एका घोटात, ते ग्लासभर पाणी पित असत. ते पितांना त्यांची मान वर वर जात असे, पण डोळे मात्र स्थिरावले असत त्याच्यावरच. त्याच गप्पा असत बाप - लेकानी मारलेल्या, एकमेकांच्या डोळ्यांतून. मग पुढचं सगळं ठरल्याप्रमाणे होत असे. आईचं स्वैपाक - पाणी... बाबांच्या बातम्या नी काही प्रोग्राम्स... आणि त्याचा अभ्यास. साधारण अकराच्या सुमारास, दिवे बंद होत असत. मग डोक्यावरुन ओढलेल्या पांघरुणातून त्याला ऐकू येत असत, आई - बाबांच्या गप्पा कुजबुजत मारलेल्या... त्यांचे महिन्याचे हिशोब, कधी जुळलेले... तर कधी फसलेले. असे त्याचे उगवलेले सगळे दिवस... मुंग्यांसारखे एका ओळीत चालत, मावळून जात.

पण... पण त्या दिवशी... त्या दिवशी त्याचे बाबा आलेच नाहीत. दिवेलागणीला अचूक घरी येणारे बाबा, दोनेक तास उलटून गेले होते वर तरी आले नव्हते. तेवढ्यात अचानकच कुठलासा जळका वास आला त्याला, आणि ऐकू आला आईचा कापरा आवाज पाठोपाठ... "देवासमोरचा दिवा विझला". प्रचंड घाबरले होते ते दोघंही. "आत्ता येतील, अडकले असतील कुठेतरी" असं मनाला समजावत पाह्यली जाणारी बाबांची वाट... फोलच वाटू लागली होती अचानक. अनोळखी रस्त्यावरुन एक वळंण लागावं... नी वळल्या वळल्या समोरच डेड एन्ड यावा, तसं काहीसं वाटलं होतं त्याला. मग त्याच्या आईने पदर खोचलेला... कसेतरी बांधलेले केस मोकळे करत, पुन्हा कसेतरीच बांधलेले. त्याचा हात पकडत... दोघांनी पायांत चपला सरकवल्या, नी बाहेर पडली होती ती दोघं. कुठे जाणार होते... कुठे शोधणार होते बाबांना कोण जाणे. रात्री नवाच्या सुमारास... उपाशी पोटी बाहेर पडलेले ते दोघे, अखेर सकाळी साडे पाच वाजता, घरी आले होते.





दोन बोटांत अडकवलेली सिगारेट संपून... तिचा चटका लागला त्याला, नी भानावर आला तो आठवणींतून. त्या दिवशी त्याने नी त्याच्या आईने... बाबांना शोधण्यासाठी केलेली वणवण, त्याला आज तिस वर्षांनीही जशीच्या तशी आठवत होती. डोळे भरुन आले त्याचे, नी त्याने आजूबाजूला पाहिलं... तो एकटाच होता CST स्टेशनवर. शेवटची गाडी चुकली होती त्याची... मोबाईल पुर्णपणे डिसचार्ज होऊन बंद पडलेला. बायकोला घरी कळवावं, तर तिचा नंबरही त्याला तोंडपाठ नव्हता... कारण बोलणंही तसं बेताचंच होत असे दोघांत, मग पाठ तरी कसा व्हावा नंबर. "तसंही बायको - मुलाला काय फरक पडणार आहे, मी न आल्याने... दोघे झोपलेही असतील एव्हाना"... हे ही त्याच्या मनात येऊन गेलं. मघापासून त्याला त्याचं लहानपण आठवण्यामागे, त्याचा हा हताशपणाच तर होता.

त्याची आॅफिसहून घरी परतण्याची वेळ ठरलेली नसे... आणि त्याच्या बायकोच्या परतण्याचीही. ज्या दिवशी दोघं वेळेवर येत घरी, तेव्हा एकतर दोघांत अजिबात संवाद नसे... किंवा मग भांडणच होत असत. त्यांचा सातवीतला छोकरा ही, खालीच कुठेतरी वेळ काढत असे मग. देवाला दिवा लावला जात नसे, अन् तसबिरींना रोजच्यारोज हारही घातला जात नसे. आई नी लेक जेवायला एकत्र बसत... नी लेकाकरवी सांगितला गेलेला "ताट वाढलंय" हा निरोप ऐकून... स्वतःचं ताट घेऊन तो, वेगळ्या खोलीत बसत असे. लेकाने त्याला आॅफिसमधून आल्यावर, कधी पाणी आणून दिलं नाही... की त्यानेही कधी बघितलं नव्हतं कौतुकाने त्याच्याकडे. रात्री झोपतांना मुलगा त्याच्या रुममध्ये झोपत असे... बायको त्यांच्या रुममध्ये... तर TV बघता - बघता तो, बर्‍याचवेळा हाॅलच्या सोफ्यावरच. एकंदरच बिकट अवस्था होती, त्याच्या सो काॅल्ड संसाराची. त्यामुळे ओला किंवा उबेर करुन... पाचशे - सहाशे खर्चुन ठाण्याला जाणं त्याच्या घरी, हे अजिबातच करावंसं वाटलं नव्हतं त्याला. कारण मुळात दोन्ही बाजूंनी, ओढ अशी नव्हतीच.

दिडच्या सुमारास स्टेशनवर येऊन बसला होता तो, आणि दोन तास उलटले होते एव्हाना. इतरवेळी स्टेशनवर न चालणारी सिगारेट, "यावेळी कोण विचारतंय" असा विचार करत, पून्हा शिलगावली त्याने. अर्ध्या तासांत आता पहिली ट्रेन येणार होती. "बायको नी लेकाला कळलं तरी असेल का, की मी घरी नाहीये"... हा विचार मनात येऊन, खिन्नपणे हसला तो मान हलवत. संपत आलेली सिगारेट त्याने जमिनीवर टाकून, पायाखाली विझवली. हळुहळु लोकं येत, तुरळक गर्दी जमली स्टेशनवर. पहिली ट्रेन आली... तो त्याच्या फर्स्ट क्लासच्या बोगीत जाऊन बसला... तासाभराने ठाण्याला उतरला. ठाण्याला नौपाड्याला रहाणारा तो, दोन नंबर प्लॅटफाॅर्मवर आला बाहेर पडण्यासाठी, आणि... आणि थबकलाच तो... हबकलाच... स्टेशनच्या बाकड्यावर बसलेल्या, त्याच्या बायको - लेकाला बघून. ते दोघेही झप्पकन उठले तो दृष्टीस पडताच. लेक धावत आला त्याच्याकडे, नी कडकडून मिठी मारली त्याने... त्याच्या बाबाला... पण ती जागेवरच उभी होती. पंजाबी ड्रेस, नी त्यावर अजिबात मॅचिंग नसलेली ओढणी घातलेली तिने... कदाचीत घरातून घाई घाईत बाहेर पडतांना, जी हाती लागली होती ती. केस चापात कमी अडकलेले, नी मोकळेच जास्त सूटलेले तिचे. लेकाच्या खांद्यावर हात ठेवत, तो चालत तिच्यापाशी गेला. तिने दोन्ही हातांच्या मुठी... मारल्या छातीवर त्याच्या, नी घट्ट मिठी मारुन त्याला... रडू लागली ती ओक्साबोक्शी. तिघंही एकमेकांना बिलगून, तिथेच उभे होते मग बराचवेळ.





अगदी त्या दिवशी सारखंच घडलेलं सगळं... हो... डिट्टो तिस वर्षांपुर्वीसारखंच. तिसवर्षांपुर्वी त्याच्या बाबांचीही, अशीच शेवटची गाडी चुकली होती... आणि ते ही असेच पहिल्या ट्रेन ने आले होते मग. फिर फिर फिरुन स्टेशनच्या बाकड्यावर येऊन बसलेले... तो नी त्याची आई. भरभरुन रडले होते आणि दोघेही, समोरुन येतांना दिसलेल्या त्याच्या बाबांना बघून. फक्त मिठी नव्हती मारली एकमेकांना, त्या काळानुरुप.

एक गोष्ट त्याला नक्की कळून चुकलेली एव्हाना... की नवरा - बायको - मुलांना भले वेळ नसेल हल्ली एकमेकांबरोबर घालवायला, आधीच्या पिढीसारखा. पण कोणी वेळेत पोहोचलं नाही घरी, तर मनापासून वाटणारी काळजी मात्र तेवढीच असते... आणि तेवढंच असतं मागोमाग दाटून येणारं प्रेमही.

त्याने आपले दोन्ही हात बायको नी लेकाच्या खांद्यावर ठेऊन, त्यांना घट्ट जवळ घेतलं. एकत्र चिकटून एकमेकांना... बाहेर पडले ते तिघं स्टेशनच्या, घरी जाण्याकरता. खरंतर... नव्याने 'दिवेलागण' झालेल्या, त्यांच्यातील नव्या नात्यासहं... 'त्यांच्या' घरी जाण्याकरता.

---सचिन श. देशपांडे
कथाविश्व - आपले आवडत्या कथांचे विश्व🎉✨

03/06/2026

#कथाविश्व
वाटा

समीरभावोजींचा काल कॉल आल्यापासून निर्मला अस्वस्थच होती. त्या टेन्शनमध्ये सकाळी वासरू सोडायचं राहून गेलं. गोठ्यात पावसानं झालेली चिगचिग खराट्यानं आज साफ करायची राहून गेली. म्हंजे लक्षात आल्यावर केली ही कामं, पण त्यात उरक होता.
म्हंजे काल समीरचा फोन आला तेव्हा तिचा नवरा, अर्थात समीरचा मोठा भाऊ संपतनंच घेतला. 'समीर आणि त्याची बायको आज यायचं म्हणताय' हे कळल्यावर संपत खूप खूष झाला होता.
नऊ वर्ष झाली. मुंबईला गेला तो गेलाच. तिकडेच लग्न केलं. रजीस्टर. बायको ब्राम्हण आहे. सुधा. म्हंजे मध्ये दोन वेळा आले होते दोघे. लग्न झाल्यावर काही दिवसांनी, दोन तासासाठी. एक तास जेवण आणि उरलेला एक तास समीर तिला शेती आणि जुनं घर दाखवत फिरला.
निर्मलाच्या पाया पडली नाही म्हणायला. पण निर्मलानं हातात दिलेले शंभर रूपये घेऊन त्यात स्वत:चे पाचशे रूपये टाकत निर्मलाच्याच मुलाच्या हातात दिले तिनं. तिथंही निर्मलाचा खटका पडला. 'दीडशहाणी बायको केली समीरभाऊंनी. वर्षभर टिकली तरी खूप झालं. शहाणी खुर्चीत बसली हातात ताट घेऊन जेवायला. इथं आम्ही आयुष्यभर माती उपसायची. आणि हे मोटारीतून फिरणार. मजा मारणार. पैसे उडवणार.'
आई गेली तेव्हा दुसऱ्यांदा आले होते. दोघंही. ती दुसऱ्या दिवशी निघून गेली. तो तिसऱ्या दिवशी गेला. यावरूनही निर्मला संपतजवळ कटकट करे.
पुढे तसा फार संपर्क राहिला नव्हताच. पण काल अचानक समीरचा फोन आला. "दादा, येतोय तिकडे दोनचार दिवस. सहज. शेतीही पाहणं होईल. भेटणं होईल." एवढंच तो बोलला.
संपतनं आनंदानं निर्मलाला सांगितलं. तिनं विचारलंही, "काय? सहज येताय ना?"
तो म्हणाला, "सहज तर काय ! त्याचंही घर आहे हे. हवं तेव्हा येवो बिचारा. बघ, एवढा मोठा झाला तो. मुंबईत राहतो. तरी शेतीची ओढ सुटत नाही. आणि सुधा आता अशीतशी नाही राहिली. आपल्या बहाद्दरानं कोंबडी, मटण दणक्यात खाऊ घालून पवित्र करून घेतलं म्हणे ! चल, निर्मला, ती बाजूच्या खोलीतलं सामान नीट लावून साफ करू !"
निर्मलाला फार उत्साह वाटेना. पण तरीही ती कामाला लागली. खोली साफ करताना एकदा म्हणालीही संपतला ती,
‘‘समीरभाऊ शेतीतला त्यांचा हिस्सा मागायला येताहेत. माझं मन सांगतंय मला.’’
‘‘चल, कायपण डोकं चालतं तुझं. अन्‌ मागितलंच, तर काय चुकलं? आपलं पाच ठेवून त्याचं पाच देवून टाकू.’’
‘‘त्या सुधीनं फितवलं आसल. पण सांगून ठिवते, या सात एकरातले खालचे दोन तुकडे अन्‌ तिकडची मुरमाड तीन एकर हेच द्या त्यांना. आयत्या पीठावर..’’
‘‘निर्मले, येडापणा करू नको. आजतागायत त्यानं काही मागितलं नाही माझ्याकडे. धाकटा भाऊ पोरासारखा असतो. नाव कमावतोय तो आणि सुधा. त्यानं जे मागितलं ते देऊन टाकायचंय मला.’’
‘‘द्या द्या. पण मी त्या दोघांना नीट जिरू द्यायची नाय. घाम गाळलाय नवऱ्यानं माझ्या, तेव्हा जमीन तयार झालीये. आता तिकडे बुडाखाली अंधार पडला आसल. म्हणून इकडे आवराआवर करून येताय. मरणाला तुम्ही, तोरणाला तुम्ही. नातंगोतं आपण सांभाळायचं. सुतकात भादरायला आपली डोकी रस्त्यावरच पडलेली. रातपहाट एक करून संसार उभा केलाय तुमचा. राबराब राबलीये. देताना माझा इचार करा.’’
निर्मला रडायला लागल्यावर संपत काहीच बोलला नाही. बाहेर येऊन बांधावर उभा राह्यला. मागे आपल्या वडीलांनी मळ्यात बांधलेल्या स्वत:च्या भव्य कौलारू घराकडे नजर टाकली. वडीलांनी लावलेली नारळाची सात झाडं खूप उंच होऊन आभाळात डोलत होती. झाडाच्या बुंध्याशी असलेला जुना परिचय कायम होता. पण शेंडा खूप वर निघून गेल्यानं वर पाहिल्यावर साती झाडं संपतला अनोळखी वाटायची.
प्रशस्त अंगणात हातात खराटा आणि पाटी घेऊन फणकाऱ्यात साफसफाई करीत येरझाऱ्या घालणाऱ्या आपल्या बायकोकडे संपत बघत होता.
पहाटेच्या पावसानंतरही आभाळ भरलेलंच असल्यानं घरावरची कौलं काळसर दिसत होती. जमिनीतून उडून कौलापर्यंत पोहोचलेल्या पंख फुटलेल्या नव्या किटकांना चोचीत पकडताना साळुंक्यांनी उच्छाद मांडला होता.
गोठ्याच्या बाजूच्या शेडमध्ये जुनी हिरो होंडा मोडकळीस येऊन पडली होती. आता जागल्याच ती चालवू शकतो. वडीलांनी नवी घेतली तेव्हा समीरनंच आपल्याला शिकवली चालवायला.
गावात क्रिकेटवरून होणाऱ्या त्याच्या मारामाऱ्या सोडवायला आपल्यालाच जावं लागे. पहिला आला होता दहावीत. तेव्हा जबरा भाषण ठोकलं होतं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर त्यानं.
समीर आणि सुधा आले. एवढ्या लांबून हाच ड्रायव्हिंग करत आला. गाडीतून बॅगा काढल्या. समीरला चष्मा लागलेला. सुधा छान बारीक. चवळी. दोघंही तोंड भरून हसले. पटकन संपत आणि निर्मलाच्या पायाशी झुकले. निर्मलानं नाराजी बेमालूम लपवत सुधाला जवळ घेतलं. सुधाचे डोळे भरून आले. संपतनं समीरला पाठीवर थोपटलं.
खूप पटकन संपले तीन दिवस. रोज रात्र रात्र गप्पा. निर्मलाकडून सुधानं हट्टानं कोंबडी करायचं शिकून घेतलं. सुधाचा गळाही गोड. केवढी गाणी गायली तिनं. तरीही तीनही दिवस ‘आता विषय निघेल, तेव्हा विषय निघेल’ या धास्तीत निर्मलानं घालवले.
कॉलेजला जाणारा तिचा मुलगा आणि मुलगी सुधाकाकूमध्ये खूपच रमले होते. त्यांना तिनं घड्याळं, पुस्तकं आणली होती. निर्मलाला साडीही आणलेली. इरकल की काय ते ! निर्मलानं नीट पाहिलीही नाही.
उद्या पहाटे उठून समीर आणि सुधा निघणार. आज रात्री नक्कीच विषय निघणार. नाही काढला तर तुम्ही काढा. सोक्षमोक्ष लावून टाकू, असं निर्मलानं संपतला बजावलं होतं.
रात्री ११ ला गप्पा संपल्यावर निर्मलानं खुणावल्यावर संपतच चाचरत समीरला म्हणाला, "ते शेतीचं काय म्हणत होतास?"
त्यावर मग सुधाच म्हणाली, "भावोजी, आम्हाला एकच मुलगा. तोही विदेशात जातोय शिकायला. तीन फ्लॅट होते. एक आताच विकला. पैशांसाठी नाही. आमच्या परिस्थितीमुळे आमचा मुलगा सहज शिकला. विदेशात चालला.
समीरनं फ्लॅटच्या पैशातून दहा दहा लाख तुमच्या या दोन्ही मुलांसाठी द्यायचं ठरवलंय. आणि वर पाच लाख शेतीचं कर्ज फेडायला ! समीर म्हणाला की तुम्ही नाहीच म्हणाल. पण शेतात तुम्ही कष्ट करून पिकवलेलं उद्या तुम्ही मला वानोळा म्हणून पिशवीत भरून द्यालच ना हक्कानं? मग आमच्याकडून हाही वानोळा समजा.
समीर तुम्हा दोघांना खूप मिस करतो. आईवडीलांच्या जागी बघतो. आणि हो, परतफेड कशी करायची तेही सांगते ! म्हातारपणी आम्हा दोघांना इथंच यायचंय शांत जगायला. ही एवढी खोली आणि तुम्ही दोघं… बस् एवढच हवंय…’’ सुधा खूपवेळ बोलत राहिली.
सकाळी समीर-सुधा निघाले तेव्हा निर्मलाचे रात्रभर रडून सुजलेले डोळे पाहून सुधानं निर्मलाला मोठी असतानाही जवळ घेऊन मायेनं थोपटलं आणि निर्मलाचा पुन्हा बांध फुटला….

लेखक-अनामिक
कथाविश्व - आपले गोड कथांचे अनोखे विश्व 🎉🎊

03/06/2026

#कथाविश्व
©®विवेक चंद्रकांत...
रात्री 2 वाजता जाग आली. सहज बाबांच्या खोलीकडे आलो तर त्यांच्या कन्हण्याचा आवाज आला. झोप उडालीच. मी त्यांच्या खोलीत गेलो.

" काय झाले बाबा?"

"काही नाही रे.नेहमीचेच. पाय दुखतात,पाठ दुखते."

"चेपून देऊ का?"

"नको रे. रोजच दुखतात थोडेफार वयोमानाने. तू नको त्रास घेऊ. रात्र बघ किती झालीये." बाबांचा स्वभाव संकोची. कोणाकडून सेवा करून घ्यायला ते नकोच म्हणतात.

"त्रास कसला त्यात?" असे म्हणून मी त्यांच्या कॉटवर बसलो आणि त्यांचे पाय चेपू लागलो. मग एकदम मला काय वाटले मी त्यांना म्हणालो.

"थांबा. ती वेदनाशामक आयुर्वेदिक तेलाची बाटली कुठे आहे. ती लावून चोळतो म्हणजे बरे वाटेल."

"ती कपाटात आहे. पण कशाला एवढे करत बसतो? लागेल मला झोप."

मी कपाटातून ती बाटली काढली आणि त्यांच्या पोटऱ्या चोळल्या. मग ते नाही म्हणत असतांना हलक्या हाताने पाठीलाही मसाज केला.पाच दहा मिनिटांनी ते संकोचाने म्हणाले

"बस्स झाले. तुला उद्या ड्युटी असेल. झोप आता तू."

"अजून फक्त पाच मिनिटे, मग झोपतो मी."

त्यांचे पाय चेपत असतांना आई नेहमी सांगायची ते आठवले.

"तू चार पाच वर्षाचा असेल.खूप खेळ.. मस्ती करायचा.नंतर थकून जायचा. मग बाबा वाटी घेऊन तूझ्या पायाला तेल लावायचे.... रोज.तू गाढ झोपलेला असायचा "

मला भरून आले.

थोडया वेळाने बाबाच म्हणाले

"पुरे . झोप आता. उद्या तुझी काम सुरु होतील "

मी उठलो.. मला काय वाटले कुणास ठाऊक? बाबांना म्हणालो.

"बाबा! आज इथेच झोपतो. तुमच्या रूममध्ये."

"नको रे. मला ac चालत नाही. इथे पंखा कमी असतो. तुला ac शिवाय झोप लागत नाही."

"असू द्या. मी झोपतो.लहानपणी कुठे होता ac? "

बाजूलाच आईचा पलंग रिकामा पडला होता. आई जाऊनही दोन अडीच वर्षे झाली. मी त्या पलंगावर काही झोपलो नाही. एक सतरंजी आणि उशी घेतली आणि जमिनीवर अंथरून झोपलो. थोडया वेळाने बाबांचा संथ घोरण्याचा आवाज आला. बाबांना झोप लागली. माझे विचारचक्र चालू झाले.

आई गेल्यावर बाबा एकटे पडले असतील? मीआणि ही घरात असते.मी माझ्या ऑफिसच्या कामात, ही घरकामात. बाबांशी बोलायला कोणाला वेळ नसतो. अर्थात त्यांचे जेवणखांवण, पथ्य औषधे सगळे सांभाळतो आम्ही. पण तेवढे पुरेसे असेल? त्याहून त्यांना जास्त काही हवे असेल?

त्यांच्यासोबत थोडे बसणे, थोडया गप्पा, नात नातू बाहेरगावी शिकायला, त्यांच्याशी फोनवर बोलतात ते, पण त्यांचं विश्व वेगळे...., त्यांचे समवयस्क मित्र आहेत पण ते फक्त सकाळ पूर्ती.

केव्हातरी मला झोप लागली. जाग आली तर लख्ख उजाडले होते. घड्याळात पाहिले तर चक्क साडेसात. उठून बघितले तर बाबा अजून झोपलेले होते. ते तर सकाळी साडेपाचलाच उठतात. साडेसातपर्यंत तर त्यांची पुजासुद्धा आटोपते.अनामिक भयाने मी ताडकन उठलो. संथ लयीत बाबांची वरखाली होणारी छाती बघून माझ्या जीवात जीव आला.

आवाज होणार नाही हे बघत मी सतरंजी आवरून ठेवली. ब्रश करून मी डायनिंग टेबलंवर चहा घेत असतांना बाबा उठून स्वयंपाकघरात आले.

"बापरे! किती झोप लागली रे... आठ वाजत आले."

"चांगली झोप लागली हे बरेच ना. जरा तरतरी येईल."

"हो रे. खूप दिवसांनी इतकी छान झोप लागली. तू पाय चेपून दिले ना त्यामुळेच झोपलो इतका."

मी हसलो. त्यामुळे थोडा फरक पडलाही असेल.पण खरी गोष्ट अशी आहे मी त्यांच्या खोलीत झोपल्यामुळे त्यानां कुठंतरी सुरक्षित, रिलॅक्स वाटले असेल. त्यामुळेच त्यांना गाढ झोप लागली...

उद्यापासून ते कितीही नाही म्हणू दे. मी त्यांच्या खोलीतच झोपणार.. आणि हो.. मलाही एक गोष्ट कळली. Ac शिवाय पंखा कमी असतांना मलाही छान झोप लागू शकते....

©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

03/06/2026

*ती अशीच.........*
****************
#कथाविश्व

आज तिनं ठरवलं की आता माघार घ्यायची नाही.मान्य आहे नातं टिकवायचं तर नमतं घ्यावं एकानं...पण प्रत्त्येक वेळी मीच का? नात्याची गरज माझी एकटीचीच का?त्याला याचं काहीच नाही.प्रत्येक वेळी माघार घेऊन,मन मारून आपण कवडीमोल ठरलोय का? याला जबाबदार कोण?मीच... होय मीच.पण एखाद्याला जीव लावणं,त्याच्यावर जीवापाड प्रेम करणं,त्याला हवं नको पहाणं,फक्त त्याचीच बनून राहणं,त्यालाच आपलं विश्व बनवणं गुन्हा आहे का?मुळीच नाही.पण एखाद्यासाठी हे सारं करताना स्वत:चं अस्तित्व विसरणं नक्कीच गुन्हा आहे.आणि तो गेली पंधरा वर्षे स्वत: सोबत करतोय.
विचार करता करता तिची मनसरीता दुथडी भरून वाहत होती .बॅग काढून ती भराभरा कपडे भरत होती.दोन चिमुकले,त्यांचाही विसर पडला तिला.आज आत्म्याला ठेच लागली होती.मन बंड करत होते.बस्स झालं आता! किती अवहेलना करून घ्यायची स्वत:ची. तो मात्र नेहमीप्रमाणे आपल्या मनातील गरळ ओकून मोकळा झाला, लेकरांना घेऊन बाहेर निघून गेला.नऊ महिने रक्तामासामध्ये वाढवलं ,मरणयातना सहन करून जन्म दिला.अंगावरचं दूध पाजून मोठं केलं त्या पोटच्या गोळ्यावरही आपला हक्क नाही.किती हा अन्याय! पण मोकळ्या मनानं सारं काही मान्य असतं.प्रत्येक वेळी तिला गृहित धरायचं....असू देत लेकरं त्यांचे तर त्यांचे आपलं काहीच नाही.सगळे कपडे बॅगेत कोंबून बचत करून जमवलेली पुंजी सोबत घेतली अन् निघाली.......देव्हा-यातली समई फडफडू लागली तिनं त्यात तेल ओतलं अन् देवाला नमस्कार केला.सांभाळ रे बाबा एक सुस्कारा सोडला तशी परत समईची ज्योत डगमगली...
लेकरांची आठवण झाली गाईसारखा हंबरडा फोडला.समजावणारं ऐकणारं कुणी नव्हतं बंद घरात मनसोक्त रडून घेतलं.
तिनं स्वत:ला आवरलं डोळ्याच्या कडा चिंबचिंब करत उंबरठा ओलांडला.दारं व्यवस्थित लावून गेटला ओढून नेहमीप्रमाणे तुळशीच्या कुंडीत घराची चावी ठेवली आणि निघाली...अधांतरी....
*खरंच स्त्रीचं स्वत:चं घर कोणतं? लग्न झाले की माहेरची पाहूणी बनते अन् सासरी दुस-या घरून आलेली.तरीही किती अट्टाहास करते ती तिच्या साठी नसलेल्या घरासाठी....*
ती स्टेशनवर आली पुणे गाडी लागली होती.त्या गाडीत चढली पुण्याला एक मावशी असते तिच्याकडं जायचं असं आताच गाडी पाहून ठरवलं.चेहरा रुमालाने बांधला होता डोळ्यात आभाळ दाटून आलेले होते मनात आठवणींच्या ढगांचा गडगडाट चालू होता.अंतरी बेभान वादळ घेऊन मात्र तिची चर्या अगदी शांत...तिला क्षणभर वाटून गेलं की आपण चुकतोय...पण दुस-याच क्षणी तिचा दुखावलेला आत्मा आक्रंदू लागला... नाही.. नाही तू आता थांबलीस तर जन्मभर उपेक्षित वंचित राहशील पोतरं बनून....मोठ्या कष्टानं नयनातील सरीतेला बांध घालून थोपवलं होतं...
आज सकाळी जुजबी कारणावरून त्यांनं किती सुनावलं होतं..चूक काय तर त्याचे कामाचे कागदपत्र घर आवरताना खालीवर झाले.त्याचं सिरीयल लावायला कितीसा वेळ लागणार होता?पाच-दहा मिनिटे पण त्याला निमित्त हवं होतं नेहमी सारखं....
"तू मठ्ठ आहेस.चांगदेवासारखी कोरी.घरातलं मरकं काम काय करते स्वत:ला काय समजते कुणास ठाऊक.नालायक कुठली एवढी साधी गोष्ट समजत नाही.कुठून दुर्बुद्धी सुचली गळ्यात दगड बांधून घेतला मी."तो तावातावाने बोलत होता अन् ही तीळ तीळ तुटत होती.
किती समर्पण केलं आपण हा संसाराचा डाव रचण्यासाठी.... अन् काय ही पोचपावती?हिला हिचं बालपण आठवलं.किती चपळ होती ती.प्रत्येक खेळात नंबर वन, चित्र काढणे, नृत्य सगळ्या गोष्टीत पारंगत.चार बहिणी आई बाबांना पण आपण जड वाटलो की काय देव जाणो.आठवीला असतानाच हे स्थळ आलं मुलगा चांगला नौकरीवाला ही खुपच सुंदर त्यामुळे भातुकलीच्या खेळ खेळायचा संपलाही नव्हता तर नशीबानं संसाराचा खेळ समोर मांडला.हिनेही आईवडीलांसाठी मोठ्या हौसेने तो संसार सारीपाट मांडून घेतला नव्हे त्यात ती पुर्णपणे गुरफटून गेली. जीवापाड जपलं त्याला,त्याच्या घरादाराला अन् तो म्हणतोय 'दगड बांधून घेतला मी.' तिचं मन दुखावलं तुटून गेलं.आपणाला काही तरी येतंय, आपल्याकडे कोणतीतरी कला आहे यापेक्षा आपण माणूस आहोत आपणालाही भावना आहेत मन आहे हे त्यांच्याबरोबर आपणही विसरून गेलो याची खंत तिला बोचू लागली.ती विचारचक्रात मग्न होती कंडक्टर जवळ आला अन् 'बहनजी तिकीट' असं म्हणताच ती दचकून भानावर आली.तो भांबावल्यासारखा पाहू लागला तसं तिने पुणे असा अस्फुटसा आवाज दिला.पैसे दिले अन् तिकीट घेऊन पर्समध्ये ठेवले.मोबाईल काढला दहा मिसकाल व पाच मेसेज....
'कुठे आहेस?'
'सांग ना, फोन का घेत नाहीस?'
'एकदा बोल ना प्लीज'
'एवढं का मनावर घेतलंस,मी रागात बोललो सॉरी'
'समजून घे ना परत नाही बोलणार खरंच गं'
आतापर्यंत तेच केलंय दहा वर्षांनी लहान असुनही समजून घेतंच आले.परत मेसेज आला'मुलं रडत आहेत.आई कुठे आहे म्हणून भंडावून सोडलंय मला'
मुलांचं नाव घेताच मातृ-हद्य कळवळलं.आपोआप बोटं मोबाईल वर फिरू लागली'लेकरांना सांभाळा मी पुण्याला जात आहे मावशीकडे' कुठं चाललोय हे सांगणार नव्हती आणि भावनेच्या भरात सांगून टाकलं.फोन वाजला हिचं धैर्य झालं नाही.तो तसाच वाजून बंद झाला. मी खूप वेळ झाले तिच्या बाजूच्या सीटवर बसून निरीक्षण करत होते.तिच्या मनाची घालमेल मला समजत होती.पण बोलण्याचं धाडस होईना.परत मेसेज आला'जिथे आहेस तिथे उतर मी गाडी घेऊन येतोय तुला घ्यायला प्लीज.माझी शपथ आहे तुला'
झाले त्याच्या या शब्दांनी ती कोलमडून गेली.मुसळधार पाऊस पडून जावा आणि आकाशानं निरभ्र व्हावं.सृष्टीनं आपलं स्वच्छ सुंदर रुपानं चरचरांचे स्वागत करावे तशी तिची चर्या बदलली.चेह-यावरचे ढगाळ वातावरण निसरून गेले.त्याच्या एकाच वाक्यानं'थांब मी येतोय....'ती सारं विसरली पटकन उठली अन् कंडक्टर साहेबांना गाडी थांबवण्याची विनंती केली.'मला उतरायचंय,माझे पती गाडी घेऊन येत आहेत मागे प्लीज' कंडक्टर परत संभ्रमाने पाहू लागला तसं तिनं छानसं स्माइल दिलं आणि बॅग घेऊन खाली उतरली...
कंडक्टरच्या तोंडून सहज उद्गार निघाले,"औरत को समझना मुश्कील हैं...."
मी तिथेच होते मी म्हटलं " *नहीं जनाब कोई मुश्कील नहीं औरत को अगर दिल से समझोगे तो बहूत आसान है दिमाग लगाओगे कभी नहीं समझ नहीं पाओगे*
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

03/06/2026

रील
#कथाविश्व
©® ज्योती रानडे

हातात असलेली लाल रंगाची डबी तिला दाखवत तो गुडघ्यावर बसला..त्याने हळूच डबी उघडली. अंगठीतला हिरा सुर्यकिरणांत न्हाऊन इंद्रधनुष्याचे रंग परावर्तित करू लागला.. ती लाजली. तिचा आरक्त चेहरा त्या इंद्रधनुच्या रंगात चमकू लागला..अन् तोच क्षण कॅमेऱ्यात कैद करावा म्हणून त्यांची मैत्रीण मोनिका फोन घेऊन तयार होती पण नेमकी त्याचवेळी मोनिकाला जोरात शिंक आली व तो क्षण हातून निसटला..

“परत एकदा प्रपोज कर रे, वरूण! जयू, थोडी राईटला हो!” मोनिका परत कॅमेरा सज्ज करून तयार झाली..पण ऐनवेळी एक कावळा जोरात काव काव करून गेला व परत रि टेक करावा लागला. असेच तीन चार टेक झाले पण पहिल्या वेळचे भाव, ते लाजणं परत निर्माण झालं नाही. शेवटी कसंबसं रील बनलं व ते सोशल मिडिया वर पोस्ट करून तिघंही लाईक्स आणि कॅामेंटसची वाट बघत बसले. अर्ध्या तासात फक्त दहा लाईक्स आले होते आणि त्यातल्या एकाने “स्टेज केल्यासारखं वाटतय” लिहलं अन् उरली सुरली मजाही गेली. जयू तणतणत घरी आली..

आईनं स्वयंपाकघरातून सांगितलं..”जयू,रविवार मोकळा ठेव हं. काकांच्या साठीचा कार्यक्रम आहे. बारा वाजता तिथे पोचायला हवं”

“हो ग.. माहिती आहे..काकांच्या पार्टीमधे मस्त रील करता येईल या विचाराने ती खूष झाली. कसा नाच करावा विचार करू लागली!

जयू व वरूण कुणालाही न सांगता शनिवारी वर्धनगड या पर्वताच्या उंच सुळक्यावर गेले. प्रपोजलच्या रीलने केलेले नुकसान उत्तम रील करून भरून काढायचं होतं! त्या सुळक्यावर टायटॅनिक सारखी पोज देऊन केलेल्या रील ला लाईक आलेच पाहिजेत..

मोठ्या घेराचा पिस्ता कलरचा लेहेंगा घालून त्या सुळक्यावर उभं राहणं ही कसरतच होती. दोन्ही हात टायटॅनिक सारखे पसरून पर्फेक्ट शॅाट घेऊन झाला व जयू फोन घेण्यासाठी पुढे सरसावली पण तेवढ्यात वरूणचा तोल जाऊन तो सुळक्याच्या टोकावर लोंबकाळू लागला. तिला घामाच्या धारा लागल्या होत्या.. तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं आणि जीवांच्या आकांताने तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता! पिस्ता कलरचा महागडा लेहेंगा फाटला होता..देवाची कृपा म्हणूनच वरूणनं तिचा हात व जवळ असलेली फांदी यांना पकडून स्वतःला वर उचललं.. व एक पाय वर टाकून तो कसाबसा वर आला.. सगळा पाय खरचटून रक्तबंबाळ झाला होता..

तसाच पाय ओढत ते गाडीतून जवळच्या हॅास्पिटल मधे पोचले! नशीबानं फ्रॅक्चर झालं नव्हतं. सर्व जखमांवर उपचार होऊन त्याला खोलीत आणले..तोवर तिनं केलेल्या फोनमुळे त्याचे आई बाबा तिथं हजर झाले होते. “काय पडलं होतं अगदी पर्वत चढायचं? निदान सांगून तरी जायचं..आणि हे कपडे घालून का पर्वत चढलात?” वरूणची आई संतापली होती म्हणून रील बद्दल जयू काही बोलली नाही..

वरूणला दिवसभर तिथेच ठेवायचं ठरलं व जयू घरी आली. आईला सर्व प्रकार सांगताच आई उखडली.. न सांगता मुलं पर्वतावर गेली असंच तिला वाटत होतं. रील करायला गेलो होतो हे तिलाही सांगण्यास जयू धजली नाही.

दुसऱ्या दिवशी काकांच्या घरी शंभर लोक जमले होते. काकूंनी सर्वांना विनंती केली की “पुढचे दोन तास कुणीही फोन वापरायचा नाही. फोनवर फोटो काढायचे नाहीत. रील्स बनवायची नाहीत.. ही आम्हा दोघांची विनंती आहे.. साठीच्या निमित्ताने आम्ही एक साधा कार्यक्रम करत आहोत व त्यासाठी तुमची साथ हवी आहे! शिंदे फोटोग्राफरना बोलावलय.. ते मोजके फोटो काढतील.” रील बनवायला उत्सुक झालेला सर्व तरूण वर्ग हे ऐकताच हिरमुसला होता..

काकांनी गणेशाची पूजा झाली. मुलांनी, स्नेह्यांनी काकांच्या आठवणी सांगितल्या. लोक उंधियो-पुरी आमरसाचे जेवण घेत असताना काकांनी जयूला जवळ बोलावलं.. काका पोलिस इन्स्पेक्टर म्हणून काम करून रिटायर झालेत हे ती विसरली होती.

“जरा आतल्या खोलीत ये जयू..एक विडिओ व्हायरल झाला आहे एका कपल चा..हे बघ..”काका बोलले आणि जयू ओक्साबोक्शी रडू लागली.. तिथे कुणीच नव्हतं..आणि कुणी असलं तर वरूणला मदत करायला न येता हे रील करत बसले ते?” ही तर आजच्या जगातील शोकांतिका आहे हे काकांना माहित होतं..

काकानी तिच्या पाठीवर थोपटले..दारातून कुबड्या घेऊन वरूण आत आला..पाहुणे हा काय प्रकार आहे आश्चर्याने बघत राहिले..

काकांनी घसा खाकरला.. “इथे जमलेल्या सर्वांनाच पण विशेषत: तरूण वर्गाला मला काही सांगायचं आहे.. काल रील करायला गेलेले आपले जयू व जावईबापू वरूण देवाच्या कृपेने वाचलेत..

Gen Z- आजची तरूण मुलं मुली उठ सुट रील्स करत आहेत. का करतात ते रील? काय मिळतं त्यातून?

प्रत्येक लाईक, कॅामेंट, व्ह्यूमधून डोपामिनचा डोस मिळत जातो पण हा क्षणिक आनंद आहे हे विसरू नका..

सोशल मीडियावर दिसणारी मान्यता फार मोठी वाटू लागते पण लक्षात ठेवा - Nobody cares.

इतरांच्या परफेक्ट “दाखवलेल्या” जीवनाशी तुलना करून
आपलं जीवनही कसं मस्त आहे असं स्वतःला सिद्ध करणं जरूरीचं वाटतं पण no life is perfect.

ताण तणाव विसरायचा हा उत्तम मार्ग वाटतो पण लक्षात ठेवा.. ही पळवाट आहे. हे व्यसन आहे..हा चक्रव्यूह आहे! यातून वेळीच बाहेर पडा. सावध व्हा..

मी सेवानिवृत्तीनंतर “डिजिटल डिटॅाक्सचे” किंवा त्याला आपण डिजिटल विश्रांती म्हणू..असे वर्ग सुरू करत आहे.. परंतु पहिला वर्ग आपल्याच घरात घ्यावा लागेल याची कल्पना नव्हती!” आईनं हताश होऊन जयू कडे बघितलं!

काकांनी काकूंकडे बघितलं आणि शांतपणे म्हणाले,”आपण दोघांनी कधी रील्स केले नाहीत की फोटो काढले नाहीत. पण आपल्या आयुष्यातले अर्थपूर्ण क्षण आजही ताजे आहेत, कारण ते आम्ही “जगलो” आहोत. मनापासून! त्यांना पूर्ण न्याय देत! ते आम्ही कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवले आहेत.” खोलीत एकदम शांतता पसरली..

त्या क्षणी जयूने हळूच वरूणचा हात धरला. “काका, “डिजिटल डिटॅाक्स” च्या वर्गांसाठी आम्हालाही काम द्या. आमच्या प्रपोजलच्या रील ला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही हे भयानक पाऊल उचलले व यात वरूण गेला असता हे मला जगाला सांगायचंय.. हे व्यसन दारूच्या व्यसनापेक्षा भयंकर आहे!”

भिंतीवरील पंचवीस वर्षांचे काका एकवीस वर्षांच्या काकूला सायकल वरून डबलसीट नेत असतानाचा फोटो तिनं हातात घेतला..

साधी सुती साडी नेसलेली काकू केवढी गोड लाजली होती!आयुष्यातील असे कित्येक क्षण पूर्णपणे कधीच न जगता ते सतत कॅमेऱ्यात पकडणारी आपली पिढी..

सारं करावं पण तारतम्य वापरून! फोटो, रील्स, टेक्स्ट्स, व्ह्यूज मध्ये हरवून न जाता. त्यातून नैराश्यात न जाता! हे मृगजळ आहे हे समजून जगायचंय. चारच मित्र असावेत पण जीवाभावाचे! प्रत्यक्ष भेटणारे! व्हर्चुअल जगातले आठशे मित्र काय करायचे?

हे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी आज ती सिध्द झाली होती.. वर्धनगड वर केलेले रील पोस्ट न करता ती व वरूण काकांशी विचारविनिमय करत होते!

©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pavan Nagar, CIDCO
Nashik
422008