04/06/2026
आपल्या भागातील लोकसंख्येनुसार सरकारी योजनांचा योग्य लाभ मिळवण्यासाठी 'जनगणना २०२७' होणे अत्यंत अनिवार्य आहे.
तुमची माहिती हीच तुमच्या हक्काच्या योजनांची नांदी ठरेल!
नेहमी लक्षात ठेवा जनगणना अधिकारी कोणत्याही प्रकारचे सरकारी कागदपत्र, बँक तपशील मागणार नाहीत किंवा कोणताही QR कोड स्कॅन करायला सांगणार नाहीत.
#जनगणना2027 #एकपाऊलजबाबदारीचे #एकपाऊलप्रगतीचे
04/06/2026
नवी मुंबई महानगरपालिका
शिक्षण विभाग
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या 51 शाळांमध्ये नर्सरी (बालवाटीका-1) इंग्रजी माध्यम करीता प्रवेश प्रक्रीयेबाबत.
03/06/2026
नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार
* शहरी भागातील पर्यावरण विषयक प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी मूर्तींच्या पुनर्वापरावर शाश्वत उपायोजना करण्याच्या दृष्टीने पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्था, संशोधक यांच्यासोबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली.
* यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (ICT) यांच्यामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची मांडणी करण्यात आली.
ज्यामध्ये पीओपी पुनर्प्राप्तीचा प्रायोगिक प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली, त्याचप्रमाणे लहान प्रमाणात कचरा प्रक्रिया तंत्रज्ञान तसेच विकेंद्रित कचरा व्यवस्थापन मॉडेल यांची माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली.
आयसीटी मार्फत नवी मुंबईत पुनर्वापर प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. याविषयी व्यवहार्यता तपासली जाईल असे महानगरपालिकेमार्फत सांगण्यात आले.
मूर्तीकार संघटनेच्या प्रतिनिधींनी या पुनर्वापरात येणा-या पीओपीचा वापर नव्या मूर्ती बनविण्यासाठी सहमती दर्शविली.
* नुओटेरा संस्थेमार्फत पीओपी मूर्तींचा पुनर्वापर करुन शालेय फर्निचर, जसे की अभ्यासाचे टेबल बनविण्याचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करण्यात आले. ज्याव्दारे विसर्जित मूर्ती पुनर्वापरासाठी सुपूर्द करण्याकरिता सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव संस्थेमार्फत मांडण्यात आला.
* प्रोजेक्ट मुंबई संस्थेमार्फत पर्यावरण विषयक उपक्रमांमध्ये सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नागरी स्वयंसेवक पोर्टल (citizen volunteering portal)’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासोबतच त्यांनी नवी मुंबई शहराला सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक बनविण्यासाठी नागरिक सहभागावर भर देणारे ‘अग्नि सुरक्षा व्हिजन’ सादर केले. याव्दारे नागरिकांच्या सहभागातून शहरासाठी स्वयंस्फुर्तीने काम करणा-या स्वयंसेवकांचा समुह निर्माण करण्याची संकल्पना मांडण्यात आली.
महाराष्ट्र हवामान सप्ताह 2027 (MCW) कालावधीत शहरी जैवविविधतेच्या वैज्ञानिक व्यवस्थापनेच्या आधारावर महाराष्ट्राला जैवविविधतेमध्ये अग्रणी स्थान देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या योगदानाविषयी चर्चा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या वृक्ष गणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रात 225 हून अधिक जागांमध्ये 15 लाखाहून अधिक झाडे असल्याचे निदर्शनास आले असून शहराचे पर्यावरणीय मूल्य वाढविण्यासाठी देशी वृक्षारोपणावर भर देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्थानिक पर्यावरण व्यवस्थापन आणि वर्तणुकीतील बदलांसाठी ‘सिव्हिक मार्शल’चे महत्वही अधोरेखीत करण्यात आले.
* आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या इको क्रांती या उपक्रमांतर्गत एकल वापराच्या प्लास्टिकला जैवविघटनशील उत्पादनांचे विविध पर्याय मांडण्यात आले. त्यांचा उपयोग प्रामुख्याने रेस्टॉरंट व रुग्णालयांमध्ये वाढविण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
* प्रेसपल इंडिया मार्फत उद्याने व शेतीतील कच-यापासून बनविलेल्या बायोमास ब्रिकेट्सचा उपयोग अंत्यविधीसाठी करुन अंत्यविधीसाठी वापरण्यात येणा-या लाकडांच्या बचतीच्या अनोख्या उपक्रमाचे सादरीकरण केले.
* यावेळी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नव्याने लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 मधील प्रमुख तरतूदींवर भाष्य करीत दररोज 100 किलोपेक्षा अधिक मोठया प्रमाणात कचरा निर्माण करणा-या संस्था, सोसायट्या यांच्या यापुढील काळातील जबाबदा-या आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राबवयाची यंत्रणा यावर विशेष लक्ष देण्याची गरज विशद केली.
* त्याचप्रमाणे श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक नियमानुसार विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी जीपीएस टॅगींगव्दारे मूर्तींची ट्रेसिबीलिटी असण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. पीओपी मूर्तींच्या सुयोग्य व्यवस्थापनेसाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाची गरज विशद करीत या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींनी या कामी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी या प्रसंगी केले.
* या बैठकीस महानगरपालिकेचे परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, उदयान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, पर्यावरण विभागाचे कार्यकर्ता श्री. राजेश पवार तसेच आयसीटी मुंबईचे श्री. देवेंद्र राक्षे, डॉ. चंद्रकांत होळकर, डॉ. किर्ती बडवे, श्री. काशिनाथ देवधर, पंजाब रिन्यूअल एनर्जी सिस्टिमचे श्री. सुमित महाजन व श्री. प्रकाश झा, रोटरी क्लबच्या निशिधा सुवर्णा व संदिप सारेन, ऑर्ट ऑफ लिव्हिगजे अविनाश पुरुषे, प्रोजेक्ट मुंबईचे श्री. शिशिर जोशी, मूर्तीकार संघटनेचे श्री.प्रविण बावधनकर, बीच प्लिज इंडियाचे मल्हार कळंबे व इतर संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
* रोटरी क्लब पदाधिकारी यांनी महानगरपालिकेच्या पर्यावरणशील उपक्रमांची प्रशंसा करीत वृक्ष संवर्धनासाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याची संमती दर्शवली.
* केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समितीमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने देशात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राचे (TRF) माहितीपूर्ण सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
* महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी सर्व संबधित संस्था आणि संशोधकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यावहारिक व विस्तारित रुप देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. या बैठकीच्या माध्यमातून नवी मुंबई शहर ‘रिसायकल हब’ होण्याच्या दृष्टीने यशस्वी पाऊल टाकण्यात आलेले आहे.
03/06/2026
Did You Know?
As per the SWM Rules 2026, waste must be segregated into 4 categories before collection:
🟢 Wet Waste
🔵 Dry Waste
🔴 Sanitary Waste
⚫ Hazardous Waste
Proper segregation at source helps improve recycling, ensures safe disposal, and keeps Navi Mumbai clean and sustainable.
About SWM Rules 2026:
• Segregate waste into 4 categories
• Hand over waste to authorized collectors
• Avoid littering and open dumping
• Promote recycling and composting
• Support a cleaner environment
Swachh Survekshan Majhi Vasundhara Swachh Bharat Mission - Urban MyGovIndia
( SWM Rules 2026, Waste Segregation, Wet Waste, Dry Waste, Sanitary Waste, Hazardous Waste, Source Segregation, Solid Waste Management, Recycling, Sustainable City )
03/06/2026
वाशी व तुर्भे भागात महापौर व उपमहापौर यांच्या उपस्थितीत विशेष जलतपासणी मोहीम
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी पातळी आज 71.5 मीटर इतकी असून 15.74 टक्के जलसाठा वापरण्यायोग्य आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतका आहे. मात्र आसपासच्या शहरांमधील पाणी टंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी पावसाचे प्रमाण कमी आहे हे लक्षात घेता नवी मुंबईकरांनी पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी आपल्याकडून पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले.
दोन दिवसाच्या शटडाऊनमध्ये जलवाहिन्या कोरड्या झाल्याने त्यांच्या आतील भागात खाली बसलेला बारीक गाळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरु झाल्यानंतर जलकुंभापर्यंत आला व गढुळ पाण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. या अनुषंगाने महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत शहराच्या विविध भागामध्ये मोठया प्रमाणात जलतपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर यांचे समवेत नगरसेवकांनीही विविध विभागांमध्ये जाऊन जलतपासणी चाचणीची पाहणी करण्यास सुरुवात केली.
या पाहणीमध्ये आंतरराष्ट्रीय आयएसआय मानकानुसार पाणी नमुन्यातील पीएच, टिडीएस, टर्बिडिटी व क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले. या ठिकठिकाणच्या तपासणीमध्ये पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. तरीही नागरिकांना आपल्या घरातील पाणी दूषित असल्याची शंका असल्यास तक्रार करण्यासाठी 1800222309 हा टोल फ्री विनामूल्य क्रमांक जाहीर करण्यात आला. आता तक्रारींचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून पाणी पूर्वीसारखे स्वच्छ मिळू लागले आहे.
तरीही काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये लिकेजेस असल्याने नळाव्दारे मिळणारे पाणी गढूळ असल्यास लिकेजेस शोधून ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देश महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी आजच्या तुर्भे, वाशी भागातील पाणी नमुने तपासणी विशेष मोहिमेच्या पाहणी प्रसंगी दिले.
यावेळी उपमहापौर श्री. दशरथ भगत, क प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मोरे व ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. शैला पाटील, नगरसेवक श्री. शशिकांत राऊत, श्रीम. दयावती शेवाळे, श्रीम. शशिकला पाटील, श्रीम. अंजली वाळुंज, श्री. सुनिल कुरकुटे, श्रीम. शशिकला औटी, श्रीम. शिल्पा ठाकूर, श्रीम. प्रिती भगत तसेच अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर महोदयांनी तुर्भे से. येथील मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचीही पाहणी केली.
याप्रसंगी विशेषत्वाने गावठाण भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने त्यामध्ये मोठया प्रमाणात लिकेजेस असल्याचे सांगत नगरसेवकांनी त्या वाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली 10% पाणी कपात ही सध्या सगळीकडे जाणवत असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेता 20 % पर्यंत करावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडून अशा पाणी टंचाईच्या काळातही नवी मुंबईत मुबलक पाणी मिळत असल्याने गाडया धुण्यासाठी पाईप लावून पाण्याचा अनाठायी वापर करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी याप्रसंगी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.
यावेळी मोठया कालावधीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने पाणी गढूळ असण्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आल्या. आता पाण्याची स्थिती जवळजवळ पूर्ववत झाल्याचे आढळून येत असून महानगरपालिकेमार्फत पाण्याच्या चाचण्या सुरुच ठेवल्या जाणार आहेत.
03/06/2026
'जनगणना २०२७' अंतर्गत जेव्हा अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना योग्य आणि सविस्तर माहिती नक्की द्या. कारण तुमची माहितीच शहरात शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांचे चांगले नियोजन करण्यास मदत करणार आहे.
माहिती देताना हे विसरू नका की, जनगणना अधिकारी कधीही बँक डिटेल्स, सरकारी कागदपत्रे किंवा QR कोड स्कॅन करायला सांगत नाहीत.
#जनगणना2027 #एकपाऊलजबाबदारीचे #एकपाऊलप्रगतीचे
03/06/2026
धार्मिक स्थळांची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पूजा साहित्य, निर्माल्य आणि इतर कचरा योग्य ठिकाणी टाका, परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वच्छतेद्वारेच सेवाभाव जपा. ♻️🛕
SWM Rules 2026:
• कचरा वेगळा करा
• कचरा इथे-तिथे टाकणे टाळा
• स्वच्छ परिसर राखा
• प्लास्टिकचा वापर कमी करा
Swachh Bharat Mission - Urban Swachh Survekshan Majhi Vasundhara MyGovIndia
( SWM Rules 2026, Religious Place Cleanliness, Temple Cleanliness, Waste Segregation, Responsible Waste Disposal, Public Cleanliness, Clean Surroundings, Plastic Free Environment, Eco Friendly Practices, Environmental Awareness )
03/06/2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉट नंबरवर 918291920504 फक्त 'Hi' पाठवून तुम्ही तुमचे बिल पाहू शकता किंवा भरू शकता.
सोबतीला कोणत्याही UPI Appवरून (Google Pay, PhonePe, Paytm, BHIM) फक्त एका स्कॅनमध्ये सुरक्षित पेमेंट करा!
02/06/2026
अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश
नवी मुंबई महानगरपालिकेची 26 नागरी आरोग्य केंद्रे, 2 माता बाल रुग्णालये व 3 सार्वजनिक रुग्णालये याव्दारे नागरिकांना आरोग्य सेवा पुरविल्या जात असून त्यामधील गुणवत्ता वाढीसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने नियमितपणे आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
यामध्ये प्राथमिक स्तरावरील वैद्यकिय तपासणी व उपचार नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केले जात असून त्यांच्याकडे उपलब्ध होणा-या नागरिकांच्या आरोग्य स्थितीची माहिती अचूक व अद्ययावत असावी याकडे बारकाईने व काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
विविध प्रकारचे लसीकरण कार्यक्रम राबवितांना त्यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग मिळावा व जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यादृष्टीने मोठया सोसायट्या, झोपडपट्टी भाग या ठिकाणी जागरूकता शिबीरे घ्यावीत. तसेच नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा अशा सूचना आयुक्त महोदयांनी यावेळी केल्या. यासाठी आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे व स्थानिक पातळीवर नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे असेही सूचित करण्यात आले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोगाचा धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही आत्तापासूनच प्रभावीपणे सुरु करावी असे निर्देशित करतांनाच मलेरिया प्रतिबंधासाठी सर्वात जोखमीचे क्षेत्र असलेल्या बांधकाम साईट्सवर लक्ष केंद्रीत करावे असेही सूचित करण्यात आले.
महानगरपालिकेच्या टेस्टिंग लॅबमध्ये थॅलेसेमिया, स्वाईन फ्ल्यू अशा चाचण्या करण्याबाबत कार्यवाही करावी असेही निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लान्टची स्थलांतरण कार्यवाही जलद करावी आणि सर्व व्हेन्टिलेटर उपयोगात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असेही आयुक्त महोदयांनी सूचित केले.
आयुष्मान भारत कार्डची वितरण कार्यवाही जलद करावी तसेच महानगरपालिकेकडे उपलब्ध होणारी सर्व प्रकारच्या रुग्णांची माहिती डिजीटल करण्याबाबतही पावले उचलावीत असेही सूचित करण्यात आले.
महानगरपालिकेच्या रुग्णालयातील माता-बाल मृत्यूची माहिती घेतांना प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा जाणून घेऊन डेथ ऑडिट करण्याच्या सूचना देतानाच या मृत्यूमागील कारणांचा अभ्यास करुन पुढील काळातील सुयोग्य उपचारांसाठी व मृत्यूदर कमी करण्यासाठी त्या माहितीचा उपयोग करुन घ्यावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
या प्रसंगी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, उपआयुक्त डॉ. अजय गडदे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.धनवंती घाडगे व डॉ.रत्नप्रभा चव्हाण तसेच तिन्ही सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, दोन माता बाल रुग्णालयांचे वैदयकिय अधिकारी, विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचे वैद्यकिय अधिकारी आणि पीजी मेडिकल इन्स्टिट्यूटचे डिन डॉ. ज्ञानेश बेलेकर उपस्थित होते.
आरोग्यशास्त्र हे संशोधन व चिकित्सेवर अवलंबून असल्याने तशा प्रकारे अभ्यास करुन सेवेची गुणवत्ता वाढविण्यावर भर दयावा आणि महानगरपालिकेमार्फत नियमितपणे सुरु असणारे लसीकरण कार्यक्रम, तपासणी मोहीमा, आरोग्य शिबीरे यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने अधिक प्रभावी कामगिरी करावी असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने निर्देश देण्यात आले.