Dio Dharashiv

Directions Contact the organization

Dio Dharashiv जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव

08/10/2026

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल

*७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील पथकाकडून यशस्वी मूल्यांकन*

धाराशिव, दि.८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्ह्यातील एकूण ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे,अशा एकूण १०१ आरोग्य संस्थांचे राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.

जिल्हाधिकारी किर्ती कीरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आरोग्य विभागाने हि महत्वाची व मोलाची कामगिरी केली आहे, अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यात एकमेव जिल्हा आहे. या कामगिरीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांचे योग्य नियोजन व त्यासाठीचा पाठपुरावा आहे.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे,रुग्णांना सुरक्षित व प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देणे, तसेच आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ,औषधसाठा, उपकरणे, स्वच्छता,संसर्ग प्रतिबंध व विविध आजारावर नियंत्रण आणून रुग्णाभिमुख सेवा यांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा आहे.

या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांची विविध निकषांच्या आधारे काटेकोर तपासणी व मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये जिल्हा स्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय पातळीवरील अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली जाते तपासणी सूचीनुसार आरोग्य संस्थेतील पायाभूत सुविधा,उपलब्ध मनुष्यबळ, औषधे व वैद्यकीय साहित्य, प्रयोगशाळा सेवा,रुग्णसेवा, स्वच्छता व जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण,रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, नोंदवही व अभिलेख व्यवस्थापन तसेच आरोग्य सेवांची एकूण गुणवत्ता आदी बाबींची पाहणी केली जाते.

जिल्ह्यातील संबंधित आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच आवश्यक कागदपत्रे व नोंदी अद्ययावत करणे,स्वच्छता व परिसर व्यवस्थापन,औषधे व उपकरणांची उपलब्धता,रुग्णांच्या समाधानावर आधारित सेवा आणि विविध आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून राष्ट्रीयस्तरावरील पथकाने संबंधित आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले.मूल्यांकनामध्ये निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता केल्याचे आढळून आल्याने ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत.

राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र मिळणे ही धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी निश्चितच अभिमानाची आणि उल्लेखनीय बाब आहे.या यशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

या यशामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,डॉ. कुलदीप मिटकरी,डॉ.विनयशील कुलकर्णी,डॉ.मारुती कोरे,
डॉ.सुशील चव्हाण,डॉ.पंकज शिनगारे,जीवन कुलकर्णी, किशोर गवळी,किशोर तांदळे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,परिचारिका, प्रयोगशाळा कर्मचारी,आशा स्वयंसेविका तसेच इतर सर्व अधिकारी-कर्मचायांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

आरोग्य विभागाच्या विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे.राष्ट्रीय स्तरावरील मिळालेले प्रमाणपत्र व त्या सोबतच आरोग्य संस्थांना बक्षिसापोटी मिळणारा निधी यामुळे संबंधित आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यास मदत होईल तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आरोग्य संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी अधिक झाली असून भविष्यातही या गुणवत्तेचा सातत्याने दर्जा राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांना वेळेवर, सुलभ,सुरक्षित आणि रुग्णाभिमुख आरोग्य सेवा देणे हा आरोग्य विभागाचा केंद्रबिंदू राहणार आहे.

जिल्ह्यातील १०१ आरोग्य संस्थांना मिळालेले राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र हे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तावाढीचे द्योतक असून,गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत' पोहोचविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
00000000

08/10/2026

*जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे वाढते प्रमाण : नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन*

धाराशिव,दि.८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डासांची उत्पत्ती रोखणे,घरात डासांचा प्रवेश टाळणे आणि ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे,या उपाययोजनांमुळे कीटकजन्य आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.

पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होते.घरातील पाण्याची भांडी,ड्रम,टाक्या तसेच परिसरातील पाणी साठे याकडे नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.पाणी वाहते करावे. गटारे नाल्या स्वच्छ कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात डास उत्पती होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशिल कुलकर्णी यांनी केले आहे.

*खिडक्यांना जाळ्या बसवा* डासांचा घरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.दरवाजे व खिडक्या शक्यतो बंद ठेवून घरात डासांचा वावर कमी करण्याची काळजी घ्यावी.

*झोपताना मच्छरदाणीचा वापर करा*
रात्री झोपताना मच्छरदाणीचा नियमित वापर करावा.विशेषतः लहान मुले,वृद्ध आणि आजारी व्यक्तींना डासांपासून संरक्षण मिळेल याची दक्षता घ्यावी.

*आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा*
आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा.या दिवशी घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी,ड्रम व टाक्या रिकाम्या करून आतून घासून स्वच्छ कराव्यात.घराच्या परिसरात कुठेही पाणी साचले असल्यास ते तातडीने काढून टाकावे.

*सेप्टिक टँकच्या पाईपला जाळी लावा*
सेप्टिक टँकच्या पाईपला योग्य प्रकारे जाळी बसवावी.या माध्यमातून डासांची उत्पत्ती होणार नाही,याची दक्षता घ्यावी. घराभोवती अनावश्यक पाणी साचणार नाही,याचीही काळजी घ्यावी.

*कोणताही ताप अंगावर काढू नका*
ताप,अंगदुखी,डोकेदुखी,थंडी वाजणे,अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.कोणताही ताप अंगावर काढू नका.वेळेत तपासणी व उपचार घेण्यासाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.

*स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका*
ताप आल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत.तसेच केवळ औषध दुकानातून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.तापाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासणी व उपचार करून घ्यावेत.

*नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा*
कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे.प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात व परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही,यासाठी नियमित पाहणी करावी.पाणी साठविण्याची भांडी झाकून ठेवावीत आणि अनावश्यक पाणी साठे नष्ट करावेत.डासांची उत्पत्ती रोखा,कीटकजन्य आजार टाळा आणि निरोगी धाराशिवसाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
0000000

07/10/2026

*जलजीवन मिशनची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करा ; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई*
* ९० टक्क्यांहून अधिक प्रगतीची २५ कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
* अपूर्ण कामांमुळे गावाला टँकर लागल्यास खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करणार

धाराशिव दि.७ ऑक्टोबर ( जिमाका) ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमधील अपूर्ण कामांना आता गती देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे,अपूर्ण कामामुळे एखाद्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहणार असून,टँकरसाठी येणारा खर्चही संबंधित ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय,येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीस जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कामे असलेले २३ कंत्राटदार,मुख्य कार्यकारी अधिकारी, उपअभियंता,कनिष्ठ अभियंता, TPI, सहाय्यक लेखा तसेच PMC WAPCOSचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत प्रत्येक कामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

*५९४ पैकी ३४६ कामे पूर्ण; २४८ प्रगतिपथावर*
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे जलजीवन मिशनअंतर्गत एकूण ५९४ कामे आहेत.त्यापैकी ३४६ कामे पूर्ण झाली असून,२४८ कामे प्रगतिपथावर आहेत.प्रगतीनुसार ० ते २५ टक्के टप्प्यात २२ योजना, २५ ते ५० टक्के टप्प्यात ३९ योजना,५० ते ७५ टक्के टप्प्यात ९३ योजना,७५ ते ९९ टक्के टप्प्यात ९४ योजना,तर १०० टक्के पूर्ण झालेली ३४६ कामे आहेत.
याच कालावधीत तांत्रिक बदल अथवा योजना सुधारित करणे आवश्यक असलेली १९९ कामे आहेत.त्यापैकी १२० कामांना शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

बैठकीत कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा देण्यात आली. ८० ते ९० टक्के प्रगती झालेली ४४ कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत,तर ९० ते १०० टक्क्यांच्या टप्प्यातील २५ कामे आठ दिवसांतच पूर्ण करावीत, असे सक्त आदेश देण्यात आले.
पाणीपुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचूनही ते अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये,यासाठी प्रशासनाने ही कालमर्यादा निश्चित केली आहे.

*काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत*
निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.आदेशानुसार काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर निविदेतील अटी व शर्तींनुसार कठोर कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

कामांच्या गुणवत्तेबरोबरच ती निर्धारित वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे असून,ग्रामीण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये,यासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांनी जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अपूर्ण कामामुळे टँकर लागला तर जबाबदारी ठेकेदाराची
जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरू असलेल्या अथवा काम अपूर्ण असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेण्याचे स्पष्ट केले आहे.अशा गावाला टँकरची आवश्यकता भासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्चही संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल,अशा सक्त सूचना बैठकीत देण्यात आल्या.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ एखाद्या योजनेच्या कामाच्या टक्केवारीपुरता मर्यादित राहत नाही.एखादे काम रखडले की त्याचा थेट परिणाम गावातील कुटुंबांवर होतो.घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्यास महिलांना पाण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो,तर पाणीटंचाईच्या काळात संपूर्ण गावाची चिंता वाढते.त्यामुळे जलजीवन मिशनमधील प्रत्येक अपूर्ण काम लवकर पूर्ण करून गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांना आणखी पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये आणि जलजीवन मिशनचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा,यासाठी प्रगतिपथावरील कामांवर आता प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे.
****************

07/10/2026

*दुष्काळाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन गावात*

* आठही तालुक्यांसाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी
* दर आठवड्याला टंचाईग्रस्त गावात मुक्काम
* पीक पंचनाम्यांपासून पाणी-चारा,रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर लक्ष
* गावनिहाय नोडल अधिकारी २४ तास उपलब्ध राहणार

धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) पावसाची तूट, करपलेली पिके,घटणारे जलसाठे आणि पुढील काळात निर्माण होऊ शकणारी पाणी व चारा टंचाई यामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांना प्रशासनाचा थेट आधार मिळावा,यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक दुष्काळ व्यवस्थापन आराखडा कार्यान्वित केला आहे.

जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून,या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून केवळ अहवाल घेण्याऐवजी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन परिस्थिती पाहण्याचे,नागरिकांशी संवाद साधण्याचे आणि टंचाईग्रस्त गावात दर आठवड्याला एकदा मुक्काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

सन २०२६ च्या खरीप हंगामात जूनपासून आजतागायत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाच्या निर्देशानुसार पर्जन्याची तूट व अन्य घटकांमुळे बाधित झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अधिकारी व कार्यालयांना देण्यात आले असून,क्षेत्रीय स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

एल निनोमुळे कमी झालेल्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर सध्या पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आणि संरक्षण करण्याबरोबरच पाटबंधारे प्रकल्प, जलाशय,बंधारे व संबंधित जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखणे आवश्यक झाले आहे.त्यासाठी उपविभागीय अधिकारी,तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी तथा पंचायत समिती कार्यालयांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कमी पावसामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही प्रशासनाने गृहीत धरली आहे.त्यामुळे पशुधन विकास अधिकारी,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,तहसीलदार आणि सेवाभावी संस्था यांनी तालुकास्तरावर समन्वयातून पूर्वतयारी करण्याचे निर्देश आहेत.

*दुष्काळी भागांसाठी १२ उपाययोजना व सवलती*
मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात ‘ट्रिगर-१ (प्रथम कळ)’ लागू झालेल्या तालुक्यांसाठी विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.त्यात जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात सूट,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे,आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर,टंचाई जाहीर झालेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे,शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही अशी व्यवस्था करणे, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करणे,जलसंधारणाची कामे सुरू करणे,तसेच यापूर्वीच्या शासन निर्देशांनुसार पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे या १२ बाबींचा समावेश आहे.

७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषिपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपांना संबंधित सूट लागू राहणार आहे.या सर्व उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना दुष्काळाच्या दाहकतेपासून संरक्षण देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

*आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी*
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी खरीप पिकांच्या पंचनाम्यांची तपासणी, भरारी पथकासह पाटबंधारे प्रकल्प, जलाशय आणि जलस्रोतांना भेटी देऊन अनधिकृत पाणी उपसा रोखणे,संभाव्य चारा टंचाईच्या दृष्टीने पूर्वतयारी करणे तसेच संबंधित तालुक्यांना वेळोवेळी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

तुळजापूर तालुका - अपर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील (मो. ९८५००४१२३२),धाराशिव तालुका - जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे (मो.९४२३४६५९८७),
भूम तालुका - जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)तुकाराम भालके (मो. ९०११०९५७३३), कळंब तालुका - उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रविण धरमकर (मो. ९४२२७४४००७),
वाशी तालुका - उपजिल्हाधिकारी म.प्र.-२, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोष राऊत (मो. ९०७५९०८८६९),परंडा तालुका - उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती स्वाती शेडे (मो. ९८२२५४०२३७),उमरगा तालुका - उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती.अरुणा गायकवाड (मो. ७३५००१५०७९) तर लोहारा तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आणि मनोज राऊत (मो. ९०२१४४३१८५) यांचा आदेशातील तपशीलानुसार समावेश आहे.या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमित कार्यालयीन जबाबदाऱ्यांसह दुष्काळ व्यवस्थापनाशी संबंधित अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्यात,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

*पंचनाम्यांची तपासणी ते अनुदानवाटपापर्यंत लक्ष*
समन्वय अधिकाऱ्यांनी जूनपासून आजपर्यंत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे बाधित तालुक्यांतील खरीप पिकांच्या पंचनाम्यांच्या कामकाजाची रीतसर तपासणी करावी. आवश्यक अहवाल शासनाला वेळेत सादर करावा.नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या पीक नुकसान अनुदान वाटपासाठी आवश्यक याद्या वेळेत पूर्ण करून शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान संबंधित शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचेल, याचीही दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची आठवड्यातून एकदा तहसील कार्यालय स्तरावर बैठक घेऊन दुष्काळविषयक उपाययोजना, पूर्वतयारी,पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा बाबनिहाय आढावा घेतला जाणार आहे.बैठकीत गावनिहाय पशुधनाची संख्या,उपलब्ध चारा,हिरवा व सुका चारा,चारा डेपो किंवा चारा छावणीची आवश्यकता आणि पशुधनासाठी उपलब्ध पाण्याचा आढावा घ्यावा.त्याचबरोबर गावनिहाय पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,विहिरी व बोअरवेलमधील पाणीपातळी, जलस्रोतांची सद्यस्थिती,टँकरची आवश्यकता आणि टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा तपासून टंचाई निवारण उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*रोजगारासोबत मृद व जलसंधारणावर भर*
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून पाणी,चारा,शेती,पशुधन, रोजगार,पिकांची स्थिती,नुकसान नोंदणी आणि इतर मदत व उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.रोजगाराची साधने जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची कामे घेताना मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश आहेत.

गावांतील शासकीय जलस्रोत,विहिरी, बोअरवेल,तलाव,बंधारे आणि पाझर तलावांची स्थिती तपासून त्यांच्या वापराचे आणि संरक्षणाचे नियोजन करावे.पाणी किंवा चाराटंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या बाबींची आधीच कल्पना घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात.नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांची नोंद घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधत त्यांचे तातडीने निराकरण करावे.नागरिकांना प्रशासनाकडून उपलब्ध होणाऱ्या मदतीची स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ माहिती देऊन अनावश्यक अफवा अथवा गैरसमज निर्माण होणार नाहीत,याचीही दक्षता घेतली जाणार आहे.

*सर्व यंत्रणा एका सूत्रात*
ग्रामपंचायत,महसूल विभाग,पंचायत समिती,कृषी विभाग,पशुसंवर्धन विभाग,जलसंपदा विभाग,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,महावितरण आणि अन्य संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून एकत्रित दुष्काळ व्यवस्थापन करावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेषतः पाणीटंचाई,चाराटंचाई, पशुधनाच्या अडचणी,रोजगाराची गरज,पिकांची स्थिती अथवा अन्य गंभीर समस्यांना सामोरे जाणाऱ्या कुटुंबांची स्वतंत्र माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

*आठवड्यातून एकदा गावातच मुक्काम*
दुष्काळी परिस्थितीत कागदावरील आकडेवारी आणि प्रत्यक्ष गावातील वास्तव यामधील अंतर कमी करण्यासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांना थेट गावात मुक्काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुकास्तरावरील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने टंचाईग्रस्त गावांची निवड करून दर आठवड्यातून एकदा त्या गावात सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मुक्काम करावा,असे आदेशात म्हटले आहे.

या मुक्कामादरम्यान गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी,शेतकरी,महिला, पशुपालक,ज्येष्ठ नागरिक आणि अन्य घटकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत.मुक्कामात एखादी गंभीर बाब निदर्शनास आल्यास त्याच दिवशी सक्षम प्राधिकाऱ्याला अहवाल अथवा माहिती देऊन तातडीची कार्यवाही सुनिश्चित करण्याचे निर्देश आहेत.

पाऊस कमी झाल्याने शेतातील पीक हातातून जाण्याची भीती असलेला शेतकरी असो,जनावरांसाठी उद्याचा चारा कुठून आणायचा या चिंतेत असलेला पशुपालक असो किंवा गावातील पिण्याच्या पाण्याची चिंता असलेले कुटुंब अशा नागरिकांपर्यंत प्रशासन प्रत्यक्ष पोहोचावे,हा या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे.

मुक्कामादरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची नागरिकांना माहिती द्यावी.‘दुष्काळी परिस्थितीत शासन व प्रशासन नागरिकांच्या पाठीशी असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी प्रशासनाशी संपर्क साधावा,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्याचेही आदेश आहेत.

*प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी ; २४ तास संपर्क*
प्रत्येक गावासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांचा मोबाइल क्रमांक सर्व गावकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.संबंधित नोडल अधिकारी नागरिकांसाठी पूर्णवेळ (२४ × ७) उपलब्ध राहतील.नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी आणि संबंधित विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन करावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच २५ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयातील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासून क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत योग्य समन्वय राहील आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल,याची जबाबदारीही समन्वय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

*दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल*
नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी तालुका व गावभेटींचा संक्षिप्त अहवाल, प्रत्यक्ष आढळलेल्या समस्या, त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रलंबित बाबींची माहिती दर सोमवारी सकाळी १० वाजता समक्ष उपस्थित राहून सादर करावी लागणार आहे.

या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही,याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कामकाजात निष्काळजीपणा अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल,असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
*************

07/10/2026

*चारा टंचाईवर मात करण्यासाठी बगॅस-मळीपासून पशुखाद्याचा पर्याय*
जिल्हाधिकाऱ्यांकडून पशुसंवर्धन विभागासह ढोकी साखर कारखान्याची पाहणी

शास्त्रोक्त प्रक्रिया,प्रयोगशाळा तपासणी अन् शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे निर्देश

धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईवर मात करताना पशुधनाला सुरक्षित,पौष्टिक आणि किफायतशीर आहार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक साधनसंपत्तीचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर करण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ६ ऑक्टोबर रोजी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत ढोकी येथील साखर कारखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन साखर निर्मितीतील उपउत्पादने असलेल्या बगॅस (उसाची चिपाडे) आणि मोलॅसिस (मळी) यावर योग्य प्रक्रिया करून त्यांचा जनावरांसाठी पूरक चारा म्हणून प्रभावी वापर करण्याच्या शक्यतांची सविस्तर पाहणी केली.

दुष्काळसदृश परिस्थितीत पशुपालकांसमोर जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो.अशा परिस्थितीत उपलब्ध स्थानिक संसाधनांचा शास्त्रीय आणि सुरक्षित पद्धतीने उपयोग झाल्यास पशुधन जगविण्यासह दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यासही मोठा आधार मिळू शकतो.या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांमधून उपलब्ध होणाऱ्या बगॅस आणि मोलॅसिसचा पशुखाद्यासाठी उपयोग करण्याच्या शक्यता प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत.केवळ कोरडा बगॅस जनावरांना पचण्यास कठीण असतो आणि त्यातून नगण्य पोषण मिळते.मात्र, पशुवैद्यकीय शास्त्रातील तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यावर युरिया,मोलॅसिस व खनिज मिश्रणाची (Urea Molasses Enriched Straw / UMMB) प्रक्रिया केल्यास त्यातील तंतुमय घटकांची पचनक्षमता लक्षणीयरीत्या वाढते.मोलॅसिसमुळे ऊर्जेची व चवीची पूर्तता होते,तर युरियामुळे प्रथिनांचे प्रमाण सुधारते.या तांत्रिक प्रक्रियेची प्रत्यक्ष व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कारखान्यातील बगॅस डेपो तसेच मोलॅसिस साठवणूक विभागाची बारकाईने पाहणी केली.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले.पशुसंवर्धन विभागाने ढोकी साखर कारखान्याशी समन्वय साधून बगॅस आणि मोलॅसिसवर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे एक मॉडेल तातडीने कार्यान्वित करावे.या प्रक्रियेतून तयार होणारा चारा पशुधनासाठी सुरक्षित आणि पोषणमूल्यांच्या दृष्टीने उपयुक्त असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची वैज्ञानिक पडताळणी करण्यावर विशेष भर देण्यात यावा,असे श्री . पुजार यांनी स्पष्ट केले.

प्रक्रिया केलेल्या चाऱ्यातील पचनक्षमता,पोषणमूल्ये विशेषतः टीडीएन (TDN), क्रूड प्रोटीन (Crude Protein) तसेच विषबाधा प्रतिबंधक मानकांची (Toxicity Safety) जिल्हा व विभागीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून काटेकोर तपासणी करून घ्यावी.आवश्यक सुरक्षितता आणि गुणवत्ता निश्चित झाल्यानंतरच त्याचा पशुपालकांसाठी व्यापक वापर करण्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करावे,असे निर्देश देण्यात आले.

या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ कारखाना अथवा प्रशासकीय पातळीपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष पशुपालकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.पशुपालकांना आपल्या शेतावरच उपलब्ध बगॅस व मळीवर सोप्या पद्धतीने प्रक्रिया करता यावी,यासाठी पशुसंवर्धन विभागाने ग्रामपातळीवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करावीत. प्रक्रियेची योग्य पद्धत,प्रमाण, सुरक्षितता आणि पशुधनाला देण्याची पद्धत याबाबत जनजागृती करावी,असेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले.

चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना बगॅस आणि मोलॅसिस माफक व नियंत्रित दरात उपलब्ध व्हावे,यासाठी साखर कारखान्यासोबत आतापासूनच पूर्वतयारीचे धोरण निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.उपलब्ध साधनसंपत्ती, त्याची गरज,वाहतूक,साठवणूक आणि पशुपालकांपर्यंत सुलभ पुरवठा या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

चारा टंचाईच्या काळात पशुधन जगवणे आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.साखर कारखान्यातील बगॅस आणि मळीचा शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास स्थानिक पातळीवरच शाश्वत व स्वस्त चारा उपलब्ध होईल,असे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले.

चारा टंचाईच्या संभाव्य संकटाला सामोरे जाताना उपलब्ध स्थानिक संसाधनांकडे केवळ उपउत्पादन म्हणून न पाहता त्यांचे पशुधनासाठी उपयुक्त साधनात रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे. शास्त्रोक्त प्रक्रिया,सुरक्षिततेची प्रयोगशाळेत खात्री आणि हे तंत्रज्ञान थेट पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याची सांगड यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील पशुपालकांना चारा टंचाईच्या काळात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.मुळे,सहाय्यक आयुक्त,पशुधन विकास अधिकारी तसेच साखर कारखान्याचे समन्वयक उपस्थित होते.
****************

07/10/2026

*कुष्ठरोग शोध मोहिमेत १.२८ लाख नागरिकांची तपासणी*
* ६७२ संशयित आढळले
* ४८० जणांची तपासणी पूर्ण
* सहवासित तपासणीत तीन असंसर्गिक
* तर फोकस लेप्रसी कॅम्पेनमध्ये एक संसर्गिक रुग्ण आढळला

धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) कुष्ठरोगाबाबत समाजात असलेली भीती, गैरसमज आणि कलंक दूर करण्याबरोबरच रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.दि.१६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सहवासित तपासणी व फोकस लेप्रसी कॅम्पेन अंतर्गत २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातून ६७२ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ही विशेष कुष्ठरोग जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मागील पाच वर्षांत शोधण्यात आलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची तपासणी या कालावधीत करण्यात येत आहे.

तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये संसर्गिक रुग्ण,१४ वर्षांखालील बालरुग्ण तसेच विकृती ग्रेड-१ व ग्रेड-२ चे रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये फोकस लेप्रसी कॅम्पेन सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज आणि कलंक दूर व्हावा, नागरिकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि संशयित रुग्णांचे लवकर निदान व्हावे,या उद्देशाने विशेष जनजागृती व कुष्ठरोग तपासणी अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानादरम्यान नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे,प्रतिबंध, निदान आणि उपचार याबाबत माहिती देण्यात येत आहे.तालुकानिहाय २५ हजार ५४१ घरांतील नागरिकांची तपासणी फोकस लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ५४१ घरांतील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

यामध्ये धाराशिव तालुक्यात ६ हजार ९६४ घरांतील ३५ हजार ८२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यातून १०३ संशयित शोधण्यात आले असून, ७२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.तुळजापूर तालुक्यात ४ हजार ५८९ घरांतील २३ हजार ४४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये २५३ संशयित आढळून आले असून, त्यापैकी २०१ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

वाशी तालुक्यात २ हजार ५२४ घरांतील १२ हजार १७० नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १५ संशयित शोधण्यात आले असून,सर्व १५ संशयितांची तपासणी पूर्ण झाली आहे.लोहारा तालुक्यात १ हजार ८३९ घरांतील ९ हजार १३६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये २७ संशयित शोधण्यात आले असून,सर्व २७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

भूम तालुक्यात २६५८ घरांतील १३ हजार १७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये ८२ संशयित आढळून आले असून, ३२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.परंडा तालुक्यात १२० घरांतील ५७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ४ संशयित शोधण्यात आले असून,चारही संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

कळंब तालुक्यात १ हजार ४८९ घरांतील ७ हजार ४३९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३९ संशयित शोधण्यात आले असून,३७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.तर उमरगा तालुक्यात ५ हजार ३५८ घरांतील २६ हजार ६८२ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १४९ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ९२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण २५ हजार ५४१ घरांतील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, ६७२ संशयित शोधण्यात आले आहेत. त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

१४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ जणांची तपासणी
दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण १४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ सहवासितांची तपासणी करण्यात आली आहे.या तपासणीत तीन नवीन पी.बी.
(असंसर्गिक) रुग्ण शोधून काढण्यात आले आहेत.

फोकस लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ४६४ लोकसंख्येपैकी १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.या तपासणीत ६७२ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.त्यातून एक नवीन एम.बी.(MB-संसर्गिक) रुग्ण शोधून काढण्यात आला आहे.

*ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका*
त्वचेवर संवेदना कमी झालेला,न खाजणारा,न दुखणारा फिकट, पांढरा किंवा लालसर बधिर चट्टा दिसणे,त्या भागातील केस व घाम कमी होणे,हात-पायांमध्ये मुंग्या येणे अथवा संवेदना कमी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे तसेच चेहरा तेलकट दिसणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत.
अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी.

*कुष्ठरोग उपचाराने पूर्णपणे बरा होतो*
कुष्ठरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.संसर्गिक रुग्णाला १२ महिने,तर असंसर्गिक रुग्णाला सहा महिने उपचार दिले जातात.कुष्ठरोगाचे निदान आणि बहुविध औषधोपचार (MDT) शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. वेळेवर निदान होऊन उपचार सुरू झाल्यास अपंगत्व टाळण्यास मदत होते.

अभियानाच्या माध्यमातून गावोगावी तसेच वॉर्डनिहाय जनजागृती करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची तपासणी,निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांनी कुष्ठरोगाबाबत भीती किंवा गैरसमज बाळगू नयेत. संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.‘कुष्ठरोग लपवू नका; लवकर तपासणी करून घ्या,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना सहकार्य करावे आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लावावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव डॉ.सतीश हरिदास आणि सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (कुष्ठरोग),धाराशिव डॉ.एम.आर. कोरे यांनी केले आहे.
****************

07/10/2026

*नवरात्रोत्सवात तुळजापुरातील वीजपुरवठा अखंडित ठेवा*

* २४ तास नियंत्रण कक्षासह अधिकारी-वायरमन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश
* महोत्सवापूर्वी विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्याच्या सूचना

धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने शहरातील विद्युत व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.महोत्सव कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही,याची दक्षता घेण्यासह २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.११ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे.या काळात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल होणार असून भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता विद्युत व्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

*वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता*
नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा अखंडित राहील,याची विशेष दक्षता घेण्यात यावी.अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास मोठ्या गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक पूर्वनियोजन करावे.

विद्युत व्यवस्थेसंदर्भातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात यावा.तसेच संबंधित अधिकारी आणि वायरमन हेही २४ तास उपलब्ध राहतील,अशा पद्धतीने नियोजन करून त्यांची नियुक्ती करण्यात यावी.

*महोत्सवापूर्वी संपूर्ण विद्युत यंत्रणेची तपासणी*
महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने तुळजापूर शहरातील सर्व ठिकाणांची पाहणी करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती पूर्ण करण्यात यावी. ट्रान्सफॉर्मरवर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक भार पडणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी.फ्युज व्यवस्थित ठेवावेत.आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर (स्पेअर) उपलब्ध ठेवण्यात यावेत.

शहरातील कोणत्याही भागात विद्युत केबल उघड्यावर राहणार नाहीत,याचीही दक्षता घेण्यात यावी.नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल (मेंटेनन्स) पूर्ण करून घ्यावी.यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड होऊन जीवित अथवा वित्तहानी होणार नाही,यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी.

*धोकादायक वायर,केबल व पोल तातडीने दुरुस्त करा*
तुळजापूर शहरातील विजेच्या केबल किंवा विद्युत बॉक्स उघडे राहणार नाहीत तसेच ते नागरिक आणि भाविकांसाठी धोकादायक ठरणार नाहीत,याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शहरात धोकादायक स्थितीत असलेल्या वायर,केबल, विद्युत पोल तसेच विद्युत यंत्रणेतील अन्य त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात,असे निर्देश देण्यात आले आहेत.

लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांची सुरक्षितता आणि सुरळीत दर्शन व्यवस्था अबाधित राहण्यासाठी अखंडित व सुरक्षित विद्युत पुरवठा महत्त्वाचा आहे.त्यामुळे महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवून यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही,यासाठी संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****************

Address

Central Building
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dio Dharashiv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dio Dharashiv:

Shortcuts

Share