23/08/2026
मुळशी संघर्ष समितीची विशेष नियोजन बैठक 26 ऑगस्ट रोजी पिरंगुट येथे
मुळशी, दि. 23 ऑगस्ट 2026 : मुळशी तालुक्यातील सामाजिक समस्या, पर्यावरण, पर्यटन, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी तसेच क्रियाशील आणि जागृत नागरिकांना मुळशी संघर्ष समितीशी जोडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजन करण्यासाठी मुळशी संघर्ष समितीची विशेष बैठक बुधवार, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्रीपाद हॉटेल, पिरंगुट येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत संघटनेची नव्याने पुनर्बांधणी, विभागनिहाय संघटनात्मक रचना, मुख्य समन्वयक व नवीन समन्वय समितीची निवड तसेच आगामी जनहिताच्या प्रश्नांवरील कृती आराखड्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
मुळशी संघर्ष समिती ही मुळशी तालुक्यातील विविध सामाजिक समस्या, पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विषयांवर काम करणारी संघर्षशील संघटना आहे. पुणे-दिघे फोर्ट रोडच्या रखडलेल्या कामासाठी संघटनेने विविध आंदोलने करून समाजजागृती केली असून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून रखडलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आगामी काळात मुळशीतील जनतेच्या विविध प्रश्नांवर अधिक व्यापकपणे काम करणे, स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर जनजागृती करणे, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देणे तसेच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील समस्यांवर आवाज उठवणे, हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यात विविध प्रश्नांवर संघर्ष करणाऱ्या आणि समाजोपयोगी काम करणाऱ्या संघटनांना जाहीर पाठिंबा देणे, आवश्यकतेनुसार त्यांच्या आंदोलनात सहभागी होणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज अधिक प्रभावीपणे शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवणे यासाठी मुळशी संघर्ष समिती सक्रिय राहणार आहे.
विशेष म्हणजे, मुळशी तालुक्यातील क्रियाशील, जागृत आणि समाजहिताची भूमिका घेणाऱ्या नागरिकांना संघटनेशी जोडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि पुढील कार्यपद्धतीबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.
मुळशीच्या सामाजिक, पर्यावरणीय, शैक्षणिक, पर्यटन आणि विकासाच्या प्रश्नांसाठी अधिक सक्षम, व्यापक आणि संघर्षशील संघटन उभारण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुळशी संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक मोहन तात्याबा गोळे पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस सर्व सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि मुळशीच्या विकासासाठी कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहनही गोळे पाटील यांनी केले आहे.
बैठक : बुधवार, दि. 26/08/2026
वेळ : सकाळी 11 वाजता
स्थळ : श्रीपाद हॉटेल, पिरंगुट
— मुळशी संघर्ष समिती
मुख्य समन्वयक : मोहन तात्याबा गोळे पाटील