Vijay Patwardhan Foundation

Vijay Patwardhan Foundation

Share

Vijay Patwardhan Foundation
"माणसांमधल्या माणसांसाठी"
A organisation which helps artists.

02/07/2025

चला तालीम सुरू करा आपला प्रवेश निश्चित करा

Photos from Vijay Patwardhan Foundation's post 05/12/2024

आठवणी
"विजय पटवर्धन फाऊंडेशन" आयोजित,
"निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा"
२०२२ साली या स्पर्धेचे दुसरे वर्ष संपन्न झाले. दुसऱ्या वर्षी राज्यभरातून ४५ लेखकांनी आपले लेख स्पर्धेत उतरवले होते. राजेश दामले आणि अक्षय वाटवे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तर, प्रसिध्द लेखक आणि नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते परेश सभागृह येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या समारंभात बोलताना श्रीनिवास भणगे म्हणाले, "परिसंवाद, चर्चासत्रे आणि साहित्य संमेलनातही विनोदी लेखन तसेच लेखकाला सापत्न वागणूक मिळते. साहित्याच्या मंडपात विनोदी लेखक करणाऱ्यास दुसऱ्या पंगतीत बसविले जाते." या परिस्थितीवर गंभीरपणे चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वास्तूप्रसादचे प्रसाद शिवरकर, स्पर्धेचे परिक्षक प्रसिद्ध निवेदक राजेश दामले, युवा नाट्यकर्मी अक्षय वाटवे, फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन व्यासपीठावर होते. मधुरा टापरे यांनी त्यांचे बंधू मंदार आगरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्दितीय करंडक पुरस्कृत केले होते. तर प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण यांनी त्यांचे बंधू अभिजित सोमण यांच्या स्मृती प्रित्यर्थ तृतीय करंडक पुरस्कृत केला होता. या समारंभास अभिनेत्री माधवी सोमण, ऋग्वेद सोमण, मधुरा आगरकर-टापरे, प्रशांत तपस्वी, किशोर कुलकर्णी, अभिजित इनामदार, धनंजय आमोणकर, वृषाली पटवर्धन
आणि राजू बावडेकर यांची विशेष उपस्थिती होती.
"विनोदी लेखन म्हणजे पोरकटपणा नसून विनोदबुद्धी जागृत असणे हा लेखकाकडील मोठा गुण असून, विनोदबुद्धी या गुणामुळे व्यक्तीचे जगणे सुसह्य होते. विनोदाकडे पोरकटपणा किंवा करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते; परंतु विनोद हा विसंगतीतून निर्माण होतो. विनोदाचा आत्मा गंभीर आहे हे लक्षात घेतले जात नाही. विनोदाकडे गंभीरपणे पाहिले तर त्यातून खरा विनोद सापडेल. विनोदी लेखक, वाचक असा शिक्का असणारा दृष्टीदोष साफ केला पाहिजे. तरच, विनोदी लेखनाच्या क्षेत्रात प्रगती होईल."
परीक्षक, राजेश दामले म्हणाले, "विनोदी लेखन करणे सोपी गोष्ट नाही. अशा पद्धतीचे लेखन करणाऱ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. सद्यस्थितीत घडणारा विनोद हा अस्सल विनोद नाही. विनोदी लेखन करताना संहितेची मांडणी, कथेतील प्रसंगी फुलविणे, व्यक्तिरेखा यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे."
दुसरे परीक्षक, अक्षय वाटवे म्हणाले, "वाचकाला रडविणे सोपे असते. पण, हसविणे ही अवघड गोष्ट आहे. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाने आपल्या लिखाणाचे परिक्षण करणे, कथा बांधिव असणे गरजेचे आहे. स्वत:ला कोणती लेखनशैली आवडते हे समजून घेऊन लिखाण करणे अपेक्षित आहे."
समारंभाच्या सुरुवातीस विजय पटवर्धन यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. तर, परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.
*स्पर्धेचा सविस्तर निकाल*
प्रथम क्रमांक - विजय पटवर्धन पुरस्कृत निर्मला श्रीनिवास स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपये रोख - अपर्णा मोडक (राजकारणाचा लाडू).
द्वितीय क्रमांक - वसुधा क्रिएशन पुरस्कृत मंदार वामन आगरकर स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन हजार रुपये रोख - योगेश शिंदे (वडा-पाव).
तृतीय क्रमांक - योगेश सोमण पुरस्कृत अभिजित सोमण स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि दोन हजार रुपये रोख - अभयकुमार कुलकर्णी (कदर).
श्रीनिवास पटवर्धन, हे विजय पटवर्धन यांचे वडिल एक विनोदी लेखक होते आणि त्यांची काही पुस्तके आणि अनेक लेख प्रसिद्ध आहेत. निर्मला पटवर्धन या विजय पटवर्धन यांच्या आई , त्या श्रीनिवास पटवर्धन यांना लेखनकार्यात मदत करायच्या. त्या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही विनोदी लेखन स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.
यंदाचे २०२४ हे या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेतून जो आर्थिक लाभ होईल तो अडचणीत असलेल्या कलाकारांना मैत्रीचा हात देण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.

02/12/2024

विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे नवीन लेखकांना लिखाणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मनात दडलेले विषय आणि निखळ विनोद लोकांसमोर यावे, या उद्देशाने "निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे" आयोजन होते. यंदाचे स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, लेखनाला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. शब्द मर्यादा १,००० ते १,५०० असावी. कुठल्याही संवेदनशील मुद्द्यांबाबत वाद निर्माण करतील अशा आशयाची विधाने लिखाणात असू नयेत. मात्र लेखन विनोदी असणे अनिवार्य आहे. लेखन स्किट, एकांकिका किंवा नाटक या स्वरूपात अपेक्षित नाही. कथा, लेख, निबंध, कविता किंवा पत्र असे स्वरूप असावे. तुमचे लेखन आणि प्रवेश फी आणि फॉर्म दि. ५ फेब्रुवारीच्या आत पाठविणे आवश्यक आहे. १२ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा निकाल व पारितोषीक वितरण समारंभ आणि पहिल्या तीन पारितोषिक प्राप्त लेखांचे वाचन होणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारा निधी कलाकारांच्या हितासाठी वापरण्यात येणार आहे. स्पर्धेसंबंधी अभिजित इनामदार (मो. नं. 9326989835), धनंजय आमोणकर (9370102445) यांच्याशी संपर्क साधावा.

18/09/2024
Photos from Vijay Patwardhan Foundation's post 10/09/2024

त्याचा फोन उचलल्यावर किंवा तो समोर आल्यावर, "विज्जू कसा आहेस?" विचारायचा आणि मी प्रतिप्रश्न करायचो, "दिल्लू तू कसा आहेस ?" (खरं तर तो माझ्यापेक्षा वयाने, मानाने, अनुभवाने मोठा पण त्याला मी दिल्लू म्हटलेलंच आवडायचं.) आणि मग एक बंपर लाफ्टर यायचा. खरंतर, "बंपर लाफ्टर" हा आमच्या, हसऱ्या मित्राचा, "दिलीप हल्याळ"चा आवडता शब्द. म्हणूनच त्याच्या कार्यक्रमाचं नांवही त्याने तेच ठेवलं होतं. त्याच्या पहिल्या द्वीपात्री कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलं होतं. खरंतर, बरेच पंचेस त्याचेच होते. मी फक्त त्यांना लाईनीत लावले होते. तरीही प्रत्येकाला अभिमानानं सांगायचा, "माझ्या कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन विज्याने केलं आहे बरं का." प्रत्येक भेटीत एक विनोद सांगून स्वतः खळखळून हसायचा आणि आम्हालाही हसवायचा. कुर्यात सदा टिंगलम्, सावळा गोंधळ, डार्लिंग डार्लिंग, स्वयंवर झाले डॉलीचे, लवकर ये ना, देवा रे देवा, कुर्यात पुन्हा टिंगलम् अशा अनेक नाटकांत त्याच्या बरोबर काम करण्याचा योग आला. नाटकाच्या दौऱ्याचं वातावरण त्याच्यामुळे सतत हसतं खेळतं रहायचं. विनोदी किस्से आणि विनोद याचा त्याच्याकडे खजिना असायचा. सकाळी लोकांना व्यायाम करायला उठवण्या पासून त्यांच्या कडून व्यायाम करून घेण्यापर्यंत तो सतत पुढे असायचा. आपण कधीतरी उदास होतो, चेहरा पाडून बसतो. पण, हा माणूस सतत हसतमुख असायचा. त्याला कधीच उदास, चेहरा पाडून बसलेला बघितल नाही मी. स्वतः हसायचा आणि दुसऱ्यालाही हसवत ठेवायचा तो. विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याचा हातभार असायचाच. पहिली, "सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा" झाली त्यावेळेला प्राथमिक फेरीला त्याने परीक्षण केले आणि तो आमच्या परिवाराचा एक भाग झाला. कधी त्याने डोनेशन दिलं. कधी मानधन न घेता परीक्षण केलं. कधी वडिलांच्या नावाने पारितोषिक ठेवलं. आमचा दिल्या खरंच खुल्या दिल्याचा होता. त्याचा तो हसरा चेहरा अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये. त्याचं वेगवेगळ्या गाण्यांवर त्या त्या हीरोंच्या ॲक्शन करत नाचणं, कोरोना काळात रोज एक विनोद आणि बोधकथा चित्रित करून पाठवणं, मित्रांच्या वाढदिवसाला स्वतः पोस्टर बनवून पाठवणं, कार्यक्रमाची पोस्टर बनवून पाठवणं हे सगळंच आता मिस करणार आहोत आम्ही सगळेच. एकपात्री कार्यक्रम, द्वीपात्री कार्यक्रम, नाटक, मालिका, चित्रपट सगळ्या क्षेत्रात त्याने यशस्वी मुशाफिरी केली आणि उत्तम काम केलं.
दिलीप तुला खूप मिस् करणार आहोत आम्ही. देवा या रंगमंचावर आमच्या हसतमुख मित्राला, आयुष्यात अत्तरासारखा सुगंध पसरवणाऱ्या आमच्या दिलूला, इतक्या लवकर एक्झिट देऊन तू माझ्या सारख्या त्याच्या सर्व मित्र मंडळींवर अन्याय केला आहेस. दिलू तुझी पदोपदी आठवण येत राहील. तू जिथे कुठे असशील तिथे सुखात रहा. माझी खात्री आहे तिथेही तू लोकांना हसवत ठेवशील.
खूप खूप मिस यू दिल्या....

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune
411038