31/03/2026
📢 विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
📍 नांदेड सिटी, पुणे | 📅 २९ मार्च २०२६
नांदेड सिटी / नांदेड गाव येथे आयोजित भव्य “विराट हिंदू संमेलन” अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
सुमारे २००० नागरिकांची उपस्थिती लाभली.
या संमेलनासाठी सभास्थळाची उभारणी करताना स्थानिक रहिवासी, विविध सेवा देणारे घटक तसेच JCB, टँकर इत्यादी साधनांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे अल्पावधीत सुयोग्य व व्यवस्थित व्यवस्था उभी राहिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शंखनादाने झाली. सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रामरक्षा स्तोत्र पठणाने वातावरण भक्तिमय झाले.
यानंतर भजन, पथनाट्य, भरतनाट्यम व इतर सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला.
धर्माचार्य आशीर्वचनात *श्रीमती वैदेही तामण* यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले,
तर *सौ. प्रिया रसाळ* यांनी पंचपरिवर्तन संकल्पनेवर मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक *मा. डॉ. सुनीलजी देवधर* यांनी “सशक्त व विकसित भारत” घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील एकात्मता, मातृशक्तीचे महत्त्व आणि राष्ट्रभक्ती यावर त्यांनी प्रभावी विचार मांडले.
कार्यक्रमादरम्यान देवस्थाने व मठ प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
*संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व नीटनेटका पार पडला.*
या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक, मातृशक्ती, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
कार्यक्रमाची सांगता *संपूर्ण वंदे मातरम्* या गीताने झाली.
23/03/2026
🌿 *श्रद्धांजली – आनंद गलगली (मधू करजगी)* 🌿
स्वामी समर्थ प्रकट दिनी,
आनंद गलगली, नावाची एक ज्योत शांत झाली…
पण तिच्या तेजाने मात्र,
अनेक वाटा उजळून गेली…
सोलापूरच्या मातीत रुजलेले,
मधू करजगी हे ते बीज होते…
आणीबाणीच्या काळोखातही,
ज्यांचे धैर्य दीपस्तंभ होते…
नाव बदलले, ओळख बदलली,
पण ध्येय कधीच बदलले नाही…
कारावास यातना सहन करत,
राष्ट्रभक्तीचा मार्ग सोडला नाही…
आनंद गलगली म्हणून जगताना,
प्रचारक जीवनही त्यांनी जगले…
निस्वार्थ सेवेचे धडे ,
प्रत्येक कृतीतून त्यांनी दिले…
नांदेड सिटीत येऊन पुन्हा,
नवा अध्याय त्यांनी लिहिला…
आसावरी शाखेच्या उभारणीत,
स्वतःला पूर्णपणे वाहून घेतला…
एकटे सवे भारत माता,
रस्त्याच्या कडेला पूजनासाठी…
आनंद गलगली नम्र हाक देत,
जागवितसे प्रेम राष्ट्रासाठी…
लेखन, कविता, पुस्तके छोटी,
स्वखर्चाने वाढदिवशी दिली भेट…
गलगली काकांच्या त्या ओंजळीतून,
विचारांची पेटली ज्योत…
पत्नीच्या आजारपणातही,
कर्तव्याने कधी न थांबले…
प्रेम, त्याग आणि सेवाभाव,
त्यांच्या आयुष्यातून उमटले…
आज गलगली काका नाहीत इथे,
पण त्यांचे विचार जिवंत आहेत…
अशा स्वयंसेवकांच्या कार्यातून,
संघाचे भविष्य उज्ज्वल आहे…
🙏 विनम्र श्रद्धांजली 🙏
गलगली काका, आपण दिलेली प्रेरणा,
आमच्या प्रत्येक कृतीतून जिवंत राहील…
...मिलिंद मधुसूदन दीक्षित
आसावरी प्रभात, नांदेड सिटी
🙏🙏🙏
11/02/2026
शौर्याचा सूर्य – वैभव भगवत
आला जन्मदिवस तुझा,
पण केक नाही, मेणबत्त्या नाहीत…
आज पेटते फक्त एक दिवा,
तो तुझ्या शौर्याच्या आठवणींत.
आकाश तुझं घर होतं,
देश तुझा श्वास होता,
हिमशिखरांवर उडताना
तू मृत्युलाही थरकाप दिला होता.
सियाचीनच्या त्या थंड वाऱ्यांत,
मिसाईलचा जबर तडाखा झाला,
पण देशरक्षणाचा ध्यास
क्षणभरही ढळला नाही, ढळला नाहीच…
बावीसाव्या वर्षी देऊन प्राण,
अमरत्व तुझ्या नावावर आलं,
शौर्यचक्र तुझ्या शौर्याला,
देशाने नतमस्तक होऊन दिलं.
मुलगा गेला म्हणणं सोपं नाही,
तो तर राष्ट्राचा दीप झाला,
वडिलांच्या डोळ्यांतून ओघळणारा अश्रू
देशाच्या अभिमानात मिसळला.
आजही आकाशाकडे पाहिलं की
एक हेलिकॉप्टर हळूच जातं,
मन सांगतं—तो वैभव आहे,
देशाची राखण करतं.
जन्मदिवसाच्या या क्षणी
फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं—
वैभव, तू शहीद नाहीस,
तू भारताचा अमर पुत्र आहेस.
मिलिंद दीक्षित
🙏🇮🇳
05/06/2025
AHILYA 31 MAY 2025 part 1
पुण्यश्लोक अहिल्या देवी जन्म त्रिशताब्दी व्याख्यान , पूर्वार्ध , नांदेड सिटी, पुणे
05/06/2025
https://youtu.be/NmIsyD70dqM?si=85qb23xjNvQ4Bxfh
AHILYA 31 MAY 2025 part 1
पुण्यश्लोक अहिल्या देवी जन्म त्रिशताब्दी व्याख्यान , पूर्वार्ध , नांदेड सिटी, पुणे
02/06/2025
*🚩🚩🚩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशतजयंती सांगता सोहळा नांदेड सिटीत उत्साहात पार पडला*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जन्मवर्षाच्या* सांगता सोहळ्याचा समारोप शनिवार, दिनांक ३१ मे रोजी नांदेड सिटीत एका उद्बोधक व्याख्यानाच्या माध्यमातून संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर आकाशवाणीच्या अधिकारी, प्रसिद्ध लेखिका व कार्यक्रम निर्मात्या *सौ. अरुणाताई चौधरी* होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून इतिहासाच्या गाढ्या अभ्यासक व सुसंवादिनी साहित्यिका *सौ. श्यामाताई घोणसे* यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. *भारतीय स्त्रीशक्ती, नांदेड सिटी व स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम* आयोजित करण्यात आला.
यानंतर समूह गायनाच्या माध्यमातून अहिल्यादेवीं च्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी गीत सादर करण्यात आले. *सौ. अर्चनाताई कौलगुड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत* भारतीय स्त्रीशक्तीच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली तसेच *अध्यक्ष सौ. अरुणाताई चौधरी यांचा परिचय* उपस्थितांना करून दिला.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. अन्य मान्यवरांचे गुलाब पुष्पांनी स्वागत करण्यात आले, तर श्रोत्यांना सोनचाफ्या ची फुले देण्यात आली. संपूर्ण सभागृहात एक भारलेलं आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झालं होतं.
सेवा विभाग प्रमुख *श्री. मिलिंद दीक्षित यांनी प्रमुख वक्त्या सौ. श्यामाताई घोणसे यांचा परिचय करून दिला*. अध्यक्षीय भाषणात सौ. चौधरी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं च्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा समर्पक आढावा घेतला.
यानंतर सौ. श्यामाताई घोणसे *यांचे सव्वा तासांचे प्रभावी आणि ओघवते व्याख्यान झाले. त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले*. त्यांनी अहिल्यादेवीं च्या *अंगभूत गुणधर्मांचा, कार्यशैलीचा व इतिहासातील योगदानाचा सखोल अभ्यास सादर केला*.
*“मराठा साम्राज्याचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या व्यक्ती जर कोणी असेल, तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच!”* असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. तसेच, *छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवीं वरील त्यांच्या आगामी पुस्तकाबद्दल* माहिती दिली.
*तीनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या महान स्त्रीने* अनेक वैयक्तिक संकटांवर मात करत प्रभावीपणे राज्यकारभार केला. त्यांनी *धर्मशाळा, विहिरी, अन्नधान्य साठा, काशी विश्वनाथ मंदिर बांधणीसारख्या ऐतिहासिक कार्यांची माहितीही* श्रोत्यांसमोर मांडली. त्या अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या, लेखा व्यवस्थापनात प्रवीण अशा अद्वितीय नेत्या होत्या.
*त्यांच्या जीवन कहाणीतून आजच्या महिलांनी प्रेरणा घेऊन संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते, असेही* सौ. घोणसे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘पसायदान’ गायनाने झाली.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये *ॲड. श्री. नरसिंग लगड, डॉ. अंबादास देवकर, श्री. महेश देसाई, श्री. आनंद गलगली, डॉ. शितलकुमार गांधी, श्रीकांत कुलकर्णी, आप्पा कुलकर्णी, श्री. संदीप हिंगाणे, श्री. जगदीश कुकडे, डॉ सौ सुनीता शेवगावकर, सौ. विद्याताई सरजे, सौ. स्नेहा करमरकर, श्री. शामराव गायकवाड, श्री मंगेश भागवत, श्री. शंकरराव इंगवले, श्री. प्रकाश गोरे* यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन *डॉ. नेत्रा देशपांडे* यांनी तर आभार प्रदर्शन *सौ. मोनाली शहा* यांनी केले.
24/05/2025
*📚गरजू मुलांसाठी स्कूल किट - 2025📚*
✒️स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे गेली अनेक वर्षे *सेवा सहयोग, पुणे* यांच्या सहकार्याने वस्तीमधील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचा संच *’स्कुल किट’* म्हणून वितरित करीत आहेत.
✒️स्वानंदच्या माध्यमातून सिंहगड रस्ता, कात्रज आणि कोथरुड परिसरातील *50 सेवा वस्तीत चालवण्यात येणाऱ्या समृद्धी वर्ग, किशोर दर्पण, स्मार्ट अभ्यासिका प्रकल्पातील साधारण 1500 विद्यार्थ्यांना* या स्कुल किटचे वितरण करण्याचे नियोजन करत आहोत.
*✒️या योजनेत आपण व आपल्या कुटुंबियासह खालील प्रकारे सहभागी होऊ शकता.*
🎯 स्कूल किट असेंब्ली करण्यासाठी आपण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकता.
🎯 आपण गरजू विद्यार्थ्यांसाठी 1 किंवा अधिक किट्स पुरस्कृत करू शकता, त्यासाठी रु. 600 किंवा 600 च्या पटीत निधी जमा करता येईल.
🎯 प्रत्यक्ष वस्तीमध्ये आपल्या परिवारासह गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत करणे.
*✒️आपण आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांनाही सहकार्याचे आवाहन करावे.🙏🏻*
स्वानंदच्या कार्यास निधी देण्यासाठी सोबत बँक खात्याची माहिती देत आहोत.
*टीप :- आपण दिलेली देणगी 80-G अंतर्गत कर सवलतीस पात्र राहील.*
📎लिंक : https://donate.swanandjan.org/donation/donate.aspx
🔗वेबसाईट: https://www.swanandjan.org/
कृपया निधी जमा केल्यानंतर आपले नाव, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी या *76668 75654* या क्रमांकावर कळवावा ही विनंती.
▪️संपर्क :- 7666875654
04/05/2025
श्रीसंत ज्ञानेश्वरांची मुक्ताई.... निर्माता , लेखक , दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर यांचा सिनेमा अवश्य पहा.
सनातन धर्माची पताका सातत्याने फडकवत ठेवण्यासाठी व हिंदू धर्माचे स्फुल्लिंग सतत चेतवत ठेवण्यासाठी अविरत प्रयत्न मागील अनेक शतकापासून चालू आहेत. यातील अग्रणी नांव श्री संत ज्ञानेश्वर माऊली व त्यांचे बंधू आणि एकमेवाद्वितीय भगिणी मुक्ताई यांनी केले आहे. ज्ञानेश्वर माऊली अन त्यांचे बंधूचा जीवन प्रवास तर आपण वेळोवेळी ऐकलेला आहे.वाचलेला देखील आहे. पण संत मुक्ताबाई बद्दल फारच थोडी माहिती ऊपलब्ध आहे. तीचा समग्र जीवन प्रवास,ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील तीचे स्थान अधारेखीत करण्याचे काम सध्याचे आघाडीचे निर्माता ,दिग्दर्शक व लेखक श्री. दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. लांजेकर यांच्या अनेक यशस्वी चित्रपटा पैकी एक सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हटल्यास वावगे ठरू नये.
या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे यातील मुख्य व मध्यवर्ती चारही भूमिका करणारे कलाकार हे तसे चित्रपट सृष्टीस नवीनच आहेत. तशा त्यांनी टिव्ही सिरीयल, जाहीराती मधून भूमिका केल्या असतील पण या चित्रपटात मिळालेल्या भूमिकेचे सोनं केल आहे.सगळे कलाकार त्यांना मिळालेली भूमिका अक्षरशःजगले आहेत.
चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका नवागतानां दिलेल्या असून ज्ञानदेवांच्या समकालिन संतांच्या भूमिका चित्रपट सृष्टीतील मुरब्बी जून्या व जाणत्या कलाकारांना दिलेल्या आहेत. विठ्ठलपंत, त्यांची पत्नी रुक्मिणी , विसोबा शास्त्री, चांगदेव ,संत नामदेव, पैठणचे धर्मशास्त्री यांच्या भूमिका अन्य जेष्ठ अन श्रेष्ठ कलाकार यांनी आपल्या मुरब्बी अभिनयाने सिनेमास एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.कठोर काळीज असणाऱ्या चित्रपट रसीकाच्या देखील डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही म्हणतात. या चौघा भावंडानां प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध कराव लागल आहे. चित्रपट,रसिकास अंतर्मुख केल्या शिवाय रहात नाही.
या सर्वांत मध्यवर्ती भूमीकेत असेलेली मुक्ताई लहान पणाची असो अथवा तरुण वयातील तीने आपल्या सोज्वळ अभिनायाने चित्रपट रंजक केला आहे. तीला आदिमाया , चित्कला अर्थात आकाशातील विज असेच म्हंटले जाते. तिचा जन्म झाला त्यावेळी विठ्ठलपंताचे झोपडी समोर वीज कोसळल्याचे दिसते.ती जेव्हा देह सोडते तेव्हा ती वीज होऊनच अंर्तधान पावली आहे. विठ्ठलपंत व रुक्मिणीच्या संसार वेलीवरील ही चार निरागस मुलं नव्हे चार फुलंच. त्यानां जन्मापासूनच कष्ट , हालअपेष्टा, अनाथ, वाळीत टाकलेली म्हणून संबोधले जाते. अशातच त्यांचे आईबाप आपल्या मुलांना शिक्षण मिळावे त्यांचे मौंजीबंधन व्हावे, समाजात समान वागणुक मिळवी याचसाठी देहत्याग करतात. तेव्हा हिच चिमुकली मुक्ताई या तीन भावांची आई होते. आळंदी जवळील सिद्ध बेटावर ही मुले आपली झोपडी बांधून गुजराण करतात व दिवसाचे चोवीस तास भगवंताचे नामस्मरणात वेळ व्यतीत करतात.
प्रत्येक वेळी यांचे बिकट प्रसंगी स्वतः श्री विठ्ठल व रुखुमाई यांचे पाठीशी उभे राहतात. यांचा आधार बनतात. ही चारी भावंडे भक्ती मार्गात एवढी तल्लीन झालेली आहेत की यांचेमध्ये सरस कोण हेच आपण ठरवु शकत नाहीत.तरीपण मुक्तेने आपले वेगळेपण जपले आहे.एवढी सिद्धहस्त विदुषी होऊन देखील कुठल्याही प्रकारचा गर्व नाही की अभिमान नाही. म्हणूनच मुक्ताचे चरणी मोठमोठे संत लीन झाले आहेत. चौदाशे वर्षे तपस्या केलेला चांगदेव पण केवळ गर्व अन अभिमानाने स्वत:ला एक सिद्ध पुरुष समजतो अन एक कोरेच पत्र ज्ञानेश्वर महाराजानां पाठवतो. ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडा सोबत भिंतीवर स्वार होऊन त्यांना भिंतीसकट आकाश मार्गे सामोरे जातात.तेव्हा त्यांचा अभिमान ,अहंकार, गर्व गळुन पडतो मुक्ताई चांगदेवानां म्हणते ....
चौदाशे वर्षे शरीर केले जतन
बोधा वीण शीण वाया गेला अन ते मुक्ताईला शरण जातात. ती चांगदेवांची गुरु बनते. असाच काहीसा प्रकार नामदेवा बाबत सुद्धा घडला आहे. त्यांना देखील आपण करीत असलेल्या देवाचे भक्तीचा अहंकार , गर्व झालेला असतो. त्यांचा अहंकार त्यांचे परमार्थ मार्गातील अडथळा ठरणार असतो तेंव्हा तो दूर व्हायला हवा म्हणून मुक्ताबाई त्यांना म्हणते अरे अजून तु कच्च मडकच आहेस. तुला कुणाला तरी गुरु करून घ्यावे लागेल आणि नामदेवानां तू कच्चा आहेस की पक्का मडक आहेस हे ती थापटण्याने डोक्यावर मारून पाहते अन म्हणते....
अखंड जयाला देवाचा शेजार
का रे अहंकार नाही गेला...
संपूर्ण चित्रपटात कुठेही लाऊड म्युजिक नाही. आपण ऐकलेलेच अभंग पण एका नव्या चालीत आळंदीचा माऊली मेश्राम, सृजन कुलकर्णी ,बेला शेंडे व अन्य गायकांनी गायली आहेत. त्या काळातील समर्पक अशी घरे ,मठ , मंदीर यांचे भव्य सेटस् पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. ज्ञानादादा ताटी उघड म्हणून आर्त टाहो फोडणारी मुक्ताई, ज्ञानोबा माऊलीच्या पाठीवर मांडे भाजण्याचा प्रसंग,ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्याचा प्रसंग , सोपानाची जलसमाधी व मुक्ताई विद्युलता होऊन आकाश मार्ग प्रयाण ही दृश्ये मन हेलावून टाकतात.
अत्यंत कमी वयात समाज प्रबोधनाचे खुप मोठे कार्य या संतानी केले आहे. हिंदू धर्म लोकात रुजावा , त्याची वाढ व्हावी,हिंदू सनातन धर्माची ओळख तळागाळातील लोकांपर्यंत व्हावी. या त्यांच्या योगदानाचे आपणही काही देणं लागतो. हेच सांगण्याचा प्रयास या चित्रपटा मधून केल्याचे दिसते. आपण समस्त हिंदू बांधवांनी हा सिनेमा अवश्य बघावा. हीच या निमित्ताने कळकळीची विनंती
धन्यवाद.....
सतीश पाटील
नांदेड सिटी ,पुणे.
( आताच रिलीज झाला आहे.पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळत नसल्याने कदाचीत लवकरच चित्रपट गृहातून जाऊ शकतो.)
30/04/2025
संघाच्या प्रत्यक्ष कार्यात येऊन पाच वर्ष झाली. त्याअगोदर गांवी असताना शाखेत जायचा योग आलेला. तेव्हा आम्ही शिबीरात सुद्धा हजेरी लावली होती. नंतर नोकरी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना संघ शाखा जरा दृष्टीआड झाली पण अधुनमधून संघाचे उत्सवात जाणे व्हायचे पण ते प्रासंगीकच.ज्या वेळी शाखेत प्रत्यक्ष सहभागी व्हायचे निश्चित केले तेव्हापासून नियमीत व झोकून देऊन काम करायचे हे वेगळे सांगायला नको.
हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या नंतर तसा कुठला मोठा उत्सव नसतो.आमची शाखा प्रोढांची शाखा म्हणून ओळखली जाते. पहिल्या पासूनच स्वयंसेवक संख्या भरपूर. आमच्या शाखेचा पट एकशे पंचवीसचा आहे. शाखेत नुकत्याच नव्या नियुक्त्या झालेल्या तसेच स्वतःहून जबाबदारी घेऊन काम करणारे स्वयंसेवक भरपूर. त्यामुळे संघ माध्यमाद्वारे शाखेत नियमीत काहीतरी चांगले कामं करण्याची तळमळ.
चालू वर्ष हे संघांचे शताब्दी वर्ष असल्याने आपल्या
शाखेत एक दिवस तरी स्वयंसेवकांची हजेरी शंभर पर्यंत व्हावी अशी सुपीक कल्पना काही जेष्ठ स्वयंसेवकांचे डोक्यात आली. त्यांनी विचार मांडला अन झाडून सगळे त्या उद्दिष्टाचे पुर्ती साठी सरसावले. आमच्या कडे पंधरा दिवसच होते पण म्हणतात ना...
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
दिवस निश्चित झाला अक्षय तृतीया दि.३०।४।२०२५. नांदेड सिटी मध्ये भरपूर सोसायट्या आहेत अन प्रत्येक सोसायटीत स्वयंसेवक आहेत. प्रथम त्याची सोसायटी नुसार यादी करून शाखेत येणाऱ्या नियमीत सेवकांस दिली. त्यांनी या पटावरील स्वयंसेवकांशी संपर्क करून या अभियानाची माहिती दिली व हजर राहण्याची विनंती केली.तसेच दररोज शाखेत शाखाकार्यवाह स्वयंसेवकांना आव्हान करायचे. शाखेच्या वाटस् अप ग्रुपवर नियमीतपणे आठवण करून दिली जायची.
एकदाचा अक्षय तृतीयेच्या दिवस ऊजाडला. आम्ही काही निवडक स्वयंसेवक त्या दिवशी पहाटे साडेपाचला संघ स्थानावर गेलो. तिथली जागा झाडूने स्वच्छ केली. सगळा कचरा एकत्रीत केला. सकाळचे सात वाजले अन एक एक स्वयंसेवक येऊ लागला अन बघता बघता संघ स्थान स्वयंसेवकांचे गर्दीने फुलून गेले.
आपल्याला सांगायला आनंद होतोय की आमचे ऊदिष्ट शंभर स्वयंसेवक यावेत असे होते पण प्रत्यक्षात संख्या घेतली तेव्हा ती एकशे पस्तीसवर गेली.
समाजातील चांगल्या शक्ती या निमित्ताने एकत्रीत आल्या होत्या अन तो आनंद सगळ्या स्वयंसेवकांचे चेहऱ्यावर दिसत होता.आज उदिष्ट पुर्ती तर झाली पण अशीच हजेरी नियमीत कशी राहील यासाठी पण प्रयत्न करावे लागतील.
एकी हेच बळ.. ... हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आसावरी प्रभात शाखा तिच्या चांगल्या ऊपक्रमासाठी नेहमीच कौतुकाचा विषय ठरली आहे. आजच्या या ऊपक्रमामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरायला नको.
सतीश पाटील
शुभ कल्याण
नांदेड सिटी , पुणे.
28/04/2025
*स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान* आणि *पुर्णम् ईकोव्हिजन फाउंडेशन* आयोजित समर्थ कुटुंब आणि समृद्ध समाजासाठी *"जागरण"* या विविध स्पर्धा मकरसंक्रांत ते संत गाडगे महाराज जयंती दरम्यान सूर्य नमस्कार स्पर्धा, स्वबोध आधारित प्रश्न मंजुषा इ. स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या मध्ये
एकूण 32सोसायटीनी मिळून साधारण ४००+ नागरिकांनी सहभाग घेतला.
या मध्ये आसावरी सोसायटी सर्वोत्तम गृहनिर्माण संस्था पुरस्कार मिळालेला आहे.
तसेच आसावरी सोसायटी मधील 4 कुटुंबांना सूर्य नमस्कार स्पर्धेत बक्षीस मिळाले.
जागरण : यात *शाश्वत समाजाभिमुख कार्यक्षम* हे तीन महत्वाच्या मुद्द्यांवर मूल्यमापन झाले. आपल्या संस्थेचे काही लक्षणीय उपक्रम खालील प्रमाणे.
*शाश्वत* :
१. इ वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह
२. संस्थेच्या कारभारात डिजिटल रेकॉर्ड उदा आपके मिनिट्स ऑफ मीटिंग, माय गेट चा वापर
३. सायकल दुरुस्ती शिबीर
*समाजाभिमुख*:
१. मतदार नोंदणी अभियान, मतदार मदत केंद्र
२. नवमतदार मध्ये जागृती आणि सन्मान
३. आयुष्यमान भारत नोंदणी
४. घरेलू कामगार महिला, आरोग्य शिबीर
५. रक्तदान शिबीर
६. कोजागिरी, दांडिया कार्यक्रम
*कार्यक्षम* :
१. ऑडिट दर्जा
२. कमीतकमी थकबाकीदार
३. सर्व सरकारी नियमांचे काटेकोर पालन,कायदेशीर बाबींची पूर्तता
५. विमा रकमे सारख्या रकमांबाबत रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वरील सर्व गोष्टींकरिता प्रत्येक कार्यकारिणी सदस्यांचे आणि रहिवाशांचे योगदान महत्वाचे आहे!