18/04/2025
फायनली आज तो दिवस आला ज्याची आमचा मित्र परिवार गेली अनेक महिने वाट बघत होता... आज आमचा मित्र तेजा म्हणजेच तेजस बर्वे मोठ्या पडद्यावर झळकला आणि तो देखील साक्षात संत ज्ञानेश्वरांच्या रुपात... आम्ही सगळेच या दिवसाची मनापासून वाट बघत होतो कारण तेजसचा संघर्ष आम्ही खुप जवळून पाहिला आहे... न थकता, विना तक्रार, स्वप्नाशी प्रामाणिक राहुन तेजा चालत राहिला आणि आज त्याच्या पहिल्या मुक्कामावर पोहचला...
तेजसच्या ह्या प्रवासात शिवराज अष्टकाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक आमचा मित्र दिग्पालचे मार्गदर्शन आणि विश्वास निर्णायक ठरले.
दिग्पालने दिग्दर्शित केलेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा आज जगभर प्रदर्शित झाला आहे. शिवराज अष्टकामुळे दिग्पालचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे आणि मुख्यत्वे ह्या चाहत्यावर्गा मध्ये लहान मुलामुलींची संख्या खुप मोठी आहे. दिग्पालचे सगळेच सिनेमे सिनेमागृहामध्ये जोरदार चालतातच पण त्यानंतर सुध्दा घराघरांमध्ये रिपिट मोडवर सुरु असतात. म्हणूनच दिग्पालचा संत परंपरेतला हा पहिला सिनेमा मला ह्या अर्थाने मोठा वाटतो की आता पुढच्या पिढ्यांपर्यंत महाराष्ट्राची ही संत परंपरा देखील चित्रपटांच्या माध्यमातून पोहचायला सुरुवात होईल.
ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पार्श्वगायक म्हणून ज्याने धुव्वा केला आहे तो आमचा मित्र अवधूत गांधी संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे...
मित्र म्हणून दिग्पालच्या कामाचा नेहमी अभिमान वाटतोच पण त्याच सोबत आज तेजसच्या मुख्य नायक म्हणून आणि अवधूतच्या संगीतकार म्हणून पदार्पणाचा विशेष आनंद आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई च्या सर्व टीमचे खुप मनापासून अभिनंदन...
तुम्ही देखील आमच्या सर्व माऊलींनी खुप मनापासून बनविलेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा ही नम्र विनंती.
04/03/2025
"वैभवजी, साहेबांची स्पष्ट सूचना आहे की ह्या रेल्वेत होणाऱ्या साहित्ययात्री संमेलनात जे जे साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत त्यांच्या जेवण, स्वच्छता ह्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही. विश्व मराठी संमेलनाच्या वेळी बाहेरच्या देशांमधून अनेक पाहुणे आले होते, त्यांचा जो पाहुणचार ठेवला होता त्यापेक्षा चांगली व्यवस्था रेल्वेमधून साहित्यसंमेलनाला येणाऱ्या साहित्ययात्रींची ठेवायची आहे. कारण मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणारे जपणारे खरे लोक हे आहेत असं साहेबांचं म्हणणं आहे" वाडिया कॉलेज मध्ये झालेल्या आमच्या पहिल्याच बैठकीत मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांचे विशेष अधिकारी (OSD) सचिन सानप सर सांगत होते आणि आमच्यातले काही जण एखाद्या राजकीय आश्वासनावर सामान्य नागरिक जेवढा (अ)विश्वास ठेवतात त्या पध्दतीने ऐकत होते पण माझा मात्र सचिन सानप सरांच्या वाक्यावर पूर्ण विश्वास होता कारण ना. उदय सामंत ह्यांच्यातला सकारात्मक राजकीय कार्यकर्ता मी काही दिवस आगोदरच दिल्लीत अनुभवला होता...
२१ ऑक्टोबर २०१३ रोजी, माझ्या आयुष्यातल्या एका काळ्याकुट्ट दिवशी मी उदय सामंत ह्यांना भेटलो होतो आणि त्याच दिवशी कोणतीही ओळख पाळख नसताना त्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला माझ्यासाठी "माझ्या लहान भावाला तुमच्याकडे पाठवतोय, त्याला सहकार्य करा" असा फोन केला होता. त्यानंतर मी त्यांना थेट भेटलो २१ ऑक्टोबर २०२३ ला. रत्नागिरीत. १० वर्षांपूर्वी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या फोन बद्दल थॅंक्यु म्हणायला. त्या नंतर आमची भेट झाली थेट दिल्लीतील जेएनयु मध्ये... जेएनयु मध्ये मराठीचा पाय घट्ट रोवणे किती गरजेचे आहे, तिथे महाराष्ट्रातील विद्यार्थांचा टक्का वाढविणे किती गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी ज्या धडाडीने निर्णय घेतले ते पाहून जेएनयु मधले पब्लिक पण त्यांचे फॅन झालेले आम्ही अनुभवले. त्यानंतर झाली आमची साहित्य संमेलन आढावा बैठक, ह्या बैठकीच्या वेळी नहार सरांच्या परवानगीने मी उदय सामंत ह्यांना रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याबाबत विनंती केली. तर ते म्हणाले,"स्वागताध्यक्ष वगैरे होणे हा मुद्दा नाहीए, पण रेल्वेतून येणाऱ्या प्रत्येकाची प्रत्येक व्यवस्था नीट होणे गरजेचे आहे. कारण साहित्य संमेलनाची ९८ वर्षांची परंपरा ह्या लोकांमुळे टिकून आहे. महाराष्ट्र शासन ह्या साहित्ययात्री संमेलनाच्या पाठीशी ठाम उभे राहील आणि मी स्वत: मराठी भाषेचा मंत्री म्हणून नाही तर एक मराठी रसिक म्हणून ह्या रेल्वेतून प्रवास करेन.
28/02/2025
परतीच्या प्रवसात भुसावळ रेल्वे स्टेशन आलं, जळगाव धुळे, चाळीसगाव भागातले प्रवासी उतरले... पुढे मनमाड आलं, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधले लोक उतरले... पुढे अहिल्यानगर आलं, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर आणि साहित्य संमेलनाला मराठवाड्यातून आवर्जून आलेले साहित्ययात्री उतरले... प्रत्येक वेळी मी उतरुन ह्यांना निरोप देत होतो, निरोपाच्यावेळी आमची गळाभेट होत होती... आता पुण्यात किती लोक उतरणार ह्याचा अंदाज घेऊन माझ्या जागी येऊन बसलो तर लक्षात आले की निम्मी रेल्वे मोकळी झाली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होता की निघायच्या वेळी रेल्वे कुठे थांबणार नव्हती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून हे मराठी भाषेचे वारकरी पुणे स्टेशनला जमा झाले होते. जो आपण महाराष्ट्रधर्म म्हणतो तो आमच्या रेल्वेत ठासून भरला होता...
मग आता हळू हळू मला त्यांचे चेहरे आठवायला लागले... ते ह्या प्रवासात काय काय करत होते हे आठवायला लागलं. ह्या संपूर्ण प्रवासात सगळे नियोजन सांभाळण्यात आम्ही टीम म्हणून इतके व्यस्त होतो की हे समजून घ्यायला वेळच मिळाला नव्हता. आता वेळ मिळाला होता तेंव्हा जाणवले की कोण होते हे लोक? हे होते सर्वसामान्य घरातले लोक... कोणी शेतकरी, कोणी वारकरी, कोणी न्हावी, कासार, शिंपी,माळी, नोकरदार, कलाकार, कवी, विडंबनकार, नाटककार, हलगीवाला, ढोलकीवाला... पण ह्यातला प्रत्येक जण मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारा, मराठी भाषा जपणारा... कदाचित ह्यातल्या काहींना श आणि ष ह्यातला फरक नसेल कळत, ण च्या ऐवजी न पण म्हणला जात असेल पण त्याने खरजच काही फरक पडत नाही हे गेल्या ६ दिवसात मला कळलं होतं... 'भाषा ही व्याकरणासाठी नाही तर व्यक्त होण्यासाठी असते' हे मला ह्या प्रवासाने शिकवलं होतं... मराठी भाषा जगवली, समृध्द केली ती ह्याच सर्वसामान्य लोकांनी...
आमच्या रेल्वेच्या प्रवासात रोज पहाटे भजनं, काकड आरत्या सुरु व्हायच्या त्यानंतर अनेक कविता कट्टे रंगायचे, परिसंवाद झडायचे, गाणी म्हणली जायची, नाट्यछटा व्हायच्या, मराठी रॅप सादर व्हायचे, आणि जर काहीच नसेल करायला तर स्पिकर वर मोठ्या आवाजात गाणी लाऊन नाचो व्हायचा पण ही गाणी मराठीच असायची, ह्यातली अनेक गाणी तर मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होतो. ह्या सगळ्यात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे कोणत्याही माध्यामातून मुक्तपणे व्यक्त होताना ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यातून आलेली चमक... काय कमाल दिसत होते सगळे...
27/02/2025
वयोमानामुळे चिडचिड्या आणि त्रासिक वाटणाऱ्या त्या आजींनी आशीर्वाद म्हणून माझ्या हातात कोंबलेली १०० रुपयांची ही नोट आता माझ्या आयुष्यातील महत्वाच्या सन्मानांपैकी एक आहे... रेल्वेचा परतीचा प्रवास चालू होता आणि संपूर्ण रेल्वेत पहिल्या सीट पासून शेवटच्या सीटपर्यंत प्रत्येकाची चौकशी करत राऊंड करायचा ह्या माझ्या नवीन सवयीप्रमाणे चालत असताना त्या आज्जींनी मला थांबवले आणि आम्ही कार्यकर्ते अव्याहत करत असलेल्या कामाला शाबासकी म्हणून ही शंभर रुपयाची नोट माझ्या हातात कोंबली. देवाशपथ्थ सांगतो, त्या क्षणाला जेंव्हा नहार सरांनी मला रेल्वेतील मराठी साहित्ययात्री संमेलनाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्यावर जे किलो किलोचे प्रेशर मनावर आले होते ते हलके झाले... ह्या आज्जीबाईंनी दिलेल्या ह्या बक्षिसामुळे वाटलं की हो आपल्या टीम ने १४०० लोकांना पुणे दिल्ली आणि परत दिल्ली पुणे सुखरुप आणि आनंदाने परत आणायचं जे शिवधनुष्य होतं ते यशस्वीरित्या पेललं आहे... ८० च्या आसपास वय असलेल्या ह्या आज्जी प्रतिनिधी होत्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या, साहित्य संमेलनाची परंपरा ९८ वर्ष अखंड चालू ठेवणाऱ्या प्रत्येक मराठी मनाच्या... ह्या आज्जी स्वत: सलग ६५ वर्ष साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्या आहेत...
आणि असेच हजारो आशीर्वाद आयोजक म्हणून आपल्या संपूर्ण टीमला मिळाले. हे व्यवस्थापन आणि आमच्या कार्यकर्त्यांचा सेवाभाव इतका उस्फुर्त होता की ह्या रेल्वेत प्रवासी म्हणून आलेल्या माता भगिनींनी "आम्हाला आमच्या माहेरी आल्यासारखं वाटतय" अशी भावना व्यक्त केली...
पहाटेच्या काकड आरती आणि भजनांपासून सुरु होणारा आमचा दिवस मध्यरात्री पर्यंत सुरु राहणाऱ्या मराठी रॅपर्स च्या धुमशानाने संपत असे... ह्या सगळ्या बद्दल आणि हे सगळं का? ह्या बद्दल लवकरच सांगेन.
काल सकाळी आमची महादजी शिंदे एक्सप्रेस पुणे स्टेशन ला पोहचली पण ह्या वेळी रेल्वेतून उतरताना प्रवासी नाही उतरले तर उतरला एक परिवार... मराठी भाषा आणि भाषेवरचं प्रेम ह्या धाग्याने जोडला गेलेला... आपल्या शब्दांमधून मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ ठरविणारा...
होय, आपण चार मराठी माणसे एकत्र आली की फक्त भांडणेच करतात, एकमेकांचे पायच खेचतात हे मराठी माणसांबद्दलचे मत खोटं ठरवून आलोय... फक्त चार पावलं सोडा आमचा हा परिवार हजारो किलोमीटरचा प्रवास एकदिलाने करुन आला आहे...
16/12/2024
कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, मतदार संघांत कोणतीही अनुकुल जातीय समीकरणं नसताना एक शेतकरी कुटुंबातला तरुण आपला सामाजिक कार्याचा रस्ता निवडतो, राजकारणात जातो आणि सरपंच पदापासून सुरुवात करत सलग ७ टर्म आमदार, सलग ३ वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतो ही काय साधी गोष्ट नाहीए... एखाद्या सिनेमातल्या सिंघम हिरोची गोष्ट वाटावी असा प्रवास आहे खांदेशच्या सिंघमचा म्हणजे नामदार गिरीष दत्तात्रय महाजन यांचा.
राजकीय, पक्षीय, जातीय, धार्मिक मतमतांतरे ह्यांच्या पलीकाडे जाऊन गिरीष महाजन हा विषय फारच खोल आहे... आणि सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे. आमदार, मंत्री ह्या बिरुदावल्यांच्या पलीकडे जात गिरीषभाऊंची "आरोग्यदूत" ही ओळख खुप मोठी आहे. संपूर्ण राज्यातून दररोज हजारो रुग्ण गिरीषभाऊंच्या टीमशी संपर्क साधत असतात आणि गिरीषभाऊंनी त्यांच्या हाताखाली तयार केलेले शेकडो आरोग्यदूत त्या प्रत्येक रुग्णासाठी झटत असतात. जळगाव जिल्ह्यात तर दर दहा वीस माणसांमागे असा एक तरी माणूस असतो की ज्याच्यासाठी ऐनवेळी संकट काळात धाऊन आलेला गिरीष महाजन नावाचा माणूस साक्षात देवदूत असतो... संपूर्ण देशात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या यादीत गिरीषभाऊ अव्वल स्थानी आहेत. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गिरीष महाजन ह्यांच्या कामाची व्याप्ती एकदा केस स्टडी म्हणून अभ्यासावी असे मला नेहमीच वाटते.
गेली १० वर्षे त्यांचे हे काम जवळून पाहण्याची संधी मला अनेकदा मिळाली. त्यांची प्रत्येक भेट ही एखाद्या मॅनेजमेंट कॉलेजच्या एक वर्षाच्या सिलॅबस एवढ्या गोष्टी प्रत्येक वेळा शिकवून जाते...
आज गिरीषभाऊंनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांची ही नवी इनिंग पण त्यांंच्या लौकिकला साजेशी असेल हा विश्वास त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आहे कारण हा विश्वास त्यांनी गेली किमान ५० वर्षे स्वत:ला लोकसेवेत गाडून घेऊन जनमानसात रुजवला आहे...
14/12/2024
ह्या आठवड्यात दोन कहर भारी सिनेमे पाहिले... एक म्हणजे प्राईम व्हिडीओ वर असलेला "अग्नी" आणि दुसरा म्हणजे नेटफ्लिक्स वरील "आमरण"... सिनेमात काय आहे ह्याचे कथानक/ समिक्षण वगैरे अजिबातच सांगणार नाही कारण कोणतीही पूर्वकल्पना नसताना जेंव्हा आपण हे सिनेमे पाहतो तेंव्हा आपल्यालाच आपल्या जाणीवांविषयी अनेक प्रश्न पडतात. समाजातल्या खऱ्या नायकांच्या ह्या गोष्टी प्रत्येकाने कंपलसरी पहायलाच पाहिजे.
फक्त लोकांना जीवे मारत सुटणाऱ्या काल्पनिक तस्करांच्या पुष्पा किंवा केजीएफ सारखे सिनेमे पाहण्यापेक्षा, तुम्हाला आम्हाला वाचविणाऱ्या मानवी आयुष्याची किंमत जाणणाऱ्या ह्या रिअल लाईफ हिरोंच्या गोष्टी पहाच... अजून एक तिसरा सिनेमा पहायचा राहिला आहे तो म्हणजे मराठी निर्मात्यांची आणि मित्रांची निर्मिती असलेला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज... पण हा सिनेमा आवर्जून थिएटर मध्ये जाऊन पाहणार आहे.
तर अजिबात वेळ घालवू नका. अजून पाहिले नसतील तर थिएटर मध्ये जाऊन छत्रपती संभाजी, Prime Video वर 'अग्नी' आणि Netflix वर 'आमरण' हे सिनेमे पहाच आणि इतरांना पण सांगा...
12/12/2024
विश्वविजेता !
ये हे नया इंडिया...!
01/12/2024
पवार साहेब आणि चंद्रकांतदादा ह्या दोघांमधली एक कॉमन गोष्ट म्हणजे हे दोघंही संस्थांना, संस्थात्मक कामाला बळ देणारी 'माणसातली माणसं'... ह्या दोघांच्या सक्रिय पाठींब्यामुळे संपूर्ण देशात अनेक चांगल्या संस्था उभ्या राहिल्या आहेत. वेळप्रसंगी एखाद्या चांगल्या संस्थेला बळ देताना ते राजकीय विरोधी विचारधारेच्या लोकांना पण ताकद देतात. ह्या अशा दोन दिग्गजांना अनिशने गेल्या आठवड्यात #व्हायरल_माणुसकी भेट दिलं.
Anish Thankyou so much ह्या कामाच्या हातांपर्यंत #व्हायरल_माणुसकी पोहचविल्याबद्दल...