All India Radio News Pune

All India Radio News Pune

Share

हे आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे.

03/06/2026

आकाशवाणी पुणे
प्रादेशिक वृत्त विभाग
प्रादेशिक बातमीपत्र
सकाळी 07 वाजून 10 मि
दिनांकः03.06.2026 वारःबुधवार

1. राज्याच्या ग्रामीण भागातील 3 हजार 500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता
2. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण
3. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरविण्याची महापालिकेची मागणी, जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी-चिंचवड प्रशासनाचं आवाहन आणि
4. महिलांच्या टी-ट्वेंटी मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय

राज्यमंत्री मंडळ निर्णय
राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, 'मुख्यमंत्री ग्राम सडक' योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत 3 हजार 500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी ६ हजार 4 शे 29 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4 हजार 500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30 टक्के हिस्सा असणार आहे. याशिवाय मुंबईतील हैद्राबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता देण्यात आली.

बोगदा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ, तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च-गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा
417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून, उच्च-गति बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा, प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे.

रुद्रम
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायु दलानं स्वदेशी बनावटीच्या 'रुद्र एम-टू' या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या, काल चांदीपूर इथल्या केंद्रावर, यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर, त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला.

सीबीएसई
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 'ऑन-स्क्रीन मार्किंग' प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी, सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस. राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाइन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील.

अनुकंपा
विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही, असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला.

मारहाण
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, या हल्लाप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की, झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे.

अफवा
पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या 'जनगणना 2027'च्या घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबविली जात असून, कोणत्याही खोट्या माहितीस बळी पडू नये, असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंलाब
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत; आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

आंदोलन
कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात, पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं.

नागपूर
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ सीपीआय, सीपीएम आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली.

नांदेड
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल, मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला.

लातूर
लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आठ जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून, 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

नाशिक
नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह, 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये दोन महिला वैमानिकांचाही समावेश आहे.

परभणी
युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा-पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं.

धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील अकरा गावात 16 टँकरनं, तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही. यामुळं जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

भंडारा
भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची तपासणी केली जाणार आहे.

प्रशिक्षण
राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात पाच दिवसीय ‘आंबा फळ प्रक्रिया’ प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसंच अन्न सुरक्षितता आणि मानक कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि त्यांची देखभाल, पदार्थांचं पॅकेजिंग आणि विपणन, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, अनुदान यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे.

अपघात
गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या दोन बसेसची टक्कर होऊन आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल.

महिला टी-ट्वेंटी
इंग्लंडमध्ये टाँटन इथं झालेल्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रित कौरच्या अर्धशतकी खेऴीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळं भारतीय संघाला विजयाची आशा होती परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला.
भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबॅस्टन इथं पाकिस्तानविरुद्ध करेल.

हवामान
राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी वीजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

AIR PUNE REGIONAL NEWS @ 07.10 AM ON 03.06.2026 03/06/2026

- राज्याच्या ग्रामीण भागातील 3 हजार 500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण
-पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरविण्याची महापालिकेची मागणी, जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी-चिंचवड प्रशासनाचं आवाहन आणि
-महिलांच्या टी-ट्वेंटी मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय

यासह #आकाशवाणीपुणे केंद्रावरील #प्रादेशिकबातम्या खालील लिंकवर...

https://www.youtube.com/live/YZuf_2X-PTM?si=fSs26GWGcsU19yve via

AIR PUNE REGIONAL NEWS @ 07.10 AM ON 03.06.2026 #ठळकबातम्या- राज्याच्या ग्रामीण भागातील 3 हजार 500 किलोमीटर लांबी...

02/06/2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं साईराज बहुतुले यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.

02/06/2026

#मंत्रिमंडळनिर्णय
परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.

या महामंडळांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जातात. या महामंडळांसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक-प्रशासन, सहायक व्यवस्थापक-वित्त व लेखा ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास तर मल्टी टास्किंग स्टाफची सेवा बाह्यस्त्रोतांद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी या तीनही महामंडळांना वार्षिक अंदाजे रु.१.१८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

02/06/2026

#मंत्रिमंडळनिर्णय
मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता या समूह विद्यापीठात प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, कफ परेड, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, चर्चगेट आणि श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय,वांद्रे-पश्चिम, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्लु असोमुल्लु विज्ञान महाविद्यालय, वांद्रे-पश्चिम आणि थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचा समावेश होणार आहे.

02/06/2026

#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्याच्या ‘एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पांसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यांच्याकडून प्रत्येकी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य दोन टप्प्यांत घेण्यासही मंजुरी दिली आहे.

02/06/2026

#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३० टक्के हिस्सा म्हणून सुमारे २१५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे १,९२९ कोटी रुपये) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Photos from All India Radio News Pune's post 02/06/2026

#लातूर येथे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून विशेष मुख आरोग्य तपासणी व तंबाखूमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन कले. या उपक्रमात तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Photos from All India Radio News Pune's post 02/06/2026

#यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या ‘युवा संवाद’ उपक्रमाचा विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्राने समारोप झाला. या उपक्रमातून स्पर्धा परीक्षार्थी व विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा, करिअर आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फेलोशिप्सबाबत मार्गदर्शन मिळाले.

02/06/2026

योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही, तर निरोगी आणि संतुलित जीवनाचा पाया आहे. 🧘‍♂️

नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, मन अधिक स्थिर आणि सक्षम होते आणि दैनंदिन जीवनात समतोल निर्माण होतो.

चला, आपण सर्वांनी योग स्वीकारूया आणि निरोगी शरीर, सक्षम मन आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी स्वतःला समर्पित करूया.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Pune
411005